सातारा : बहिणीला त्रास देत असल्याच्या कारणावरून रामनगर (ता. सातारा) येथील एका युवकाचा खून करून मृतदेह जाळल्याप्रकरणी तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. आज सकाळी साडेनऊच्या सुमारास शहरातील खंडोबाचा माळावर जळालेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्यानंतर अवघ्या काही तासांच्या आतच संशयितांचा छडा लावल्याबद्दल पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अभिनंदन केले आहे. विक्रांत उर्फ मन्या उमेश कांबळे (वय 19), तेजस नंदकुमार आवळे (वय 19) व संग्राम बाबू रणपिसे (वय 28, सर्व, रा. रविवार पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत, तर आकाश ऊर्फ रॉजर राजेंद्र शिवदास (रा. रामनगर, ता. जि. सातारा) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
आज सकाळी साडेनऊच्या सुमारास खंडोबाचा माळ येथे एक जळालेल्या अवस्थेमधील मृतदेह आढळून आला. त्याबाबतची माहिती मिळाल्यानंतर घटनेचे गांभीर्य ओळखत अधीक्षक बन्सल, अतिरिक्त अधीक्षक धीरज पाटील, सहायक पोलिस अधीक्षक आँचल दलाल, एलसीबीचे निरीक्षक किशोर धुमाळ, तसेच एलसीबीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी तत्काळ भेट दिली. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर प्रथमदर्शनी मृतदेह मुलीचा असल्याचे वाटत होते. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी एलसीबीचे सहायक निरीक्षक रमेश गर्जे व आनंदसिंग साबळे यांच्या नेतृत्वाखाली तपास पथक स्थापन करण्यात आले. या पथकाने परिसरातील साक्षीदारांकडे केलेल्या चौकशीमध्ये मृतदेह आकाशचा असल्याचे समोर आले. त्यानंतर त्याचे कोणाशी वैर किंवा भांडण झाले होते का, याची चौकशी करण्यात आली. त्यानुसार संशयितांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीमध्ये आकाश हा विक्रांतच्या बहिणीला त्रास देत होता. त्यावरून काल रात्री संशयितांनी डोक्यात दगड घालून त्याचा खून केला, तसेच त्याचा मृतदेह जाळून टाकल्याचे समोर आले.
सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे, आनंदसिंग साबळे, उपनिरीक्षक मदन फाळके, सहायक फौजदार जोतिराम बर्गे, उत्तम दबडे, हवालदार कांतिलाल नवघणे, अतिश घाडगे, संतोष पवार, संजय शिर्के, विजय कांबळे, संतोष सपकाळ, शरद बेबले, साबीर मुल्ला, प्रवीण फडतरे, नीलेश काटकर, गणेश कापरे, मुनीर मुल्ला, प्रवीण पवार, अमित सपकाळ, रोहित निकम, सचिन ससाणे, विशाल पवार, मोहसीन मोमीन, वैभव सावंत, गणेश कचरे, पंकज बेसके हे या कारवाईत सहभागी होते. तपासामध्ये जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल खाडे यांनी सहकार्य केले आहे.
संपादन : बाळकृष्ण मधाळे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.