सायगाव : जावळी तालुक्यात गेल्या महिनाभरापासून होत असलेल्या राजकीय घडामोडी राजकारणाची समीकरणे बदलवणारी ठरणार का, याचे औत्सुक्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने या मतदारसंघात भाजपविरोधात पक्षाची नियोजित बांधणी सुरू केली असून, माजी शिक्षण समिती सभापती अमित कदम यांचा अजित पवार यांच्या उपस्थितीत होणारा पक्षप्रवेश त्याचाच एक भाग मानला जातो. राष्ट्रवादीची ही पावले आगामी निवडणुकांत भाजपला धोबीपछाड देण्यात यशस्वी होणार का? हे नजीकच्या काळात स्पष्ट होणार आहे.
सातारा-जावळी मतदारसंघात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपल्या विकासकामांमुळे आणि सर्वसामान्य जनतेशी थेट संवाद ठेवत आपली पकड घट्ट केली आहे. त्यांनी उभी केलेली विकासकामे पाहता जनता त्यांच्या पाठीशी उभी राहील, असेही दिसत आहे. त्याअनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येदेखील त्यांनी विशेष लक्ष देऊन या संस्था आपल्या ताब्यात ठेवल्या आहेत.
तालुक्याचे किंगमेकर नेते वसंतराव मानकुमरे यांनी गेल्या सभेत सांगितले होते, की आम्ही सर्वजण मिळून बाजार समिती निवडणूक बिनविरोध करू. मात्र, बाजार समिती निवडणुकीत दाखल झालेले विक्रमी १२१ अर्ज पाहता काय होऊ शकते, हे देखील दिसत आहे. त्यावेळी त्यांनी अमित कदम लढवणार असलेल्या आमदारकीबद्दलही बोलणे केले होते. सध्याच्या घडामोडींमुळे मात्र, भाजपच्या गोटात खळबळ निर्माण झाली असल्याचे दिसत आहे.
गेल्या चार वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. जावळीच्या भूमिपुत्राचा आमदार शशिकांत शिंदे यांचा कोरेगाव विधानसभा मतदारसंघात झालेला पराभव पाहता राष्ट्रवादी काँग्रेस व आमदार शिंदे यांना मानणारा वर्ग पुन्हा नव्या जोमाने कामाला लागला आहे. मात्र, या वेळी आमदार शिंदे यांनी देखील धरसोड पद्धतीने कार्यकर्त्यांना ताकद न देण्याची पद्धती बदलून कार्यकर्त्यांना मजबूत बळ दिले पाहिजे. गेल्या वेळी भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसमधून लढलेल्या दीपक पवार यांना चांगली मते मिळाली होती.
यावरून जावळी तालुक्यात आजही राष्ट्रवादी काँग्रेसला मानणारा गट अबाधित असल्याचे दिसत आहे. त्यातच अमित कदम यांचा आज होणारा पक्षप्रवेश आगामी प्रत्येक निवडणुकीत भाजपसाठी धोक्याची घंटी वाजवणारा ठरू शकतो. अमित कदम यांना जावळी तालुक्यात प्रत्येक विभागात मानणारा वर्ग आहे. त्या बळावर व (कै.) आमदार जी. जी. कदम यांच्याप्रती असणारे जनतेचे प्रेम अमित कदम यांना सहानुभूती ठरू शकणार आहे. दीपक पवार यांचीही भूमिका या वेळी महत्त्वाची ठरणार असून, या सर्व परिस्थितीची राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना सांगड घालून पक्षासाठी तगडा उमेदवार उभा करावा लागणार आहे. मात्र, त्याअगोदर होणाऱ्या प्रत्येक स्थानिक निवडणुकीत राष्ट्रवादीला एकसंधपणे आपली ताकद दाखवून द्यावी लागणार आहे.
अजित पवार यांच्या उपस्थितीत होणारा आजचा मेळावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निश्चित बळकटी देणारा ठरू शकतो. आजच्या मेळाव्यात येथील राजकारणाची दिशा ठरविण्याची निश्चितच ताकद आहे. महाविकास आघाडीच्या सत्ता काळात आमदार शिवेंद्रसिंहराजे यांना भरभरून निधी दिलेले अजित पवार आता जावळीतील पक्षसंघटना मजबूत राखण्यासाठी कार्यकर्त्यांना कोणता कानमंत्र देणार हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.
जावळी-महाबळेश्वर बाजार समितीमध्ये जरी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, वसंतराव मानकुमरे यांची मजबूत पकड निर्माण झाली असली, तरी बदललेली राजकीय समीकरणे पाहता आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, दीपक पवार, अमित कदम, राजेंद्र राजपुरे यांच्यामुळे नक्कीच भाजपला धोबीपछाड मिळू शकतो.
या वेळी जर निवडणूक लागलीच, तर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मात्र, पोपटपंची करणारे कोण व एकनिष्ठ राहणारे कार्यकर्ते कोण याची पक्की ओळख होणार असून, त्यानुसार आगामी जिल्हा परिषद-पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीसाठी मताचे पॉकेट असणारे प्रामाणिक कार्यकर्ते सोबत ठेवावे लागणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.