सातारा : येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होऊन उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे, या हेतूने आजपर्यंत चर्चेतून कागदावर आलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाची तड लावण्याची भूमिका खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आहे. त्यामुळे कृष्णा खोऱ्याची पूर्वीची 25 आणि नव्याने 45 एकर अशी एकूण 70 एकर जमीन हस्तांतरित करून वैद्यकीय महाविद्यालय उभे करण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे स्टेट आणि नॅशनल मेरिटच्या विद्यार्थ्यांनाही येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळावा, अशी इच्छा राहील अशा दर्जाचे कॉलेज उभे राहणार आहे.
साताऱ्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचा निर्णय तत्कालीन आघाडीच्या शासनाने घेतला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या महाविद्यालयाला सर्वप्रथम मंजुरी दिली. पण, जागेबाबत कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये रंगलेल्या राजकारणामुळे पाच वर्षे निघून गेली. पुन्हा युतीच्या शासनाच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा प्रश्न आला. त्यांनी जागा हस्तांतरित केली. पण, काम काही सुरू झाले नाही. कृष्णा खोऱ्याची 25 एकर जागा वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाकडे हस्तांतरित झाली. पण, ही जागाही महाविद्यालय उभारण्यासाठी अपुरी पडणार हे लक्षात आले. त्यामुळे श्री. फडणवीस यांनी दोन महिन्यांत महाविद्यालयाचे काम सुरू करतो, असे आश्वासन देऊनही ते पूर्ण करता आले नाही. तोपर्यंत त्यांचेही सरकार गेले. आता शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले आहे. आता पुन्हा साताऱ्याच्या वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न उपस्थित होऊन त्याबाबत खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत केवळ कागदावरच रंगलेल्या या वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न तडीस लावण्याचा निर्धार श्री. पवार यांनी केला आहे. त्यासाठी येत्या गुरुवारी (ता. दोन जुलै) जिल्ह्यातील आमदार, खासदारांसोबत बैठक घेऊन वैद्यकीय महाविद्यालयाचा नवीन आराखडा, वाढीव जागा, निधी आणि नवीन सूचनांचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यापूर्वीची सर्व प्रक्रिया अतिशय जलद गतीने करण्याची भूमिका श्री. पवार यांनी घेतली आहे.
साताऱ्याच्या वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी मिळताना केवळ 25 एकर जागेवर हे महाविद्यालय उभारले जाणार होते. परंतु, 100 प्रवेश क्षमता ठेवताना मुलांचे वसतिगृह, सुसज्ज प्रयोगशाळा, ग्रंथालये, मुख्य इमारत, लेक्चर हॉल आदी गोष्टी उभारताना जागेचा प्रश्न निर्माण झाला. आहे ही जागा अपुरी पडत असल्याने आता पूर्वीची 25 एकर आणि आता वाढीव 45 एकर अशा एकूण 70 एकर जागेवर हे महाविद्यालय उभारले जाणार आहे. त्यासाठी पुन्हा जलसंपदा विभागाकडून वाढीव 45 एकर जागा वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरित करावी लागणार आहे. त्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयाचा आराखडा होईल. त्यानंतर बांधकामास सुरवात होईल. साधारण वर्षाखेरीस ही सर्व कामे पूर्ण होऊन प्रत्यक्ष इमारत उभारणीचे काम सुरू होणार आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री पवार यांनी सर्व प्रक्रिया अतिजलद गतीने करण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे नवीन वर्षात वैद्यकीय महाविद्यालयाची उभारणी झालेली सातारकरांना पाहायला मिळण्याची आशा आहे.
राज्यातील प्रवासासाठी' हे' आवश्यक : गृहमंत्री अनिल देशमुख
सातारकरांच्या अपेक्षा जाणून घ्याव्यात
साताऱ्याचे वैद्यकीय महाविद्यालय उच्च दर्जाचे होण्यासाठी शासन व शासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पण, स्थानिक पातळीवर सातारकरांना काय अपेक्षित आहे, हेही जाणून घेतले जाणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी जनतेच्या तसेच काही वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांच्या अपेक्षा जाणून घेऊन त्यानुसार वैद्यकीय महाविद्यालयाची उभारणी करावी, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास 'येथे' समजणार
मराठा मोर्चा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या, गृहमंत्र्यांकडे मागणी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.