शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा, यासाठी टाटा यांनी सरकारला एकाधिकार पद्धतीने कापूस खरेदीबाबत ट्रस्टच्या माध्यमातून पाठपुरावा केला होता.
म्हसवड : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांच्या निधनाचे वृत समजताच दुष्काळी माण तालुक्यातील (Man Taluka) नऊ गावांत शोककळा पसरली. टाटा यांनी १९५७ मध्ये दुष्काळग्रस्त माण तालुक्यातील देवापूर, पुळकोटी, शिरताव, जांभुळणी, गंगोती, पानवण, पळसावडे, हिंगणी व ढोकमोढा ही नऊ अविकसित गावे दत्तक घेऊन या सर्व गावांतील ग्रामस्थांना टाटा ट्रस्टच्या (Tata Trust) माध्यमातून नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याचे योगदान दिले होते.
तत्कालीन काळात या गावांमध्ये विजेची सुविधा नव्हती. त्यामुळे या गावांतील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी विहिरींची बांधकामे करून प्रत्येक विहिरीवर पवनचक्कीद्वारे चालू शकणारे पाणी उपसा पंप बसवून पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध केली गेली. त्याबरोबरच मुलांना स्थानिक पातळीवर शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्राथमिक शाळेच्या इमारतींची बांधकामे, पशुवैद्यकीय दवाखाने, दूध डेअरी, दुग्ध व्यवसायासाठी संकरित गायींचे वाटप याबरोबरच शेतीकरिता मार्गदर्शन आदी सुविधा उपलब्ध करण्याचे योगदान त्यांनी दिले.
या सर्व योजना पारदर्शक पद्धतीने राबविण्यासाठी श्री. टाटा यांनी त्यांचे मित्र सुरेश सुरतवाला यांची नेमणूक केली होती. १९७० ते ८० च्या दशकात माण तालुका कापूस उत्पादनात अग्रेसर होता. येथील शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा, यासाठी श्री. टाटा यांनी सरकारला एकाधिकार पद्धतीने कापूस खरेदीबाबत ट्रस्टच्या माध्यमातून पाठपुरावा केला होता.
कापूस खरेदी केंद्र देवापूर येथे मंजूर करून याठिकाणी तालुक्यातील शेतकऱ्यांना कापूस विक्रीची सुविधा उपलब्ध करून दिली गेली. कापसाचे प्रचंड उत्पादन सुरू होताच त्यांनी ट्रस्टच्या माध्यमातून देवापूर येथे कापसातून सरकी वेगळी करण्याच्या उद्योग शेतकऱ्यांच्या मदतीने सुरू करून या उद्योगातून बेरोजगारांना स्थानिक पातळीवर हंगामी स्वरूपाची रोजगाराची संधी जिनिंग केंद्राद्वारे दिली.
सलग ३३ वर्षे श्री. टाटा यांनी या नऊ गावांतील ग्रामस्थ व शेतकऱ्यांना विविध सुविधा देण्याचे योगदान दिले. आज सकाळी रतन टाटा यांच्या निधनाचे वृत समजताच संबंधित नऊ गावांतील ग्रामस्थांत शोककळा पसरली. श्री. टाटा यांनी सामाजिक सेवाभावी वृत्तीने दुष्काळग्रस्त गावांच्या सर्वांगीण विकासासाठी टाटा ट्रस्टच्या माध्यमातून केलेल्या विविध विकासकामांच्या आठवणींना उजाळा देत जुन्या पिढीतील ग्रामस्थांनी टाटा यांच्या निधनाचा शोक व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.