सातारा: कोरोनाच्या संकटात ग्रामीण भागातील गरजू लोकांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेने तारले आहे. कोरोनाच्या काळात या योजनेच्या माध्यमातून २०२१-२२ या वर्षात जिल्ह्यात २७ हजार कुटुंबांतील ४६ हजार मजुरांना रोजगार मिळाला आहे. त्यामध्ये मजुरांच्या खात्यामध्ये सुमारे २१ कोटी ३४ लाख रक्कम जमा करण्यात आली आहे. या योजनेमुळे बहुतांश गावे स्वयंपूर्ण व स्वावलंबी बनत चालली आहेत.
गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत देशभरात कोरोनाच्या प्रादुर्भाव वेगाने सुरू होता. या काळात अनेकदा लॉकडाउन केल्याने शहरात नोकरी अथवा मोलमजुरीसाठी गेलेल्या कित्येकांना नाईलाजास्तव गावाकडची वाट धरावी लागली आहे. त्यामुळे राज्यांतर्गत नागरिकांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होताना दिसून आले. आता कोरोना आटोक्यात आला तरी गावकडचा रस्ता धरलेले मजूर पुन्हा शहराकडे जाण्यास धजावत नाहीत. या दोन वर्षांच्या कोरोनाच्या संकटात ग्रामीण भागात रोजगार हमी योजनेतून मजुरांना मोठ्या प्रमाणात काम मिळाल्याने उदरनिर्वाह चालू आहे. या योजनेत मजुरांना दिवसाला २४८ रुपये मिळत असून, काम केल्यानंतर केंद्र शासनाच्या सूचनेनुसार १५ दिवसांच्या आत १०० टक्के मोबदला देणे बंधनकारक आहे. त्यामुळे मजुरांना कामाचा मोबदला लवकर मिळत असल्याने कुटुंबाचा उदनिर्वाह चालविणे सोईचे ठरत आहे.
दरम्यान, २०२१-२२ या वर्षात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात पाच हजार ८४८ कामे सुरू करण्यात आली आहेत. त्यामधील पाच हजार १७० कामे पूर्ण करण्यात आली आहेत. तसेच, या योजनेंतर्गत सुमारे २४ कोटी खर्च करण्यात आला आहे. त्यातील ५४ टक्के खर्च नैसर्गिक साधनसंपत्ती संबंधित
कामावर, ७१ टक्के खर्च वैयक्तिक कामे, ५९ टक्के खर्च कृषी व संलग्न कामावर खर्च करण्यात आला आहे. तसेच, कृषी विभागामार्फत २२५८.८९ हेक्टर क्षेत्रावर फळबागांची लागवड करण्यात आली असून, त्याद्वारे जिल्ह्यातील तीन हजार २५३ शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. रेशीम विभागामार्फत १६५ एकर क्षेत्रावर तुती लागवड केली आहे. जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींमार्फत तीन हजार १८० लाभार्थ्यांना घरकुलाचे काम, ५९० लाभार्थ्यांना शोषखड्डे, २७२ लाभार्थ्यांना शौचालये, तर ७३ लाभार्थ्यांना सिंचन विहीर कामांचा लाभ देण्यात आला आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील ८९ पाणंद रस्ते, १६५ वृक्षलागवडीची कामे, तर पशुसंवर्धनाशी निगडित ५६ कामे सुरू करण्यात आली आहेत.
कोरोनाच्या काळात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे. पुढील काळातही जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी १६ लाख ३० हजार मजूर क्षमता असलेल्या सात हजार २९१ कामांचा कोटा मंजूर करून ठेवण्यात आला आहे.
- विजया यादव, उपजिल्हाधिकारी
पुढील वर्षासाठी ‘समृध्दी बजेट’
जिल्ह्यात सद्य:स्थितीत रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून एक हजार ३२ कामे सुरू असून, चार हजार ५९२ मजूर कार्यरत आहेत. त्यामध्ये जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायत विभागाकडील ४१९ कामे, घरकुले- ५८, वृक्षलागवड- २१८, रस्ते- ३२, कृषी विभागामार्फत फळ लागवडीची ५८२, गांडूळ खत- ९९ अशी कामे सुरू आहेत. २०२२-२३ मध्ये ७२ लाख मनुष्य दिवस निर्मितीसाठी ‘समृध्दी बजेट’ तयार करण्यात आले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.