कास : आपल्या अलौकिक निसर्ग सौंदर्याने जगभरातील पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या कासचा एक वेगळा, नवीन अनुभव पर्यटकांना घेता येणार असून नाईट सफारीचा आनंद लुटता येणार आहे. कास पठार हे पश्चिम घाटातील सर्वात जास्त जैवविविधता असणारे ठिकाण आहे. युनोस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीत समाविष्ट असलेले कास पठार रंगीबेरंगी फुलांच्या गालिचांसाठी प्रसिद्ध आहे.
येथे जून ते ऑक्टोबर दरम्यान विविध दुर्मिळ व रेड डाटा बुकमधील अतिदुर्मिळ प्रजातींच आयुष्य फुलतं. फुलांबरोबरच येथील घनदाट जंगलात हजारो प्रकारची विविध वृक्षसंपदा विपूल प्रमाणात आहे. या वृक्षसंपदेमुळे येथील प्राणीजीवन समृद्ध आहे. येथील जंगलात बिबट्या, अस्वल, सांबर, रानकुत्री, साळींदर, रानडुक्कर, भेकर, पिसोरी, रानगवे, खवले मांजर, काळींदर, कोल्हे, रानगवे, ससे, रानकोंबडे अशी प्राणीसंपदा पाहायला मिळते. तसेच विविध जातींचे पक्षी, सरपटणारे प्राणी, फुलपाखरे ईत्यादी वनसंपदा ही मोठ्या प्रमाणात आहे.
याच विपूल निसर्ग संपदेच दर्शन पर्यटकांना या जंगल सफारीच्या माध्यमातून कास पठार कार्यकारी समिती व वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येणार आहे. फक्त फुलांच्या हंगामात कास पठारावर लाखो पर्यटकांची वर्दळ असते, पण इतर वेळी पर्यटक संख्या कमी होत असल्याने स्थानिकांना रोजगार व बारमाही पर्यटन ही संकल्पना लक्षात घेऊन उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली या नाईट सफारीचे नियोजन करण्यात आले आहे.
या नाईट सफारीसाठी खास बनवलेल्या दोन गाड्या तयार करण्यात आल्या असून एकावेळी आठ जणांना यामध्ये बसता येणार आहे. पूर्णपणे मोकळ्या असलेल्या गाडीत उंचावर आसन व्यवस्था करण्यात आली असून आजूबाजूला सर्व परिसर दृष्टीस पडणार आहे. सोबत कास कार्यकारी समितीचे गाईड व सुरक्षाव्यवस्था असणार आहे. पर्यटकांना जास्तीत जास्त भाग दाखवण्याबरोबर सुरक्षेची काळजी घेतली जाणार आहे. या जंगल सफारीच्या बुकींग साठी वनविभागाच्या www.kas.ind.in या वेबसाईटवर बुकींग सुविधा उपलब्ध असणार आहे.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पासारख्या ठिकाणी असणारी जंगल सफारी कास परिसरात सुरू होत असल्याने येथील पर्यटन वाढीस चालना मिळणार असून पर्यटकांना ही येथील जैवविविधतेचे दर्शन होवून रात्रगस्तीचे काम होणार आहे. या गाड्या परिसरातील जंगलात फिरणार असल्याने चोरट्या शिकारीस आळा बसणार आहे. असा असेल मार्ग - कास पठार कार्यालयापासून सफारीची सुरूवात होवून घाटाई फाटा - घाटाईदेवी मंदिर - वांजुळवाडी मार्गे कास तलाव.
तेथून कास गावाच्या पुढील तांबी फाट्यातून आत जावून पाली, तांबी, धावली, जुंगटी गावातून निबीड अशा कात्रेवाडी गावापर्यंत गाड्या जाणार आहेत. कात्रेवाडी येथील वनविभागाच्या टेहळणी मनोर्यावरून पाहणी करून पुन्हा गाड्या माघारी फिरतील. पुनः तांबी फाट्यावरून अंधारी गावातून सह्याद्रीनगर या ठिकाणी सफारी येईल. येथील परिसर दर्शन करून कुसुंबीमुरा - एकीव मार्गे पुन्हा गाड्या मूळस्थानी कास पठारावर येतील. सायंकाळी सात वाजल्यापासून पुढे स्थानिक परिस्थिती पाहून नाईट सफारी चालू होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.