मल्हारपेठ (सातारा) : कोरोनासाठी कडक निर्बंध लावल्याने मोठे आठवडे बाजार बंद झाले. भाजीपाल्यासह कलिंगडाला कवडीमोल भाव मिळत असल्याने कलिंगड विक्रीऐवजी रस्त्याकडेला फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. अति उष्णतेमुळे कलिंगडाच्या परिपक्वतेवर परिणाम होऊन पांढरट डाग पडत आहेत. त्यामुळे ते विकले जात नाही. परिणामी, घातलेला खर्चही निघाला नसल्यामुळे बळीराजा चिंतेत पडला आहे.
सध्या जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे लॉकडाउनला पर्याय शोधून संचारबंदीबरोबर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आपत्कालीन व्यवस्था वगळता सर्वच ठिकाणी कडक निर्बंध लादले गेले आहेत. जिल्ह्यातील सर्वच गावांचे मोठे आठवडा बाजार बंद करण्यात आले आहेत. ऐन उन्हाळ्यात उन्हाच्या झळांपासून बचाव करण्यास थंडपेयांबरोबर कलिंगडालाही मागणी होत असते. मात्र, कोरोना फैलावात सर्दी, खोकल्यापासून बचाव करण्यासाठीच कलिंगडांकडे खवैय्यांनी पाठ फिरवली असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे मागणी कमी असल्याने त्याचा दरावर परिणाम झाला आहे. घाऊक अडतदार व्यापाऱ्याकडे मालाची आवक वाढली. परंतु, आवकेप्रमाणेच जावक मोठ्या प्रमाणात घसरली. यामुळे कलिंगडाचे दर कोसळले आहेत. बाजारात एरव्ही 50 रुपयांपासून ते 80, 90 रुपयाला तीन ते चार किलो वजनाचे कलिंगड विकले जायचे. ते सध्या दहा ते 15 रुपयांवर खाली आले आहेत. त्यामुळे घातलेला खर्चपण निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
काही शेतकऱ्यांनी कलिंगडे फोडून चिरून जनावरांना खायला घालण्यास प्रारंभ केला आहे. मात्र, बाजारात आवकच मोठ्या प्रमाणावर होत असल्याने काढलेला माल बाजारात विक्रीसाठी न्यायचा तर दर नाही आणि हातविक्री करण्यास संचारबंदीची भीती आहे. त्यातच गावोगावी जाऊन विकावी तर स्थानिक गावकऱ्यांची दहशत. यामुळे बिचाऱ्या शेतकऱ्याला काढलेली कलिंगडे अक्षरशः रस्त्याकडेला फेकून देण्याची वेळ आली आहे. गेल्या दोन आठवड्यांत हवेतील उष्णता प्रचंड प्रमाणात वाढली असल्याने कलिंगडाला पांढरे डाग पडले आहेत. त्यामुळे आतील गराचा रंग अतिउष्णतेमुळे पिवळसर झाला आहे. त्यामुळेही ते विकता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे यक्ष प्रश्न आहे.
संपादन : बाळकृष्ण मधाळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.