सातारा : गेल्या आठ दिवसांमध्ये जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 276 ने वाढल्याने चिंता वाढली आहेच. परंतु, जिल्ह्यातील एकूण 15 मृत्यूंपैकी या कालावधीमध्ये तब्बल 13 जणांचा मृत्यू झालेला आहे. सुरवातीच्या टप्प्यात तीनपेक्षा कमी असलेला मृत्यूदर या आठ दिवसांच्या कालावधीचा विचार केल्यास 4.7 ने वर गेला आहे. ही जिल्ह्यासाठी धोक्याची घंटा असून, वृद्ध व पूर्वीचे आजार असलेल्यांची खरोखरच अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाल्याचेच ही आकडेवारी सांगत आहे.
पहिल्या तीन लॉकडाउनमध्ये कडक केलेले नियम शासनाने चौथ्या लॉकडाउनमध्ये शिथिल केले. त्याचाच एक भाग म्हणून परजिल्हा तसेच राज्याबाहेर अडकलेल्या नागरिकांना आपल्या मूळ गावी जाण्यासाठी सवलत देण्यात आली. त्यामुळे कोरोनाची लक्षणे नाहीत ना, एवढ्या प्रमाणपत्रावर नागरिकांना प्रवास करण्यास मुभा देण्यात आली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांची ये- जा झाली. जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत ई-पासच्या साह्याने आलेल्या नागरिकांची संख्या एक लाखापेक्षा जास्त आहे. त्यामध्ये मुंबईहून आलेल्या नागरिकांचा सर्वांत जास्त सहभाग आहे. मुंबईकर तसेच गुजरातहून आलेले कोरोनाचे वाहक होते, हे आता समोर येताना दिसत आहे. 22 मार्चपासून एक दोन करत मागील आठवड्यापर्यंत कोरोनाचा आकडा कसा तरी दीडशेच्या जवळपास गेला होता. परंतु, गेल्या आठवड्याभरात जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने 400 चा टप्पा ओलांडला आहे. दररोज मोठ्या संख्येने नागरिक कोरोनाबाधित होत असल्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येकाच्याच काळजाचा ठोका चुकत आहे. जिल्हा प्रशासनाचीही त्यामुळे तारांबळ उडाली आहे.
19 मे रोजी जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 146 होती. कालपर्यंत (ता.27) कोरोनाबाधितांची संख्या 422 वर गेली आहे. म्हणजे या आठ दिवसांत कोरोनाबाधितांची संख्या 276 ने वाढली आहे. 22 मार्च ते 19 मे या कालावधीत नव्हती, त्यापेक्षा जास्त संख्या आठ दिवसांत झाली आहे. त्यामुळे जिल्हा पुन्हा "रेड झोन'मध्ये जातोय की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. परंतु, कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येपेक्षा जास्त भीतीदायक आहे, ती मृत होणारांची संख्या. 19 मे पर्यंत जिल्ह्यामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या केवळ दोन होती. त्यामुळे मृत्यूदर हा केवळ 1.7 वर होता. राज्य तसेच देशातील मृत्यूदराच्या तुलनेने तो अत्यंत कमी होता. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचे कौतुक होत होते. परंतु, केवळ आठ दिवसांत हे चित्र बदलले आहे. जशी कोरोनाबाधितांची संख्या 276 गेली तशीच मृत्यूची संख्याही वाढली आहे. गेल्या आठ दिवसांत 13 जणांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे कोरोनाचा गेल्या आठवड्यातील मृत्यूदर हा 4.7 वर गेलेला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये वृद्धांचा समावेश आहे. परंतु, 50 ते 60 वयोगटातील नागरिकांचाही समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.