ढेबेवाडी - सहा वर्षांपूर्वी एमपीएससी उत्तीर्ण होऊन पोलिस उपनिरीक्षकपदी नियुक्ती झालेल्या आपल्या बहिणीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून लहान भावानेही खासगी क्लास न लावता जिद्दीने तीच परीक्षा उत्तीर्ण होऊन त्याच पदाला गवसणी घातली. त्यामुळे मोरेवाडी (कुठरे, ता. पाटण) येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील अमित श्रीरंग मोरेचे परिसरातून मोठे कौतुक होत आहे.
मोरेवाडीतील अमितचे प्राथमिक शिक्षण मोळावडेतील जिल्हा परिषद शाळेत, तर माध्यमिक शिक्षण कुठरे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले आहे. ढेबेवाडी येथील कर्मवीर भाऊराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयात बारावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर कऱ्हाडच्या शासकीय औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयातून त्याने पदवी संपादन केली.
कोरोनाच्या काळात भरपूर वेळ जवळ असल्याने अमितने त्याची बहीण शुभांगी मोरे आणि मोठे बंधू आनंद यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. शुभांगी २०१८ मध्ये एमपीएससी उत्तीर्ण झाल्या असून, धारावी पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. बंधू आनंद आयटी इंजिनिअर आहेत.
कऱ्हाड येथील सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयाच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे सुभाष शिंदे, तसेच चुलत बंधू ओंकार मोरे यांचेही मार्गदर्शन लाभले. अमित यांनी मोठ्या बंधूंच्या खोलीवर आळंदी- दिघी येथे राहून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला.
‘दररोज सात तास अभ्यास करायचो. आवश्यक तेथे गुगल आणि यू ट्युबचा आधार घेतला. खासगी क्लास लावला नाही. पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले,’ असे अमित सांगतात. दरम्यान, मोरेवाडी ग्रामस्थांच्या वतीने जनसहकार समूहाचे संस्थापक मारुतीराव मोळावडे, बाजीराव मोरे, संभाजी मोरे, सचिन मोरे, महेश कदम, शशिकांत मोरे, अनिल चव्हाण, सुयश यादव आदींनी अमितचा सत्कार केला. मोरे कुटुंबात अनेक पोलिस अधिकारी घडले आहेत. आम्हा ग्रामस्थांना त्याचा विशेष अभिमान आहे, असे मारुती मोळावडे यांनी सांगितले.
ग्रामीण भागात मोठे टॅलेंट दडले आहे. मात्र, स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. अभ्यासात सातत्य जरूर पाहिजे. मात्र, अभ्यास परीक्षाभिमुख आणि नेमका असायला हवा. त्यात उगाच गोंधळ उडवून चालणार नाही.
- अमित मोरे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.