कोरेगाव - प्रदीर्घ संपानंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या‘लालपरी''ची प्रवाशी वाहतूक पूर्वपदावर येत असताना ऐन उन्हाळ्यात गर्दीच्या हंगामात एसटी बस डिझेल भरण्यासाठी खासगी पेट्रोल पंपांवर जात आहेत. त्यामुळे प्रवाशांना काही वेळा नाहक मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे चित्र दिसून येते.
एसटी महामंडळाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पेट्रोलियम कंपन्यांनी परिवहन महामंडळाला डिझेलवरचे अनुदान बंद केल्याने महामंडळाला स्थानिक पंपांपेक्षा डिझेलला सुमारे २० रुपये जादा भुर्दंड बसत होता. त्यामुळे महामंडळाने आगारातील डिझेल पंप बंद करून खासगी पंपांवरून डिझेल घेण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे.
सातारा विभागामध्ये महामंडळाची सातारा, कोरेगाव, वडूज, वाई, दहिवडी, फलटण, खंडाळा, मेढा, महाबळेश्वर, कऱ्हाड आणि पाटण असे ११ आगार आहेत. एसटी महामंडळाने खासगी पंपांवर डिझेल भरण्याचा निर्णय घेतल्यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक आगाराने निविदा मागवून कमी दर घेणारे खासगी पंप निश्चित केले आहेत. त्या प्रत्येक पंपावर महामंडळाने आपला एक अधिकारी नियुक्त करून त्याच्याकरवी बसमधे डिझेल भरून तशी नोंद ठेवण्यात येत आहे. यथावकाश त्याचे बिल अदा करण्यात येत आहे. मात्र, खासगी पंपावर डिझेल भरायला जाणाऱ्या बस बऱ्याच वेळा पंपावर इतर वाहनांची गर्दी असणे, वाहतूक कोंडी वगैरे समस्या निर्माण होत असल्याने काही वेळा तेथे थांबून राहत आहेत. त्यामुळे प्रवाशांना बससाठी तिष्टत बसावे लागत आहे.
सध्या उन्हाळी हंगाम व सलगच्या सुट्या असल्यामुळे एसटीच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना तोबा गर्दी आहे. सर्वसामान्य प्रवाशांना एसटी हे एकमेव दळणवळणाचे साधन असल्यामुळे बस स्थानके प्रवाशांच्या गर्दीने फुलून जात आहेत. मात्र, डिझेल भरण्यात वेळ जात असल्यामुळे एसटीचे वेळापत्रक वारंवार कोलमडत असून, याचा सर्वाधिक फटका प्रवाशांना बसतो आहे. तेव्हा प्रवाशांची ही समस्या लक्षात घेऊन महामंडळाने योग्य निर्णय घेऊन प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.