सातारा : जिल्ह्यातील १ लाख ८४ हजार कृषिपंपधारकांकडून वीज वितरण कंपनीला ६१२ कोटी रुपयांची येणेबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठीचा आराखडा तयार होत असतानाच दैनंदिन कामादरम्यान वापरण्यात येणाऱ्या वीजभाराची त्यात वाढ होत आहे. शेतकऱ्यांकडे असणारी ही थकबाकी कशा पध्दतीने वसूल करणार? यावर वीज वितरणची आर्थिक गणिते अवलंबून आहेत.
शेतीसह इतर शेती उपयोगी कारणांसाठी वीज वितरण कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांना कृषिपंप जोडण्या देण्यात येतात. जोडण्या मिळाल्यानंतर पाणी उपशासाठीची आवश्यक ती यंत्रणा उभारत शेतकरी शेतीत बारमाही पिकांचे नियोजन करतो. कोरोना, लॉकडाउन व इतर कारणांमुळे मध्यंतरीच्या काळात शेतीसह शेतीपूरक व्यवसायांचे आर्थिक गणित पुरते कोलमडले होते. या नुकसानीतून सावरण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांसाठी विविध योजना जाहीर केल्या आहेत. यानुसार शेतकऱ्यांनी या काळात वापरलेल्या विजेच्या बिलांबाबतचे शासनाने कृषी वीज धोरण जाहीर करत विलंब शुल्क आणि व्याजात सूट दिली होती. या धोरणामुळे काहीअंशी वसुली होण्यास मदत झाली. तरीही, वीज वितरण कंपनीपुढील अडचणी कमी झाल्या नसल्याचे दिसून येते.
थकबाकी वसुलीतील अडचणी वाढत गेल्यास आगामी काळात वीज वितरणच्या कामावर मर्यादा येणार आहेत. या अडचणी कमी होऊन शेती साठीचा अखंडित वीजपुरवठा राहण्यासाठी शेतकऱ्यांनी थकबाकी तत्काळ भरण्याचे आवाहन वीज वितरण कंपनीच्या वतीने केले आहे.
यामध्ये सर्वाधिक ३० हजार १६४ थकबाकीदार फलटण तालुक्यात तर सर्वांत कमी १ हजार ९९६ महाबळेश्वर तालुक्यात आहेत. एक लाख ८३ हजार ८६५ जणांकडून कृषी वीज धोरणानुसार सुधारित थकबाकीनुसार वीज वितरण कंपनीला ६१२ कोटी रुपये येणेबाकी आहे.
कठोर उपाययोजना...
शेतकऱ्यांकडून वीज वितरणला ६१२ कोटी येणेबाकी आहे. त्यात चालू बिलांची भर पडली आहे. चालू बिलांची थकबाकी सुमारे ३८८ कोटींच्या घरात आहे. गत थकबाकी आणि चालू बिलांचा आकडा १ हजार कोटींच्या पुढे जात आहे. जिल्ह्यातील थकबाकीचा हा आकडा १ हजार कोटींच्या घरात असल्याने त्याच्या वसुलीसाठी वीज वितरण कंपनी आगामी काळात कठोर उपाययोजना राबविण्याच्या तयारीत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.