निवडणुकीत साविआ आपली सत्ता कायम राखण्यासाठी तर नविआ सत्तापालटासाठी आक्रमक राहणार आहे.
सातारा : शासनाने जाहीर केलेल्या नगरसेवकवाढीच्या निर्णयामुळे सातारा पालिकेच्या सभागृहातील नगरसेवकांची संख्या ५६ च्या घरात पोचणार आहे. पालिका सभागृहातील प्राबल्य वाढवण्याबरोबरच सत्तागणित जुळविण्यासाठी दोन्ही आघाडीप्रमुखांनी कंबर कसली आहे. निवडणुकीवेळी नटाला-नट अन् खटाला-खट उमेदवार निवडताना दोन्ही आघाडीप्रमुखांची डोकेदुखी वाढणार आहे. तिकीट डावलल्यास निवडणुका (Election) नजरेसमोर ठेवत तयारी केलेल्या इच्छुकांच्या बंडखोरीत वाढदेखील होण्याची शक्यता गृहित धरून ती मोडून काढण्यासाठीचा ‘ॲक्शन प्लॅन’ देखील आघाडीप्रमुखांना तयार ठेवावा लागणार आहे.
सातारा विकास आघाडीने (Satara Vikas Aghadi) गत निवडणुकीत थेट नगराध्यक्षपदासह 22 नगरसेवक निवडून आणत सातारा पलिकेची सत्ता आपल्या ताब्यात घेतली. मतदारांचा कौल मान्य करत नगरविकास आघाडीने (Nagarvikas Aghadi) गेल्या पाच वर्षांत आपले वर्चस्व वाढविण्याचे हरएक प्रयत्न केले आहेत. सातारा पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची प्रभाग रचना तयार करण्याचे काम सध्या प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता असल्याने सातारा विकास आघाडी आणि नगर विकास आघाडीने आपली ताकद वाढविण्याबरोबरच मतदारांना आपल्याकडे खेचण्यास सुरुवात केली आहे. होणाऱ्या निवडणुकीत साविआ आपली सत्ता कायम राखण्यासाठी तर नविआ सत्तापालटासाठी आक्रमक राहणार आहे. हद्दवाढीनंतर पालिकेच्या सभागृहातील नगरसेवक संख्या ४० वरून ४८ च्या घरात पोचणार होती. त्यातच शासनाने १५ टक्के वाढीचा निर्णय जाहीर केल्याने नगरसेवक संख्या ५६ च्या घरात जाऊन थांबणार आहे. नगरसेवक संख्या वाढल्याने सत्ता हातात ठेवण्यासाठी साविआच्या तर सत्तापालट करण्यासाठी नविआच्या राजकीय समीकरणांना वेग आला आहे. बस्स झालं! आता पोपटपंची बंद करा; NCP ची सेनेच्या आमदारावर सडकून टीका
द्विसदस्यीय प्रभाग पध्दतीने होणाऱ्या निवडणुकीत दोन्ही आघाड्यांना विजयश्री खेचून आणणारा उमेदवार रिंगणात उतरवावा लागणार आहे. असे उमेदवार शोधणे, त्यांना ताकद देण्याबरोबरच विरोधी उमेदवाराला टसल देण्याची रणनीती आखताना दोन्ही आघाडीप्रमुखांची आगामी काळात दमछाक होणार आहे. हद्दवाढीनंतर पालिकेत आलेल्या शाहूपुरी, विलासपूर, शाहूनगर, पिरवाडी तसेच उपनगरांत अनेक इच्छुक असून, त्यांनी निवडणुकीची तयारी गेल्या काही महिन्यांपासून सुरू केली आहे. तयारी करताना तन-मन-धन ओतणाऱ्या इच्छुकांपैकी ताकदवान, बलवान, विजयाला गवसणी घालणाऱ्या उमेदवारांची निवड करणे दोन्ही आघाडीप्रमुखांसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. एकाची निवड करताना इतरांची बंडखोरी टाळण्यासाठी दोन्ही आघाडीप्रमुखांना योग्य त्या ठिकाणी योग्य त्या समायोजनाचा अवलंब करावा लागणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.