परळी - साताऱ्याच्या पश्चिम भागात सध्या पावसाचा जोर आहे. जी गावे दरडप्रवणग्रस्त आहेत, अशा ठिकाणच्या नागरिकांना कोणत्याही प्रकारचा धोका पोचू नये, यासाठी सातारा तालुक्यातील डोंगरमाथ्यावरील मोरेवाडी व सांडवली येथील कुटुंबे तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करण्यात आली आहेत. यामध्ये मोरेवाडी येथील २२ तर सांडवली येथील २१ कुटुंबे गावातीलच सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आली आहेत.
गेल्या चार वर्षांपासून मोरेवाडी, सांडवली, भैरवगड या ठिकाणी अतिवृष्टीमुळे या परिसरातील रस्ते खचून जमिनीला भेगा पडणे, तसेच पाण्याचा प्रवाह गावात येऊन पाणी घरात घुसणे, असे प्रकार घडले होते. तसेच सध्या इर्शाळवाडी या ठिकाणीही भूस्खलन होऊन मोठी आपत्ती घडली आहे. या पार्श्वभूमीवर साताऱ्याचे प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार राजेश जाधव, मंडलाधिकारी तसेच इतर विभागाच्या मदतीने या कुटुंबांना रात्रीच्या वेळी निवारा शेडमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे.
मोरेवाडी येथे गावाच्या वरच्या बाजूला काही धोकादायक दगड आहेत, तसेच या परिसरातील जमीन खचत आहे, त्यामुळे येथील स्थानिकांसाठी दिवसभर आपली शेतातील कामे तसेच आपली जनावरे सांभाळल्यानंतर रात्री सुरक्षित ठिकाणी निवाराशेड बांधले आहेत.
या ठिकाणी राहण्याची सोय करण्यात आली आहे, तसेच सांडवली येथील २२ कुटुंबांसाठीही आपली शेतातील कामे झाल्यावर वारसवाडी, दावण या ठिकाणी काही घरकुले उभारण्यात आली आहेत. या घरकुलांमध्ये त्यांची निवासाची सोय करण्यात आली आहे.
ग्रामस्थांनो, प्रशासनाचे आदेश पाळा
आम्ही पूर्वीपासून असेच राहात आलो आहोत, याहीपेक्षा मोठा पाऊस होता. आमच्या दारातून ओढा वाहत होता. जमिनीलाही भेगा पडत होत्या, असे म्हणत अशा दरडप्रवणग्रस्त गावांतील कुटुंबे गावातच राहतात.
प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी गावात आल्यावर त्यांच्यापुढे सुरक्षित ठिकाणी जातात, ती गेली की त्यांच्या पाठोपाठ ही कुटुंबे आपल्या जुन्या घरात जाऊन राहतात, अशी परिस्थिती आहे. मात्र, वेळ कधी कोणती येईल, हे सांगता येत नाही, त्यामुळे प्रशासनाचे म्हणणे ऐका व सुरक्षित ठिकाणी राहा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.