बेळगाव, कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी जाहीर केलीय.
कऱ्हाड (सातारा) : एकरकमी एफआरपीसाठी (Sugarcane FRP) वेळप्रसंगी कायदा हातात घेवू, आक्रमक होवू; पण आम्ही आता कारखानदारांना सोडणार नाही. त्यांच्या नरड्यावर पाय देवून एकरकमी एफआरपी वसूल केल्याशिवाय सोडणार नाही. उसाची वाहतूक रोखून कारखाने बंद पाडू. अंगावर आला, तर शिंगावर घ्यायची तयारी आम्ही केलीय. त्यासाठी कारखानदारांनी मैदानात यावे, असे खुले आव्हान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी आज येथे कारखानदारांना दिले.
एकरकमी एफआरपीसाठी स्वाभिमानी आणि बळीराजा शेतकरी संघटनेमार्फत आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बळीराजाचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील, जिल्हाध्यक्ष साजीद मुल्ला, स्वाभिमानी संघटनेचे उपजिल्हाध्यक्ष देवानंद पाटील, विश्वास जाधव, दादासाहेब पाटील आदी उपस्थित होते. श्री. शेट्टी म्हणाले, ‘‘बेळगाव, कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी जाहीर केली. मात्र, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील हे एकरकमी एफआरपी देणे शक्य नाही, असे सांगत आहेत.
राज्यातील 30 ते 35 साखर कारखान्यांना एकरकमी एफआरपी देणे शक्य होते. मग पाटील यांना का शक्य होत नाही? अनेक वर्षानंतर साखरेला चांगला दर मिळत असल्याने साखर उद्योगाला सुवर्णकाळ आला आहे. शेतकऱ्यांचं जगणं-मरण ऊस शेतीवरचं आहे, याचे कारखानदारांनी भान ठेवावे, अन्यथा ते कारखानदारांच्या उरावर बसतील.’’ कृषी कायद्याविरोधात सुरु असेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला केंद्र सरकार जातीय आणि प्रांतीय वादाचे स्वरुप देण्याचा प्रयत्न करत आहे.’’ बळीराजा संघटनेमार्फत पंजाबराव पाटील यांनीही आंदोलनाचा इशारा दिला.
सदाभाऊ खोतांवर नाव न घेता टीका
एकरकमी एफआरपी हा केंद्र सरकारचा विषय आहे. त्याला राज्य सरकाराने समर्थन दिले म्हणून आम्ही त्याला विरोध करत आहोत. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि कारखानदार मिळून शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे. असे असताना केवळ राज्य सरकारवर टीका करायची आणि केंद्र सरकारवर काहीच बोलायचे नाही, अशी भूमिका घेणाऱ्या संघटनेबरोबर आम्ही नाही, अशी स्पष्टोक्ती शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांचे नाव न घेता त्यांच्या रयत क्रांती संघटनेबाबत केली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.