काशीळ (जि. सातारा) : वर्षभर बकरी ईद सणाची वाट पाहणाऱ्या शेळीपालकांवर कोरोनामुळे संकट आले आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मुंबई, पुणे यांसारख्या प्रमुख शहरांत बोकाडांची खरेदी-विक्री होत नसल्यामुळे सणाच्या दृष्टीने तयार केलेले बोकड ठेवायचे की कवडीमोल दराने विक्री करायचे, हा प्रश्न उभा राहिला आहे. एकूणच शेळीपालक शेतकऱ्यांनी कोणताही
मार्ग स्वीकारला तरी आर्थिक हानी निश्चित होणार आहे.
जिल्ह्यात शेतीलापूरक म्हणून शेळीपालनाचा व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. यामध्ये खास करून उच्चशिक्षित तरुणांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. याच्यासह परंपरागत दुष्काळी भागातील शेतकरी तसेच बागायत शेती करणारे शेतकरी कमी अधिक स्वरूपात हा व्यवसाय करत आहेत. मटण व्यवसायात बोकडांची मागणी असते. मात्र, सध्या जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या लॉकडाउनमध्ये मटण व्यवसायास जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातल्याने व त्यानंतर स्थानिक बाजार बंद ठेवल्याने बोकाडांची खरेदी-विक्री ठप्प झाली होती.
मागील राज्य आणि केंद्राच्या लॉकडाउनमध्ये मटण विक्रीस परवानगी दिल्याने काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला होता. मात्र, शेळीपालन व्यवसाय हा ब्रिडिंग व बकरी ईद या सणाच्या दृष्टिकोनातून केला जातो. बकरी ईदला बिर्याणीसाठी जास्तीत जास्त वजनाच्या म्हणजे 30 किलोच्या पुढच्या वजनाच्या बोकडाला मागणी असते. या दृष्टीने जिल्ह्यातील अनेक शेळीपालक बोकडांचे पालन करत असतात. यावर्षीही शेळीपालकांनी जास्त वजनाची बोकडे तयार केली आहेत. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेला लॉकडाउन व शेळी-मेंढ्यांचे विस्कळित बाजार तसेच जिल्हाबंदीमुळे शहरी मुस्लिम बांधव येऊ शकत नसल्यामुळे बोकडांचे व्यवहार जवळपास ठप्प झालेले आहेत.
तसेच कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने बकरी ईद साध्या पध्दतीने साजरी करण्याचे आवाहन केले आहे. या सर्व गोष्टींचा शेळीपालकांच्या अर्थकारणावर अनिष्ट परिणाम होऊ लागला आहे. वर्षभर बकरी ईद सणाच्या आशेवर वजनदार तयार केलेल्या बोकाडांचे करायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. वजनदार केलेली बोकडे भविष्यात कमी किमतीने अथवा पुढील सणापर्यंत या बोकडांचा सांभाळ करण्याचा पर्याय शोधावा लागणार आहे. मात्र, या दोन्हीतील कोणताही पर्याय स्वीकारला तरी नुकसान नक्कीच होणार असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत येणार आहे. यामुळे या प्रकल्पासाठी काढलेले कर्ज थकणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
""माझा शेळीपालन प्रकल्प असून, गतवर्षी बकरी ईदच्या सणास मुंबई, पुणे या शहरांतील ग्राहकांना 40 नगांची विक्री करत आठ ते दहा लाखांची उलाढाल झाली होती. यावर्षी कोरोनामुळे
चार ते पाच नगांची कशीतरी विक्री झाली असून, 40 नग शिल्लक आहेत.''
-सुमित गरुड, जिंती, ता. फलटण
संपादन : पांडुरंग बर्गे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.