विसापूर : पुसेगाव (ता. खटाव) येथील श्री सेवागिरी महाराजांच्या ७४ व्या पुण्यस्मरणानिमित्त आज नियम पाळत मोठ्या उत्साहात रथोत्सव साजरा झाला.
आज सकाळी साडेअकरा वाजता माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार शशिकांत शिंदे, आमदार महेश शिंदे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, शिवसेनेचे उपनेते नितीन बानगुडे- पाटील यांच्या हस्ते रथपूजन करण्यात आले.
याप्रसंगी प्रांताधिकारी जनार्दन कासार, पोलिस उपअधीक्षक गणेश किंद्रे, मठाधिपती श्री सुंदरगिरी महाराज, ट्रस्टचे चेअरमन मोहनराव जाधव, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, योगेश देशमुख, प्रताप जाधव, रणधीर जाधव, सुरेशशेठ जाधव, सरपंच विजय मसणे, उपसरपंच पृथ्वीराज जाधव, सहायक पोलिस निरीक्षक संदीप शितोळे, तलाठी गणेश बोबडे आदी उपस्थित होते. दरम्यान, मान्यवरांच्या हस्ते रथपूजन झाल्यानंतर मंदिराच्या प्रांगणात भाविकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून दर्शनाचा लाभ घेतला.
पहाटे श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधीची पूजा, अभिषेक व आरती मठाधिपती सुंदरगिरी महाराज, चेअरमन मोहनराव जाधव व विश्वस्तांच्या हस्ते झाल्यावर महाराजांच्या पादुका व प्रतिमेची मानाच्या रथामध्ये प्रतिष्ठापना करण्यात आली. संजीवन समाधी परिसर फुलांच्या माळांनी आणि आकर्षक विद्युतरोषणाईने सुशोभित करण्यात आला होता. या वेळी भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या दोन हजार, पाचशे, शंभर, पन्नास, वीस, दहा रुपयांच्या नोटांच्या माळा रथावर अर्पण केल्या होत्या. रथोत्सवानिमित्त मंदिरावर आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आली आहे. मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकास बुंदीचा प्रसाद देण्याचा उपक्रम देवस्थान ट्रस्टच्या वतीने राबवण्यात येत आहे. रथ यात्रेनिमित्त पोलिसांनी विशेष बंदोबस्त ठेवला असून, कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाईल, याची दक्षता घेतली जात आहे.
दर वर्षी सेवागिरी महाराजांची प्रतिमा व पादुका ठेवलेला रथ गावातून फिरविण्यात येतो. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रथाची मिरवणूक रद्द झाल्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी गावाला प्रदक्षिणा घालण्याची रथोत्सवाची परंपरा खंडित झाली.
मंदिराच्या प्रांगणात रथ दर्शनाची सोय
कोरोना पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून मंदिर परिसरात सेवागिरी महाराज रथ दर्शनाची सोय करण्यात आली आहे. भाविक रांगेतून संजीवन समाधीचे दर्शन घेत आहेत. पाकळणीपर्यंत भाविकांना मंदिरात रथ दर्शन घेता येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.