मायणी (जि. सातारा) : पानाफुलांनी नटलेल्या झाडवेली, साद घालणारा तलावाचा जलाशय, निरव शांतता भेदणारा नानाविध पक्ष्यांचा किलबिलाट, ऊन-पावसाच्या पाठशिवणीच्या खेळात रंगून जाणारे आणि निसर्गाच्या हिरव्यागार कुशीत स्वतःला हरवून जाणारे आबालवृद्ध. श्रावण महिन्यातील हे चित्र प्रतिवर्षी येथील पक्षी अभयारण्यात पाहावयास मिळते. यंदा मात्र तेच अभयारण्य कोरोनामुळे पर्यटकाविना सुनेसुने झाल्याचे निदर्शनास आले.
प्रतिवर्षी श्रावणाची चाहूल लागताच मायणीकर नागरिक आणि परिसरातील गावोगावच्या निसर्गप्रेमींची पावले येथील पक्षी अभयारण्याकडे वळत असतात. शाळकरी विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनाच हा परिसर साद घालत असतो. त्यामुळे एकदिवसीय श्रावण सहलीच्या निमित्ताने तर कोणी वनभोजनाच्या निमित्ताने अभयारण्य व तलाव परिसरात हमखास भटकंतीला येत असतात. अगदी शेजारील सांगली जिल्ह्यातून अनेक निसर्गप्रेमी येथे आवर्जून भेट देत असतात.
हिरव्यागार वनराईने नटलेल्या परिसरात, झाड वेलीतून वाट काढत तलावाच्या बांधावरून भटकंती करत असतात. पक्षी निरीक्षणासाठी उभारलेल्या मनोऱ्यावरून आसुसलेल्या डोळ्यांमध्ये विस्तीर्ण जलाशय साठवत असतात. जलाशय न्याहाळत न्याहाळत अखेर सांडव्यावरून कोसळणाऱ्या जलधारा अंगावर झेलण्याचा मनमुराद आनंद लुटत असतात. बाळगोपाळ व शाळकरी मंडळी छोटेखानी बागेत मनसोक्त खेळत असतात. अखेर पोटात कावळे ओरडू लागतात, गवताच्या गालिच्यावर बसून सहभोजनाचा आस्वाद घेत असतात. त्याच वेळी ऊन-पावसाचा पाठशिवणीचा खेळही अनुभवत असतात. क्षितिजावर उमटलेल्या सप्तरंगी इंद्रधनुच्या रंगात रंगून जात असतात.
आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे याचा प्रत्यक्ष अनुभव घेत असतात. हे चित्र प्रतिवर्षी श्रावण महिन्यामध्ये येथील अभयारण्यात पाहायला मिळते. मात्र, यंदा कोरोनाच्या भीतीने लोकांच्या त्या आनंदावर पाणी फिरले. शाळा बंद असल्यामुळे तेथे श्रावण सहली गेल्या नाहीत. लोकांनी वनभोजनाचे नियोजन केले नाही. स्थानिक नागरिकांसह परिसरातील निसर्गप्रेमींनीही अभयारण्याकडे पाठ फिरवली. जिल्हाहद्द बंदीमुळे शेजारील जिल्ह्यातून येणारे पर्यटकही आले नाहीत. अभयारण्याच्या प्रवेशद्वारावर खाद्यान्नाचे स्टॉल लावणाऱ्या व्यावसायिकांनीही तिकडे कानाडोळा केला. परिणामी संपूर्ण श्रावण महिना अभयारण्य परिसर सुनासुना झाल्याचे निदर्शनास आले.
""कोरोनामुळे कधी नव्हे ते यंदा पक्षी अभयारण्य परिसर निर्मनुष्य झाल्याचा अनुभव आला.''
-महेश जाधव व दत्ता कोळी, निसर्गमित्र, मायणी
संपादन : पांडुरंग बर्गे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.