सातारा : कारखानदारांनी अद्यापही ऊस दर जाहीर केला नाही, तसेच एफआरपीचे तुकडे न करता एकरकमी शेतकऱ्यांना पैसे देण्यासही नकार दिल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकऱ्यांनी जिल्हाभरातील कारखान्यांवर गाळपासाठी चाललेले ऊस वाहतुकीचे ट्रॅक्टर रोखून धरले आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या अनेक भागांत उसाची वाहने रस्त्यावरच उभी असल्याचे चित्र दिसून येत आहे.
मागील देय रक्कम व एकरकमी एफआरपी देण्यास कारखानदारांनी नकार देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप सर्वच शेतकरी संघटनांनी केला आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली कारखानदार व शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांत बैठक झाली. मात्र, बैठकीत तोडगा न निघाल्याने शेतकरी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिल होता. त्यानुसार जिल्ह्यात शुक्रवारी सर्वत्र ऊस वाहतुकीचे ट्रॅक्टर अडविण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सह्याद्री सहकारी साखर कारखाना, जयवंत शुगर, अजिंक्यतारा व इतर कारखान्यांना गाळपासाठी जाणारी वाहतूक रोखून धरल्याचे दिसून आले. कारखानदारांनी मागण्या मान्य न केल्यास पुढील काळात कारखानदार व शेतकरी संघटनांच्यात संघर्षाचे चित्र दिसून येणार आहे.
‘‘कारखानदार जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. बहुतांश कारखान्यांनी मागील हंगामातील संपूर्ण ऊसबिलांची रक्कम शेतकऱ्यांना दिली नसून, यंदाही एकरकमी एफआरपी देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे संघटनेने तीव्र लढा सुरू केला असून, शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत उसाचे गाळप सुरू करू देणार नाही.’’
- राजू शेळके, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.