सातारा : वटपौर्णिमेनिमित्त ठिकठिकाणी वडाची पूजा केली जाते. हा सण पारंपरिक उत्साहात साजरा केला जातो. सध्या वडाचे झाड, वृक्षवल्ली वाचवण्यासाठी, जगविण्यासाठी संदेश दिले जातात. मात्र आपल्या कृतीतून हा संदेश सकाळच्या तनिष्का गटाच्या सदस्यांनी केवळ त्यांच्या गावातच नव्हे तर राज्यभरात ठिकठिकाणी आशिया खंडातील वटवृक्षाच्या फांदीचे वृक्षारोपण केले. बहुतांश ठिकाणी त्यामुळे हिरवाई बहरली आहे. आजही अनेक ठिकाणी तनिष्का सदस्या स्वत: लावलेल्या वडाच्या झाडाची पूजा करतात. जाणून घेऊयात जावळी तालुक्यातील म्हसवे येथील या वटवृक्षाविषयी.
म्हसवे (ता. जावळी) येथील वटवृक्षाचा "वंश' तब्बल अडीच एकर परिसरात विस्तारला असून, तो विस्ताराने आशिया खंडात दुसऱ्या क्रमांकाचा आहे. हा वटवृक्ष आणि त्यावरील प्राण्यांचे जतन करण्याबरोबरच हा परिसर पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याची आवश्यकता आहे. पाचवड-कुडाळ रस्त्यावर पाचवडपासून पाच किलोमीटर अंतरावर म्हसवे गावानजीक हे वडाचे झाड आहे. जुना वटवृक्ष म्हणून या झाडाची अनेक ठिकाणी नोंद आहे. 1882 मध्ये ली वॉर्नर या ब्रिटिश अधिकाऱ्याने सातारा जिल्ह्यातील या वडाच्या झाडाचा उल्लेख केला आहे. 1903 मध्ये पुण्याच्या सायन्स कॉलेजचे प्राचार्य असलेल्या कुक थिओडोर या ब्रिटिशाने पश्चिम घाटावरील वृक्षाची नोंद असलेले पुस्तक लिहिले आहे. त्यातही या वृक्षाची नोंद आहे. वनविभागाकडून या वृक्षाच्या विस्तार व वैशिष्ट्यांविषयी माहिती देण्यात आली. सर्वांत मोठा विस्तार असलेला हा आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचा वटवृक्ष असल्याची माहिती उपलब्ध आहे. कोलकता येथील बोटॅनिक गार्डनमध्ये अशाच प्रकारचा पहिल्या क्रमांकाचा वटवृक्ष आहे.
म्हसवे येथील मूळ वडाच्या झाडाच्या पारंब्या व मुळापासून सुमारे 100 झाडे तयार झाली आहेत. मुख्य झाड जीर्ण झाल्याने पडले आहे. मात्र, इतर झाडांचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. यातील एका झाडाचा विस्तार 1587 चौरस फूट (सुमारे दोन गुंठे) परिसरात आहे. त्याची लांबी 600 फूट आहे. या झाडाचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यावर "फ्लाइन फॅक्स' जातीची वटवाघळे आहेत. खारी, उदमांजर व वेगवेगळे पक्षीही या झाडांवर आढळतात.
28 हून अधिक पक्ष्यांचे आश्रयस्थान
विस्ताराने मोठ्या असलेल्या या वटवृक्षावर पशुपक्ष्यांचे मोठ्या संख्येने वास्तव्य असते. वटवाघूळ, बुलबुल, सातभाई, भारद्वाज आदी 28 प्रजातींचे वास्तव्य आढळते. कोलकता येथील बोटॅनिकल गार्डनमध्ये अशाच प्रकारचा पहिल्या क्रमांकाचा वटवृक्ष आहे. त्यानंतर म्हसवे येथील वडाचा क्रमांक लागतो. मूळ झाड काळाच्या ओघात जीर्ण होऊन नष्ट झाले असले, तरी त्याच्या सुमारे शंभर पारंब्यांचे खोडात रूपांतर झाले आहे. त्यामुळेच सुमारे दोनशे वर्षांहून अधिक काळाचे हे झाड अद्याप टिकून आहे.
असे झाले प्रयत्न
पारंब्यांची वाढ खुंटल्याने वटवृक्षाच्या वाढीवर परिणाम होऊन हा ऐतिहासिक ठेवा नष्ट होण्याची भीती होती. त्यामुळे वन विभाग, स्थानिक ग्रामस्थ व पर्यावरणप्रेमी संस्थांनी जाणीवपूर्वक काही प्रयत्न केले. संपूर्ण सव्वादोन हेक्टर क्षेत्राला तारेचे कुंपण घालून ते संरक्षित करण्यात आले. त्याचबरोबर वृक्षाच्या विस्तारात येणाऱ्या अडथळ्याचा विचार करून पारंब्यांच्या खाली मातीचे ढिगारे घालून पारंब्यांना मातीचा आधार देण्यात आला. परिणामी पारंब्या जमिनीत खोलवर जाऊन त्यांचे पुन्हा खोडात रूपांतर झाले आहे. वन विभागातर्फे स्थानिक ग्रामस्थांना वटवृक्षाचे व त्याच्या संवर्धनाचे महत्त्व पटवून देण्यात आले. त्यामुळे ग्रामस्थही वटवृक्षाच्या संवर्धनाच्या चळवळीत सक्रिय झाले.
वृक्षारोपण आणि संवर्धनाची प्रतिज्ञा
गेल्या काही वर्षांपासून वटपौर्णिमेच्या निमित्ताने तनिष्का सदस्यांनी राज्यभरात ठिकठिकाणी या वटवृक्षाच्या फांद्याचे वृक्षारोपण केले होते. बहुतांश ठिकाणी त्यामुळे हिरवाई बहरली आहे. आजही अनेक ठिकाणी तनिष्का सदस्या स्वत: लावलेल्या वडाच्या झाडाची पूजा करतात. नागपूरच्या प्रतापनगरजवळील दीनदयाळ नगरमध्ये, कोथरूड (पुणे) व औरंगाबाद येथे महापालिकेच्या हर्सूल तलावालगत असणाऱ्या स्मृतिवनात ,जळगाव येथे वाघनगर, इंद्रप्रस्थनगर तसेच रामानंद नगर परिसरात वडाचे झाडाचे रोपण करुन या वटवृक्षाचा विस्तार राज्यभर करुन पर्यावरणाचा संदेश दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.