सातारा

बँड व्यावसायिकांवर कोरोनाचं 'विघ्न'; ४५ हजार कलाकारांची उपासमार

Balkrishna Madhale

सातारा : कोरोना महामारीमुळे अनेक व्यवसाय अडचणीत आलेत. अनेकांची कुटुंबं यात उध्वस्त झाली. अनेकांच्या नोक-या गेल्या. बेरोजगारीचं संकट उभं राहिलं. या महामारीत बँड पथकालाही जबर फटका बसला आहे. दरवर्षी होणारा नफा दोन-तीन लाखांचा असायचा. मात्र, यंदा तोही नफा पदरी नाही. लग्नातील वरात, गणेशोत्सव-शिवजयंतीच्या मिरवणुका, धार्मिक सोहळे किंवा महापुरुषांच्या जयंती असो... मधूर सुरावटी आणि झंकारणाऱ्या तालांच्या साथीने प्रत्येक मंगलकार्याची शोभा द्विगुणित करणाऱ्या बँड पथकांचा आवाजच यंदा कोरोनामुळे बसला आहे. लॉकडाउनमध्ये लग्नसराईसारखा कमाईचा हंगाम गेल्याने बँड पथकांना वादनाच्या सुपाऱ्यांवर अक्षरशः वरवंटा फिरवावा लागला आहे. त्यामुळे हतबल झालेल्या बँड पथकातील वादकांवर 'करुण' राग वाजविण्याची वेळ आली आहे. गणेशोत्सही असाच वाया जाणार असल्याने बँड पथकातील कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. 

सातारा जिल्हा बँड-बॅन्जो संघटना ही २०१४ पासून जिल्ह्यात कार्यरत आहे. जिल्ह्यातील तीनशे ते साडेतीनशे कलाकार यात काम करतात. या व्यवसायावर एका सदस्या मागे २० ते २५ कलाकार अवलंबून आहेत. २० कलाकारांच्या मागे एक कुटुंब असतं. यावरतीच त्यांचा उदरनिर्वाह चालत असतो. सध्या जिल्ह्यात साधारण ४० ते ४५ हजार लोक या व्यवसायावरती अवलंबून आहेत. शहरात सुमारे ऐंशी ते शंभर बँड पथके असून, काही बँड पथकांना तर शंभरांहून अधिक वर्षांची परंपरा आहे.

एका बँड पथकात सरासरी वीस ते पंचवीस वाजंत्री असतात. क्लोरोनेट, ट्रम्पेट, इफोनियम, ढोल, ताशा, ड्रम, खंजिरी, ऑक्टोपॅड, सिंथेसायझर, सोजाफोन आदी वाद्ये वाजविणाऱ्या या कलावंतांसोबत बँड मालक वर्षभराचा करार करतो. त्यानुसार, वादकाला कायमस्वरूपी दरमहा सरासरी बारा, पंधरा हजार रुपये पगार दिला जातो. गरज भासल्यास काही बँड पथके वादकांना तासावर मानधन देऊनही बोलावतात. या वादकांच्या जोरावर बँड मालक वादनाच्या सुपाऱ्या घेतात. एका सुपारीमागे पंधरा हजार ते पस्तीस हजार रुपये असे मानधन बँड पथकाला मिळते.

साधारणतः गणेशोत्सवापासून या बँड पथकांच्या व्यावसायिक वर्षाला प्रारंभ होतो. मात्र, बँड पथकांच्या कमाईची मुख्य भिस्त नोव्हेंबर-डिसेंबरपासून जूनपर्यंतच्या कालावधीतील लग्नसराईवर अवलंबून असते. यंदा नेमका हा कमाईचा मुख्य 'सीझन'च कोरोना आणि लॉकडाउनमुळे बुडाला आहे. बँड पथकांकडे नोंदविलेल्या विवाह सोहळ्यांच्या बहुतांश तारखा रद्द झाल्या आहेत किंवा पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे बँड मालक आणि वादक पुरते हवालदिल झाले आहेत. त्यातच गणेशोत्सवाचा हंगामही संपत असल्याने अनेक कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनेकांजण कर्ज काढून या व्यवसायात उतरले होते. मात्र, कोरोनामुळे त्यांच्याही पदरी निराशा आली आहे. प्रशासनाने यावरती लवकरात-लवकर तोडा काढून बँड व्यवसायिकांना परवानगी द्यावी, अशी अपेक्षा बँड कलाकारांतून होऊ लागली आहे.

शहर व उपनगरातील सर्वच बँड पथकांनी मार्च, एप्रिल, मे आणि जूनमधील लग्नसमारंभांच्या सुपाऱ्या घेतल्या होत्या. आता, लॉकडाउनमुळे त्या रद्द कराव्या लागल्या असून, त्यासाठी घेतलेली आगाऊ रक्कम परत द्यावी लागत आहे. त्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता नोव्हेंबरनंतरचाही सीझन सुरळीत सुरू होईल का, याबाबत साशंकता आहे. त्यामुळे हा व्यवसाय प्रचंड अडचणीत आला असून, त्यावर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबांना पुढील वर्षभर हा फटका सहन करावा लागणार आहे,' अशी प्रतिक्रिया सातारा जिल्हा बँड-बॅन्जो संघटनेचे उपाध्यक्ष बबन तुकाराम जाधव यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली. दरम्यान, सरकारने याची तत्काळ दखल घेऊन व्यवसायाला आणि कलांकारांना तातडीची मदत करावी व कुटुंबाची होणारी उपासमार थांबवावी, अशी मागणी कलाकारांकडून होत आहे. 

मायबाप सरकारने बँड व्यवसायाला परवानगी द्यावी
कोरोनाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाउनमुळे लग्नसोहळ्यांसाठी आगाऊ रक्कम घेऊन दिलेले बुकिंग रद्द करावे लागले आहे. गेल्या अनेकवर्षांपासून सातारा शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीत आमचे बँड पथक वादन करते. मात्र, आता त्याबाबतही काही सांगता येत नाही. सर्व वादक घरी बसले आहेत किंवा छोटे विक्री व्यवसाय करून पोट भरत आहेत. मी बँड व्यवसायात सात लाखाची गुंतवणूक केली होती. यात लोकांना अॅडव्हान्स देणं, साहित्य खरेदी करणं हे व्यवहार चालत होते. मात्र, कोरोनामुळे सगळ्याच व्यवसायावरती पाणी फिरलं आहे. १८ ते २२ मार्च दरम्यान लाॅकडाउन सुरु झाले. व्यवसाय बंद असल्यामुळे उपासमारीची वेळ आली. खायला अन्न मिळत नव्हतं, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आता मुलांच्या शिक्षणाचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. त्यामुळे मायबाप सरकारने बँड व्यवसायाला परवानगी देऊन कलाकारांची होणारी उपासमार थांबवावी व हा व्यवसाय पूर्ववत करावा.

-बबन तुकाराम जाधव, उपाध्यक्ष सातारा जिल्हा बँड-बॅन्जो संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT