पाटण (जि. सातारा) : रोजगार हमी योजनेची सांगड घालून राबविण्यात येणाऱ्या वृक्षलागवड योजनेच्या बिहार पॅटर्नमध्ये तालुक्यातील 130 ग्रामपंचायतींनी प्रस्ताव दाखल केले असून, प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली आहे. वृक्ष लावणे व सलग तीन वर्षे त्याची निगा राखणे व त्यातून गावातील एका कुटुंबाला तीन वर्षे रोजगार उपलब्ध करून देणे असा या पॅटर्नचा हेतू असून, साधारण 30 हजार वृक्षांची लागवड यावर्षी करण्यात आली आहे.
सेवाभावी संस्था, शासन, ग्रामपंचायती व वन विभाग प्रत्येक वर्षी पावसाळ्यात वृक्ष लावतात. परंतु, त्यापैकी पाच टक्केसुद्धा वृक्षांचे संगोपन होत नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या युती शासनाने शतकोटी वृक्षलागवडीचा उपक्रम राबविला. मात्र, तो यशस्वी झाला नाही. पाटण पंचायत समितीने मात्र वृक्षलागवडीसाठी बिहार राज्यात राबविलेला व यशस्वी झालेला रोजगार हमी योजनेच्या माध्यमाचा वापर केलेला वृक्षलागवडीचा "बिहार पॅटर्न' राबविण्याचा निर्णय सभापती राजाभाऊ शेलार यांच्या पुढाकारातून घेतला आहे.
एक ग्रामपंचायत या पॅटर्नमध्ये 200 झाडे लावणार असून, गावातील एका कुटुंबाला (दोन मजूर) या पॅटर्नमध्ये रोजगार हमी योजनेचा लाभ मिळणार आहे. संबंधित कुटुंबाने खड्डे काढणे, झाडे लावणे, त्याला कुंपण करणे, झाडाभोवताली भांगलण करणे, उन्हाळा व हिवाळ्यात त्या झाडांना गरजेनुसार पाणी घालणे व वणव्यापासून झाडांचे संरक्षण करणे ही कामे सलग दोन वर्षे नऊ महिने करावयाची आहेत. रोजगार हमी योजनेचे मस्टर ठरलेल्या निकषाप्रमाणे पूर्ण करणे या योजनेत महत्त्वाचे असून, रोजगार हमी योजनेतून एका माणसाला एका दिवसाची 238 रुपये मजुरी मिळणार आहे.
वर्षभरात एका कुटुंबाला आपली घरची व शेतातील कामे करून हे काम जबाबदारीने केले तर वर्षाला 40 हजार रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. वनकुसवडे पठारावरील घाणबी या गावात गतवर्षी प्रायोगिक तत्त्वावर 250 झाडे लावली होती. त्याची देखभाल राजेंद्र ज्ञानू सोनवले व बबन रामचंद्र सोनवले यांनी काळजीपूर्वक घेतल्याने 250 पैकी 230 झाडे जगलेली पाहावयास मिळत आहेत. वृक्षलागवडीसाठी परदेशी झाडे न वापरता स्थानिक जंगली झाडे, चिंच, आवळा त्याचबरोबर चार रोपामागे एक फळझाड लावले तरी चालेल, असा त्यामधील निकष असून खत, खड्डे व झाडांसाठी वेगळा निधी संबंधित ग्रामपंचायतींना मिळणार आहे. 90 टक्केपेक्षा जास्त झाडे संबंधित कुटुंबाने जगविणे अपेक्षित आहे. नाही तर लाभापासून त्यास वंचित राहावे लागणार आहे.
यावर्षी तालुक्यातील 130 ग्रामपंचायतींनी बिहार पॅटर्नमध्ये सहभाग घेतला आहे. काही गावांनी 200 झाडे लावण्यासाठी प्रस्ताव दिले असून, गोठणे ग्रामपंचायतीने चार कुटुंबांसाठी एक हजार झाडे, शिरळ व नारळवाडी ग्रामपंचायतींनी तीन कुटुंबांना रोजगार देण्यासाठी 600 झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून बिहार पॅटर्न यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायतींनी कंबर कसली असून सलग तीन वर्षे खात्रीशीर रोजगार मिळणारा हा पॅटर्न पाटण तालुक्याच्या नैसर्गिक संपदेत भर घालण्यासाठी राज्याला दिशा देणारा असेल.
""लोकांना खात्रीशीर रोजगार व शासनाच्या वृक्षलागवडीला दिशा देणारा रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून हा पॅटर्न राबविण्यात येणार आहे. पडीक जमीन मुबलक असून तालुक्यातील लोकांची कष्ट करण्याची तयारी असल्यामुळे हा प्रकल्प यशस्वी होईल, याची खात्री आहे. ग्रामपंचायतींनी चांगला सहभाग घेतला असल्यामुळे तालुक्यात वृक्षलागवड चळवळ जोर धरेल असे वाटते.''
-राजाभाऊ शेलार,
सभापती, पंचायत समिती, पाटण
संपादन : पांडुरंग बर्गे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.