सातारा : सातारा एसटी आगारात सायंकाळच्या सुमारास मतीमंद मुलाने सिगारेट ओढून शिवशाही बसमध्ये टाकल्याने तब्बल पाच शिवशाही बस जळून खाक झाल्याची घटना घडली. अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणण्यासाठी तीन तास शर्थीचे प्रयत्न करावे लागले. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
सातारा एसटी स्टॅंड परिसर प्रवाशांनी सतत गजबजलेला असतो. या ठिकाणी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शिवशाही बसमधून अचानक धूर येऊ लागल्याने परिसरात खळबळ उडाली. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळाल्यानंतर दहा मिनिटात घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. मात्र, आगीचे लोट मोठ्या प्रमाणात असल्याने आग विझविण्यासाठी जवानांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. त्यानंतर तीन तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं आहे. दरम्यान, सिगारेट ओढून आग लावलेल्या मतिमंद मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे.
शिवशाही बस उभ्या असणाऱ्या मागील बाजूस मोठी इमारत असून जागा अरुंद आहे. त्यामुळे बसच्या मागील बाजूने आग विझविताना जवानांना अडथळा येत होता. अखेर अग्निशमन जवान, वाहतूक पोलिस, एस.टी कर्मचाऱ्यांनी बसच्या काच्या फोडून बसमधील आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आग लागलेल्या एस.टी बस भाडेतत्वावरील असून मार्च महिन्यापासून बंद अवस्थेत उभ्या आहेत. त्यामधील भागिरथी या खासगी कंपनीची बस हलविण्याबाबत तीन वेळा नोटीस देऊनही बस नेण्यास टाळाटाळ केली. याबाबत संबंधितांची चौकशी केली जाणार असल्याची माहिती एस.टी प्रशासनाने दिली.
शिवशाहीच्या बॅटरी डिस्चार्च
एसटी आगारात दहा ते बारा शिवशाही बस लागलेल्या आहेत. त्यामधील पाच ते सहा बस सुमारे सात महिन्यापासून बंद आहेत. सुरुवातीला एका बसला आग लागल्यानंतर शेजारील इतर बस काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, सदर बसची बॅटरी डिस्चार्ज असल्याने बस सुरु झाली नाही. त्यामुळे, शेजारील इतर चार बस पेटत गेल्या. आग आटोक्यात आणल्यानंतर क्रेन व इतर बॅटरींच्या साहाय्याने बस हलविण्यात आल्या. या प्रकारामुळे एस.टी प्रशासनाच्या कारभाराव प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
शिवशाहीला लॉक नसल्याने प्रकार
गेल्या सात महिन्यापासून एकाच ठिकाणी बस उभ्या असल्याने बसची दुरावस्था झाली होती. काही बसच्या काचा फुटल्या होत्या अर काही बसच्या दरवाज्याचे लॉक खराब झाले होते. याचा फायदा घेत मतिमंद मुलाने सिगारेट ओढून बसमध्ये टाकल्याने आगीची दुर्घटना घडली. बस सुस्थितीत असत्या तर आगीची दुर्घटना टळली असती.
साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
आग लागलेल्या शिवशाही बस भाडेतत्वावरील होत्या. त्यामधील काही बस लॉकडाऊनपासून उभ्या होत्या. या बस नेण्याबाबत संबंधित कंपनीला तीन वेळा नोटीस देण्यात आली होती. बसमधील सीट व अंतर्गत भाग जळून खाक झाला असून इंजिन सुस्थितीत आहे.
रेश्मा गाडेकर, आगार व्यवस्थापक (कनिष्ठ)
संपादन : बाळकृष्ण मधाळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.