कोयनानगर (जि. सातारा) ः कोरोनामुळे तीन महिन्यांपासून देश लॉकडाउनमध्ये लॉक असल्याने त्याचा परिणाम थंड हवेचे नवे ठिकाण म्हणून उदयास आलेल्या कोयना पर्यटन क्षेत्राला बसला आहे. नेहमीच पर्यटकांनी गजबजून बहरलेला कोयना परिसर कोरोनाच्या अघोषित बंदीमुळे कोमेजून गेला आहे. या तीन महिन्यांत कोयनेतील व्यावसायिकांना लाखो रुपयांचा फटका सहन करावा लागला आहे.
निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेला कोयना परिसर अल्पावधीतच जागतिक पर्यटन क्षेत्र म्हणून प्रकाशझोतात आला आहे. कोयना धरण, कोयना जलविद्युत प्रकल्प, नेहरू उद्यान, ओझर्डे धबधबा, विविध जैवविविधतेने नटलेले कोयना अभयारण्य आदी सह्याद्रीच्या कुशीतील हा अनमोल ठेवा कोयना परिसरात आहे. त्यामुळे पर्यटनाच्या तीनही हंगामात कोयनेचे सौंदर्य भरभरून वाहत असल्याने कोयना परिसर पर्यटकांनी हाउसफुल्ल असतो. या प्रेक्षणीय स्थळांबरोबर परिसरातील अनेक ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. लाखो रुपयांची उलाढाल होत असल्यामुळे व्यावसायिकांना नेहमीच अच्छे दिन असतात.
कोरोनामुळे लॉकडाउन सुरू आहे. त्याचा फटका कोयना पर्यटन क्षेत्राला बसला आहे. शासनाच्या आदेशाप्रमाणे कोयना धरण व नेहरू उद्यानात पहिल्यांदा प्रवेशबंदी झाल्यामुळे हळूहळू सर्व पर्यटन स्थळावरील हॉटेल, लॉजही बंद झाली आहेत. सगळी ठिकाणे बंद असल्याने सगळे शांत आहे. पर्यटनाशी संबंधित छोट्या-मोठ्या स्थानिकांच्या व्यवसायावर प्रतिकूल परिणाम झाला आहे.
पावसाळा सुरू झाल्याने कोयना विभागाचे सौंदर्य खुलते. सध्या पावसाळी पर्यटनाला बहर आला आहे. सर्वांत जास्त धबधबे या परिसरात असल्याने पावसाळ्यात पर्यटकांची गर्दी असते. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांतून फेसाळत वाहणारे निसर्गरम्य धबधबे व त्यामुळे बहरलेल्या कोयनेच्या सौंदर्याचा मनमुराद आनंद पर्यटक घेतात. पावसाळ्यात पर्यटकांच्या गर्दीमुळे नेहमीच हाउसफुल्ल असणारे कोयनानगरात सध्या सन्नाटा पसरला आहे. पर्यटनावर आपल्या कुटुंबाची उपजीविका असणारा वर्ग आर्थिक विवंचनेत पडला आहे. विकेंड डेस्टिनेशन असणाऱ्या कोयना पर्यटनाला या अघोषित बंदीमुळे घरघर लागली आहे.
पर्यटन विकास आराखड्यातील निधी पडून
राज्य शासनाने कोयना पर्यटनाच्या विकास आराखड्यासाठी दिलेला भरीव निधी पडून आहे. कोयना प्रक्ल्पाने या निधीचा वापर न केल्यामुळे या निधीला कात्री लागण्याची शक्यता आहे. वॉटर पार्क उभारण्यासाठी कोयना प्रक्ल्पाने अद्याप जागाच निश्चित केली नाही. कोयना प्रकल्पाच्या अनास्थेमुळे कोयना पर्यटनाला बुरे दिन आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.