विसापूर (जि. सातारा) : पुसेगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना यांचा एकत्रितपणे लढण्याबाबतचा निर्णय अजूनही झालेला नाही. त्यापैकी, गावात प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या दोन्ही गटांच्या स्वतंत्र बैठका होऊ लागल्याने सध्यातरी या आघाडीवर अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. भाजप स्वतंत्र निवडणूक लढणार असल्यामुळे यंदाची ग्रामपंचायत निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता असल्याने चुरशीची, तसेच प्रतिष्ठेची ठरणार आहे.
ग्रामपंचायत निवडणुका पक्षीय चिन्हावर होत नसल्या तरी ही निवडणूक लढणारे स्थानिक कार्यकर्ते कोणत्या ना कोणत्या पक्षाशी जवळीकता ठेऊन असतात. त्यामुळे पक्षाची ताकद, नेत्यांचे पाठबळ मिळून विजयश्री खेचून आणण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत, तर दुसरीकडे गावातील पॅनेल प्रमुखांनी प्रभागात ज्यांचा दबदबा आहे, अशा नागरिकांना हेरून त्यांनाच आपल्या पक्षाकडून रिंगणात उतरवण्यासाठीची मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
पुसेगावमधील एकूण स्थिती पाहता ग्रामपंचायतीवर भाजपचा बऱ्यापैकी दबदबा आहे, तर राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे गावात अनेक ठिकाणी वर्चस्व आहे. ही ग्रामपंचायत निवडणूक आघाडी करून एकत्रितपणे लढली गेली, तर महाविकास आघाडीला याचा नक्कीच फायदा होईल, असे काही जाणकार बोलून दाखवत आहेत. मात्र, निवडणुकीसाठी शिल्लक असलेला अत्यल्प कालावधी पाहता महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना एकत्रित उमेदवार निश्चित करणे अवघड होणार आहे, तरीही गावातील प्रमुख नेत्यांनी एकत्रितपणे लढायचे असा निर्णय झाल्यास गुडघ्याला बाशिंग बांधून असणाऱ्या इच्छुक उमेदवारांचा हिरमोड होणार हे मात्र नक्की.
कडाक्याच्या थंडीत गावकारभरी पॅनेलची मोर्चेबांधणी करण्यात व्यस्त दिसत आहेत, तर गावात ठिकठिकाणी गरमागरम राजकीय चर्चा रंगत असून, इच्छुक उमेदवारांची चहाच्या टपऱ्यांवर गर्दी पाहावयास मिळत आहे.
संपादन : बाळकृष्ण मधाळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.