सातारा : बँकेत बचत म्हणून साठवून ठेवलेले पैसे खर्चाला दिले नाहीत म्हणून आईच्या पायावर कुंडी, तर पाठीत लोखंडी पाइप मारल्याप्रकरणी दोन मुलांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. प्रवीण उत्तम कांबळे व प्रदीप उत्तम कांबळे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. (satara-son-beats-mother-for-money-near-bank-crime-news)
याबाबत पुष्पा उत्तम कांबळे (रा. रविवार पेठ, सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. त्या भाजीविक्रीचा व्यवसाय करतात. बुधवारी (ता. ९) सायंकाळी सहाला त्या घरी होत्या. यावेळी प्रवीण व प्रदीप यांनी बँकेत बचत केलेले पैसे मागितले. त्याला नकार दिल्याने संतापून दोघांनी मारहाण करत जिन्यातून खाली आणले. यावेळी प्रवीणने पायावर कुंडी फेकून मारली तर, प्रदीपने पाठीत पाइप मारली. त्यानंतर दोघांनी शिवीगाळ, दमदाटी करत रस्त्यावर फेकून दिल्याचे पुष्पा यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत त्यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हवालदार ए. आर. दगडे तपास करत आहेत.
शेतजमिनीवरून दिव्यांग महिलेस मारहाण
सोनगाव तर्फ सातारा येथील धान्याची पट्टी नावाच्या शिवारात जमीन नांगरण्याच्या कारणावरून दिव्यांग महिलेसह तिच्या नातेवाईकांना शिवीगाळ, मारहाण करत अंगावर ट्रॅक्टर घालण्याची धमकी दिल्याप्रकरणी चौघांवर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. खुदबुद्दीन गुलाब मोमीन, हाफिजा खुदबुद्दीन मोमीन, इर्शाद सत्तार मोमीन व बालेखान सत्तार मोमीन (सर्व रा. सोनगाव, ता. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत बानू गुलाब मोमीन (वय ५९, रा. सोनगाव तर्फ सातारा, ता. सातारा) यांनी फिर्याद दिली आहे.
त्यानुसार गुरुवारी (ता. १०) त्या त्यांचा भाऊ बाबालाल, बहीण रझिया, नातू सोहेल यांच्यासह धान्याची पट्टी नावाच्या शिवारात जमीन नांगरण्यासाठी गेले होते. यावेळी तिथे सावत्र भाऊ खुदबुद्दीन, त्याची पत्नी हाफिजा, त्याचे नातेवाईक इर्शाद व बालेखान तेथे आले. त्यांनी ‘येथे शेत नांगरायचे नाही, तू इथून निघून जा,' असे म्हणत मारहाण केली. दुसऱ्या दिवशी खुदबुद्दीन स्वत:च तेथे पेरणी करत होता. त्याला विचारणा केल्यास त्यांनी ‘मी हे क्षेत्र करणारच’ असे म्हणून पुन्हा शिवीगाळ व दमदाटी करत अंगावर ट्रॅक्टर घालण्याची धमकी दिली. हवालदार खुडे तपास करत आहेत.
देशी दारूविक्रीप्रकरणी एकावर गुन्हा
येथील पोवई नाका परिसरात कासट मार्केटच्यामागे पत्र्याच्या शेडच्या आडोशाला देशी दारू विकल्याप्रकरणी एकावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तानाजी बन्सी बडेकर (रा. रविवार पेठ, सातारा) असे त्याचे नाव आहे. या कारवाईत देशी दारूच्या १३ बाटल्या जप्त केल्या आहेत.
साताऱ्यातील पार्किंगमधून दुचाकीची चोरी
येथील मुख्य बस स्थानक परिसरातील सेव्हन स्टार इमारतीसमोरील पार्किंगमधून दुचाकी चोरीला गेली आहे. याबाबत सचिन शंकरराव भगत (रा. जिल्हा परिषद कॉलनी, करंजे) यांनी फिर्याद दिली आहे. हवालदार जाधव तपास करत आहेत.
खावलीत मशिनच्या पार्टची चोरी
खावली (ता. सातारा) येथून बांधकाम कंपनीच्या मशिनच्या ६५ हजार रुपयांच्या पार्टची चोरी झाली आहे. याबाबत श्रीकांत सोपान घाडगे (रा. निढळ, ता. खटाव) यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नवोदय विद्यालयाच्या कमानीजवळ मेघा इंजिनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर (हैदराबाद) कंपनीकडून रस्ते बांधणीचे काम सुरू आहे. त्यासाठी लागणारी मशिनरी कंपनीने येथेच ठेवली होती. ती चोरीला गेली आहे. महिला पोलिस मोरे तपास करत आहेत.
प्रतापसिंहनगरातून मुलाच्या अपहरणाची तक्रार
सातारा : प्रतापसिंहनगर येथून १७ वर्षीय मुलाचे अपहरण झाले आहे. याबाबत त्याच्याच भावाने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोमवारी (ता. १४) सकाळी सातला खेळायला जातो, असे सांगून घराबाहेर पडला तो परत आलेला नाही. त्यामुळे त्याला कोणी तरी पळवून नेले असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. हवालदार भोसले तपास करत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.