वडूज (जि.सातारा) : लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत खटाव तालुक्यातील सात जणांनी विविध परीक्षांत उज्ज्वल यश मिळविले आहे. तालुक्याच्या विविध भागांतील या सात जणांनी मिळविलेल्या या यशामुळे तालुक्याने सप्तरंगी यश संपादन केले आहे.
एनकूळ येथील श्वेता विष्णूपंत खाडे यांची पोलिस उपअधीक्षकपदी निवड झाली आहे. सद्या त्या कोल्हापूर येथे राज्य उत्पादन शुल्क विभागात पोलिस उपनिरीक्षकपदावर कार्यरत आहेत. पाटबंधारे विभागातील निवृत्त अधिकारी विष्णूपंत खाडे यांच्या त्या कन्या, तर प्रा. अर्जुनराव खाडे यांच्या पुतणी व सोसायटीचे सचिव राजेंद्र खाडे यांच्या चुलत भगिनी आहेत. त्यांचे शालेय शिक्षण एनकूळ, वडूज, तर उच्च शिक्षण कोल्हापूर येथे झाले आहे.
नढवळ येथील अश्विनकुमार श्रीमंत माने यांचीही राज्य उत्पादन शुल्क विभागात पोलिस उपअधीक्षकपदी निवड झाली आहे. मुंबई महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागातील वरिष्ठ अधिकारी डॉ. मनोज माने यांचे ते चुलत बंधू आहेत.
चिंचणी येथील अभय अशोक घोरपडे यांची तहसीलदारपदी निवड झाली आहे. पुणे येथील एमआयटी कॉलेजमध्ये बी. ई. इलेक्ट्रॉनिक्स पदवी घेऊन त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला होता. बाजार समितीचे माजी सभापती व विद्यमान संचालक सुनील घोरपडे यांचे ते बंधू आहेत.
गारवडी येथील राजेश कदम व योगेश कदम या दोन बंधूंनीही उल्लेखनीय यश संपादन करून गटविकास अधिकारी वर्ग-एक, अथवा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर मजल मारलेली आहे. सातारा येथील महाराजा सयाजीराव कॉलेजचे निवृत्त उपप्राचार्य विलासराव कदम आणि माध्यमिक शिक्षिका पुष्पा कदम यांचे ते सुपुत्र आहेत. राजेश यांनी लोणेरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेजमध्ये तर योगेश यांनी अंधेरी येथील एस. पी. कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगची डिग्री घेवून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला होता. योगेश यांनी पहिल्या प्रयत्नात नगरपंचायतीचे मुख्याधिकारी व सहायक गटविकास अधिकारी या दोन ठिकाणी यश मिळविले होते. यापैकी त्यांनी मुख्याधिकारीपदाला प्राधान्य देवून हातकणंगले (जि. कोल्हापूर) येथील नगरपंचायतीचे मुख्याधिकारी म्हणून कारकिर्द सुरू केली होती. सद्याही त्याच ठिकाणी ते कार्यरत आहेत. राजेश सद्या मुरुड-जंजिरा (जि. रायगड) येथे सहायक गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
गारळेवाडीचे सुपुत्र व सातारा जिल्हा परिषदेचे निवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी टी. आर. गारळे यांच्या स्नुषा पूजा विकास गारळे यांची नायब तहसीलदारपदी निवड झाली आहे. सध्या त्या विक्रीकर विभागात कार्यरत आहेत. याशिवाय येरळवाडी येथील मंगेश किसन बागल यांची मंत्रालय सहायक वर्ग एकपदी निवड झालेली आहे. त्यांचे शालेय शिक्षण येरळवाडी व माध्यमिक शिक्षण कातरखटाव येथील कात्रेश्वर हायस्कूलमध्ये झाले आहे.
माणच्या चौघांचा स्पर्धा परीक्षेत झेंडा
दहिवडी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेत माण तालुक्यातील चौघांनी घवघवीत यश मिळवले. लोधवडेचे सुपुत्र चैतन्य कदम यांची पोलिस उपअधीक्षकपदी, पळशी येथील विकास गंबरे यांची तहसीलदारपदी, गोंदवले बुद्रुकच्या प्रगती कट्टे यांची नायब तहसीलदारपदी व गौरी कट्टे यांची कक्ष अधिकारीपदी निवड झाली. एकाचवेळी चौघांनी यश मिळविल्याने तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे.
लोधवडे गावचे सुपुत्र चैतन्य कदम यांची पोलिस उपअधीक्षकपदी निवड झाली. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण माणमध्येच झालेल्या चैतन्य कदम यांनी राहुरी येथून कृषी पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षा देण्यास सुरवात केली. मागील वर्षी त्यांची सहायक राज्यकर आयुक्तपदी निवड झाली होती. मात्र, तेवढ्यावरच समाधान न मानता त्यांनी प्रयत्न सुरूच ठेवले. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन त्यांची पोलिस उपअधीक्षकपदी निवड झाली.
पळशी येथील विकास गंबरे यांची तहसीलदारपदी निवड झाली आहे. त्यांचे शिक्षण पळशी, म्हसवड, सातारा येथे झाले. त्यांनी अभियांत्रिकीची पदवी पुणे येथे घेतली. त्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षा दिल्या. 2018 मध्ये त्यांची सहायक राज्यकर आयुक्तपदी निवड झाली होती. त्यानंतरही त्यांनी आपले प्रयत्न सुरूच ठेवले. आज त्यांची तहसीलदारपदी निवड झाली.
गोंदवले बुद्रुकच्या प्रगती कट्टे यांची नायब तहसीलदारपदी निवड झाली आहे. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गोंदवले बुद्रुक येथे, तर उच्च माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी विद्यालय दहिवडी येथे झाले. मुंबई येथे त्यांनी अभियांत्रिकी पदवी घेतली.
पंचायत समितीचे उपसभापती तानाजी कट्टे यांची कन्या गौरी कट्टे यांची कक्ष अधिकारीपदी निवड झाली आहे. त्यांचे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण गोंदवले व दहिवडी येथे झाले आहे. त्यांनी सातारा येथे बीसीएस केले आहे. त्यानंतर त्या स्पर्धा परीक्षांकडे वळल्या. कक्ष अधिकारीपदी निवड झाली असली तरी हे यश समाधान देणारे नाही, असे सांगतानाच अजून उच्च पद मिळविणारच, असा निर्धार गौरी कट्टे यांनी व्यक्त केला.
आसू : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सोनगाव (ता.फलटण) येथील सूरज विठ्ठल जगताप यांची तहसीलदारपदी निवड झाली आहे. सूरज जगताप यांचे वडील शेतमजूर आहेत. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी यश मिळविले. त्यांचे प्राथमिक शिक्षण सोनगाव येथे, माध्यमिक शिक्षण राजाळे येथील जानाई हायस्कूल व उच्च माध्यमिक शिक्षण मुधोजी हायस्कूल फलटण येथे, तर पदवीचे शिक्षण बारामती येथील टी. सी. कॉलेज येथे झाले. ते सध्या कक्ष अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. सूरज जगताप यांचे सोनगावसह तालुक्यातील विविध मान्यवरांनी अभिनंदन केले.
झिरपवाडी (ता. फलटण) येथील तुषार लक्ष्मणराव गुंजवटे यांची नायब तहसीलदारपदी निवड झाली आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण फलटण येथील श्रीमंत मालोजीराजे प्राथमिक विद्यामंदिर, तर माध्यमिक शिक्षण यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे झाले. त्यांचे पदविका शिक्षण कऱ्हाड येथील शासकीय इंजिनिअर कॉलेज येथे झाले. पुणे येथील ऑल इंडिया श्री शिवाजीराजे मेमोरियल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे पदवी शिक्षण पूर्ण केले. सध्या ते टाटा कन्सलटिंग सर्व्हिस पुणे येथे कार्यरत आहेत. त्यांचे आई, वडील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
बहिणीची प्रेरणा घेऊन प्रगती झाली नायब तहसीलदार
Video : एमपीएससी परीक्षेत यशस्वी हाेण्यासाठीचा प्रसाद चाैगुलेंचा कानमंत्र
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.