''वंचित बहुजन आघाडी ही डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी बरखास्त करून डॉ. बाबासाहेबांचे वारस म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या मूळ पक्षात सामील व्हावे.''
सातारा : वंचित बहुजन आघाडी बरखास्त करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारावे. यामुळे आपल्या पक्षाची राज्यात ताकद वाढेल. तुमच्यासाठी मी स्वतः अध्यक्षपद सोडायला तयार आहे, असे खुले निमंत्रण केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री व रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी दिले.
रिपब्लिकन पक्षाच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानिमित्त मंत्री आठवले येथे आले होते. या वेळी शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी रिपब्लिकन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे, कार्याध्यक्ष बाबूराव कदम, सरचिटणीस गौतम सोनवणे, पर्यावरण विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण ढमाळ, जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड उपस्थित होते.
आठवले म्हणाले, ‘‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन ऑफ इंडिया व मजूर पार्टी या दोन पक्षांच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांना महाराष्ट्रात यश आले नाही. त्यांच्या महानिर्वाणानंतर त्यांच्या अनुयायांनी स्थापलेला पक्ष हा खरा रिपब्लिकन पक्ष आहे. आता आमच्या पक्षातील अन्य गटातटांनी मतभेद विसरून मूळ रिपब्लिकन पक्षांत सामील व्हावे. यामुळे राज्यात आपले राजकीय ऐक्य वाढेल.
वंचित बहुजन आघाडी ही डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी बरखास्त करून डॉ. बाबासाहेबांचे वारस म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या मूळ पक्षात सामील व्हावे. त्यांनी स्वतः राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारावे. त्यांच्यासाठी मी अध्यक्षपद सोडायला तयार आहे. मी दिलेल्या ऑफरवर प्रकाश आंबेडकर कधीही भाष्य करत नाहीत. त्यांनी एक पाऊल पुढे टाकावे. त्यांच्या पुढचे एक पाऊल टाकायला मी तयार आहे.’’
महायुतीने विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या तीन प्रादेशिक विभागात आठ जागा द्याव्यात. दोन महामंडळे आणि विधान परिषदेच्या १२ आमदारांमध्ये एक जागा रिपाईला सोडावी, अशी आमची मागणी असल्याचे सांगून रामदास आठवले म्हणाले, ‘‘विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या १७० जागा निवडून येतील. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत जाऊन आरक्षण संपविण्याची भाषा केली आहे. त्याचा फटका त्यांना विधानसभा निवडणुकांत बसेल. राज्यात काँग्रेसला यश मिळणार नाही.’’
जिल्ह्यामध्ये फलटण विधानसभा मतदारसंघाची आरक्षित जागा रिपाइंला मिळावी, अशी अपेक्षा आठवले यांनी व्यक्त केली. केंद्र शासनाने समान नागरी कायदा आणि वक्फ बोर्ड कायदा आणण्याची तयारी चालवली आहे. हे दोन्ही कायदे मुस्लिम समाजाच्या विरोधात नाहीत. वक्फ बोर्ड कायदा हा प्रस्थापितांची एकाधिकारशाही मोडून मुस्लिम समाजाला फायदा करून देणारा कायदा आहे. समान नागरी कायद्यामुळे हिंदू व मुस्लिम समाजामध्ये संबंध समन्वयाचे राहणार आहेत. या कायद्याविषयी गैरसमज पसरवला जाऊ नये, असेही मंत्री आठवले म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.