ढेबेवाडी (जि. सातारा) : मराठवाडी धरणांतर्गत उमरकांचनच्या खालच्या आवाडातील काही धरणग्रस्तांनी आपली घरे मोडून निवारा शेडसह अन्यत्र स्थलांतर केल्यामुळे खाद्याच्या शोधार्थ उंदीर व घुशींपाठोपाठ सापांनीही शिल्लक घरांकडे मोर्चा वळविला आहे. रखडलेल्या पुनर्वसनामुळे अगोदरच वैतागलेले धरणग्रस्त या नव्या समस्येने काळजीत पडले आहेत. शासनाने तातडीने प्रलंबित प्रश्न सोडवून जिवावर बेतणाऱ्या संकटातून सुटका करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
मराठवाडी धरणात दहा वर्षांपासून पाणी अडविण्यास सुरुवात केल्यापासून जलाशयाच्या काठावरील गावात वास्तव्यास असलेल्या धरणग्रस्त कुटुंबांसमोरील अडचणीमध्ये वाढ होत आहे. अलीकडे बांधकामाने वेग घेतल्याने वर्षागणिक पाणीसाठा व स्थानिकांच्या अडचणी वाढतच आहेत. त्यामध्ये उमरकांचन येथील खालचे आवाडातील कुटुंबांची स्थिती खूपच बिकट आहे. सांगली जिल्ह्यातील माहुली गावठाणात पुनर्वसनाचे नियोजन असलेली तेथील काही कुटुंबे पुनर्वसनाचे प्रश्न लोंबकळत पडल्याने अजूनही मूळ गावातच वास्तव्यास आहेत.
गेल्या वर्षी धरणातील पाणीसाठा 0.60 टीएमसीवरून 1.05 टीएमसीवर पोचल्याने काही कुटुंबांना भर पावसात निवारा शेडमध्ये हलविण्याची वेळ पाटबंधारे विभागावर आली होती. यावर्षी पाणीसाठा 1.4 वर पोचणार असल्याने आणखी कुटुंबांना पाण्याची झळ पोचणार आहे. पाण्यात बुडून घरांचे नुकसान होऊ नये म्हणून ठराविक जणांनी आपली घरे मोडली. चोहोबाजूंनी पडणारा पाण्याचा वेढा, तसेच वाढलेले गवत, झुडपे आणि पडक्या घरांमुळे खाद्याच्या शोधार्थ उंदीर, घुशींपाठोपाठ साप व विंचूनी शिल्लक घरांकडे मोर्चा वळविला आहे. त्यामुळे धरणग्रस्तांची झोप उडाली आहे.
घरांभोवती अडचण वाढल्यान उंदीर, घुशी, साप घरात घुसत्याती. काळजीनं रातभर डोळ्याला डोळा लागना झालाय. शासनानं आम्हा गरिबांना हाल-हाल करून मारायचं ठरिवलंय का काय?- छबूताई मोहिते, धरणग्रस्त
(संपादन ः संजय साळुंखे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.