पिंपोडे बुद्रुक (जि. सातारा) : चवणेश्वर (ता. कोरेगाव) गावाला रस्त्यासाठी मंजूर झालेला सुमारे एक कोटी 33 लाख रुपये निधी ठेकेदाराने अनामत रक्कम वेळेत भरली नसल्याने परत गेल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. चवणेश्वर गाव डोंगरावर वसले आहे. च्यवणऋषींनी वास्तव्य केले असल्याने या ठिकाणाला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.
गावची लोकसंख्या कमी असली तरी येथे श्री चवणेश्वर, महादेव, जानुबाई, केदारेश्वर मंदिरे असल्याने राज्यातून भाविक येत असतात. दरवर्षी अश्विन महिन्यातील चौथा शनिवार आणि रविवार याठिकाणी मोठी यात्रा भरते. दिवसेंदिवस याठिकाणी पर्यटक, भाविकांचा ओढा वाढतोय. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्याकडे ग्रामस्थांनी पाठपुरावा केल्यानंतर 2000 मध्ये गावास पर्यटनस्थळाचा "क' वर्ग दर्जा मिळाला आणि विकासकामे होऊ लागली. गावच्या विकासात अडचण होती, ती घाटरस्त्याच्या कामास वन विभाग परवानगी कधी देणार याची तत्कालीन सरपंच नीता पवार यांनी याबाबत खासदार शरद पवार, रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे सदस्य मंगेश धुमाळ यांच्यासह प्रशासनातील विविध विभागाच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. खूप संघर्षानंतर वन विभागाने रस्त्याला परवानगी दिली.
दीपक चव्हाण, मंगेश धुमाळ यांच्या पाठपुराव्यामुळे रस्त्याच्या कामासाठी एक कोटी 33 लाखांचा निधी मंजूर झाला. मात्र, या रस्त्याचे टेंडर मिळवण्यासाठी अनेक ठेकेदार सरसावले. काम मोठे असल्याने तसा ठेकेदारही लागणार असल्याने काम कोणास मिळणार याची उत्सुकता होती. मात्र, ज्या ठेकेदारांची शिफारस गेली ते ठेकेदार दोन लाख 57 हजार रुपये अनामत वेळेत भरू शकले नाहीत. एवढी रक्कम जुळत नसेल तर सव्वा कोटीच्या कामाचे काय झाले असते, हा विचारच न केलेला बरा. अनामत रक्कम वेळेत भरली नाही, त्यातच कोरोनाचे संकट उभे ठाकले. ठेकेदाराची दिरंगाई आणि जिल्हा परिषद प्रशासनाकडून दुर्लक्ष यामुळे शासनाने निधी परत घेतला. लोकप्रतिनिधी केवळ निवडणुकीच्या निमित्ताने येतील-जातील, पण येथील मूळचा प्रश्न तसाच राहिल्याचे शल्य अनेकांच्या मनात राहिले.
चवणेश्वर ग्रामस्थांचा केवळ मतासाठीच लोकप्रतिनिधींनी वापर केला असून, आता आम्ही गप्प बसणार नाही. आम्हाला रस्त्यासाठी 60 वर्षे संघर्ष करावा लागत असून ही बाब लोकप्रतिनिधींना न शोभणारी आहे.
-दयानंद शेरे, सरपंच, ग्रामपंचायत, चवणेश्वर
संपादन : बाळकृष्ण मधाळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.