ढेबेवाडी (जि. सातारा) : निवी (ता. पाटण) परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला असून, चार दिवसांत बोकडासह तीन शेळ्यांचा त्याने फाडशा पाडल्याने शेतकरी काळजीत पडले आहेत. शिवारात उंच वाढलेल्या गवतात बिबट्यांचा मुक्काम असल्याने शेतकरी जनावरे चरण्यास नेताना घाबरत आहेत.
सातारा व सांगली जिल्ह्यांच्या सीमेवरील घनदाट जंगलालगतचा निवी परिसर वन्य श्वापदांच्या उपद्रवाने हैराण असून, पाळीव प्राण्यांवर हल्ल्यासह पीक नुकसानीच्या घटनाही तेथे सतत घडत आहेत. अलीकडे त्या परिसरात दोन बछड्यासह बिबट्याच्या मादीचा वावर असल्याने ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या काळजीत भर पडली आहे. गेल्या चार दिवसांत बोकडासह तीन शेळ्या बिबट्याने फस्त केल्याच्या घटना त्या परिसरात घडल्या. सतीचीवाडी (कसणी) येथील सीताराम हरी कदम व लक्ष्मण देवजी कदम यांच्या शेळ्यांचा, तर चोरगेवाडी (काळगाव, ता. पाटण) येथील आनंदा दादू चोरगे यांच्या बोकडाचा त्यात समावेश आहे.
शिवारात चरणाऱ्या शेळ्यांच्या कळपात बिबट्या घुसताच शेतकऱ्यांनी आरडाओरडा करत त्याला प्रतिकार केला. मात्र, त्याने जुमानले नाही. नंतर अर्धवट खाल्लेल्या शेळ्या त्या परिसरात आढळून आल्या. बिबट्याने पळवून नेलेल्या बोकडाचा थांगपत्ता लागला नाही. वनक्षेत्रपाल विलासराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सुभाष राऊत, वनरक्षक जयवंत बेंद्रे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मारुती पाटील, अधिक पाटील, तुकाराम साबळे आदी उपस्थित होते. शिवारात उंच वाढलेल्या गवतात बिबट्यांचा मुक्काम असल्याने शेतकरी जनावरे चरण्यासाठी घेऊन जाण्यास घाबरत आहेत. आज शेतकऱ्यांनी उंच गवतातील पायवाटेने बिबट्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला; परंतु तो दिसला नाही.
संपादन : बाळकृष्ण मधाळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.