सातारा : लोकसभेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाईच्या जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण होणार की आणखी काही दिवस वेटिंगमध्ये ठेवले जाणार, हे येत्या दोन दिवसांत समजणार आहे. त्यामुळे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्या राज्यसभेच्या खासदारकीबाबत वाईकरांच्या नजरा आता मुंबईकडे लागल्या आहेत.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची महत्त्वपूर्ण बैठक गेली दोन दिवस मुंबईत सुरू आहे. पक्षाच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून बैठकांचे सत्र सुरू असून, लोकसभेनंतर आता आगामी विधानसभेच्या निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरण्याची तयारी अजित पवार गटाने केली आहे.
त्यापूर्वी राज्यसभेची जागाही अजित पवार यांच्या पारड्यात पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा आता मुंबईकडे लागल्या आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत सातारा लोकसभा मतदारसंघ हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळाला होता; पण उदयनराजेंसाठी ही जागा भाजपला सोडण्यात आली.
त्यामुळे राष्ट्रवादीतून इच्छुक असलेले जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्यासह त्यांच्या समर्थकांत प्रचंड नाराजी पसरली होती; पण अजित पवार यांनी निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात वाईत येऊन त्यांनी नितीन काकांना राज्यसभेवर घेऊन खासदार करण्याचा शब्द दिला. या शब्दाचा फारसा उपयोग झाला नाही.
निवडणुकीत वाईतून मतदारांनी शरद पवारांच्या उमेदवाराला मताधिक्य दिले. त्यामुळे नितीन पाटील यांच्यासाठी अजित पवारांनी दिलेला शब्द आता पाळला जाणार का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे; पण याचदरम्यान राज्यसभेच्या जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून, येत्या १३ जूनला अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे.
त्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून नितीन पाटील यांना राज्यसभेवर घेण्याबाबत सध्या चर्चा रंगली आहे; पण अद्यापपर्यंत त्यांना अर्ज भरण्यासाठी बोलावणे आलेले नाही. त्यामुळे सध्यातरी ते वेटिंगमध्ये आहेत.
कदाचित येत्या दोन दिवसांत याबाबत निर्णय होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे वाई तालुक्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या नजरा अजित पवारांच्या निर्णयाकडे लागल्या आहेत. सध्या वाईचे आमदार मकरंद पाटील हे बैठकींच्या निमित्ताने मुंबईत ठाण मांडून आहेत.
राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची राज्यसभेची जागा नितीन पाटील यांना मिळण्याबाबत चर्चा होती; पण आता भाजपचे पियुष गोयल हे लोकसभेवर निवडून आलेले आहेत. यापूर्वी ते राज्यसभेवर होते. त्यांची रिक्त होणारी जागा नितीन पाटील यांना मिळण्याची शक्यता आहे; पण ही जागा भाजपकडून राष्ट्रवादीला सोडली जाणार का? हाही प्रश्न महत्त्वाचा आहे.
याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भाजपच्या नेत्यांशी चर्चा सुरू आहे. त्यांनी केंद्रातही कॅबिनेट मंत्रिपद मागितले आहे. त्यामुळे भाजपच्या निर्णयावर सर्व काही अवलंबून आहे. सध्यातरी नितीन पाटील यांना राज्यसभेवर घेण्याबाबत त्यांना बोलावणे आलेले नाही. तेही सध्या वेट ॲण्ड वॉचवर आहेत. नितीन पाटील यांना राज्यसभेवर घेतल्यास साताऱ्यात दोन खासदार मिळतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.