सातारा : शरीर हे क्षणभंगूर आहे, मृत्यूनंतर सारे नष्ट होते. मात्र, अवयरुपी जिवंत रहायचे असेल, तर अवयव दान करा. मृत्यूपश्चात एक देह सात जणांच्या आयुष्यात एक आशेचा किरण ठरू शकतो. तर 35 लोकांच्या आयुष्याचा दर्जा सुधारू शकतो. मात्र, आपल्या समाजात अवयवदानाविषयी फारशी जागृती नसल्याने कित्येक रुग्ण वर्षांनुववर्ष प्रतीक्षेत आहेत. अवयव दान हे केवळ डोळे किंवा किडनी पुरता मर्यादित नसून शरीराचे सुमारे 10 विविध अवयव आपण दान करू शकतो.
सातारची सामाजिक कार्यकर्ती कोमल पवार-गोडसे हिला २०१७ साली "प्लमोनरी हायपरटेन्शन" या व्याधीचे निदान झाले आणि तिचे आयुष्य जणू तिथेच स्तब्ध झाले, पण तिने व तिच्या पतीने धीर सोडला नाही. ती मृत्यूच्या दाढेतून बाहेर येत कोमल ठरली होती. महाराष्ट्रातील पहिली "दोन्ही फुफ्फुस आणि हृदय प्रत्यारोपण" झालेली व्यक्ती. पण, ३ दिवसापूर्वी कोमलचा आजार अचानक वाढल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार यांनी तिला ताबडतोब हैदराबाद येथे शिफ्ट केले, परंतु १ सप्टेंबर रोजी पहाटे कोमल आपल्यात न राहिल्याची बातमी समजली आणि धक्का बसला.
कोमल आणि तिचे पती धीरज या दोघांनी "कोमल न्यू लाईफ फौंडेशन" या संस्थेची स्थापना केली होती, त्यामार्फत त्यांनी ऑर्गन डोनेशनसाठी खूप मोठं काम केलं, तसेच गरजूंना वाटेल ती मदत, जनजागृती केली, असे खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या व्टिवटरच्या माध्यमातून याबाबत प्रसिध्द करत दुःख व्यक्त केले होते. तद्नंतर सातारकारांनी देखील एका सामाजिक कार्यकर्तीला गमवल्याची भावना व्यक्त केली. मात्र, काल पासून एक पोस्ट व्हायरल होत असून त्यात कोमल पवार पत्रातून नागरिकांशी संवाद साधताना दिसत आहेत. कोमल पवार यांनी आपल्या फेसबुकवरती देखील ही पोस्ट शेअर केली असून सर्वांनी अवयवदान चळवळीचा प्रचार-प्रसार करण्याचे आवाहन केले आहे.
सध्या कोमल पवार यांची व्हायरल होत असलेली पोस्ट अनेकांना भावली असून अनेकांनी ती व्हाॅटस्अॅप, फेसबुकवरती शेअर केली आहे. कोमल पवार यांनी फेसबुकवरती पोस्ट केलेला मजकूर असा, अवयवदान चळवळीतल्या माझ्या सर्व सहकार्यांना आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. कोणालाही न सांगता मी १ सप्टेंबर २०२० रोजी सर्वांचा अखेरचा निरोप घेतला. याबद्दल मी सर्वांची माफी मागते. ३ वर्षांपूर्वी जेव्हा माझं हृदय आणि फुफ्फुस प्रत्यारोपण करून घेतला, त्याचवेळी डॉक्टरांनी मला ५ वर्षे बोनस आयुष्य असल्याचे सांगितले होते.
तुम्हाला कोणालाही दुःख, वेदना होऊ नये म्हणूनच मी हे सत्य तुमच्यापासून लपवून ठेवले. मी तेव्हापासून अवयवदानाचा प्रचार आणि प्रसार करायचं ठरवलं आणि तशी सुरुवात ही केली. मला मिळालेल्या ५ वर्षात जास्तीत-जास्त कष्ट घेऊन अवयवदानाचा प्रचार थोडीही विश्रांती न घेता संपूर्ण देश, जगभर करीत होते. परंतु १ तारखेला तब्बेत अचानक बिघडली आणि देवाघरचं आमंत्रण आलं आणि मला अचानक मला जावं लागलं.
मला अवयवदान जनजागृतीसाठी जे काही करता येईल ते मी केलं, परंतु माझं काम तुम्ही सर्वजण पुढे असेच चालू ठेवाल, याचा मला विश्वास आहे. हजारो लोकांचे प्राण तुम्ही वाचवू शकता. मला ज्यांनी अवयवदान केलं त्यांचे आभार तरी कसे मानू? त्यांच्यामुळेच मला अवयवदान जनजागृतीचं काम करता आलं. तुम्हा कोणालाही भेटता आलं नाही याचं फार वाईट वाटतंय. तुम्ही सगळ्यांनी कोमल न्यू लाईफ फौंडेशनच्या कामात खूप सहकार्य केलं आहे. कोमल न्यू लाईफ फौंडेशनचे हे काम पुढे निरंतर चालू ठेवाल, अशीच सगळ्यांकडून अपेक्षा व्यक्त करते.
माझं काम पुढे चालू ठेवा. कारण, आपल्या प्रचार-प्रसारामुळे अनेकांचा जीव वाचू शकतो, त्यामुळे आपण सर्वांनी अवयवदान जनजागृतीसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन फेसबुक पोस्टच्या माध्यमातून एका पत्राव्दारे कोमल पवार यांनी केली आहे. कोणालाही न सांगता मी १ सप्टेंबर रोजी सर्वांचा अखेरचा निरोप घेतला. याबद्दल सर्वांची माफी मागते. मी इथेच आहे आणि राहणार सद्दैव तुमच्या स्मृतीत. या आयुष्यामध्ये तुमचे लाभलेले मोलाचे सहकार्य आणि प्रेमाची मी सद्दैव ऋणी राहील, अशी भावना त्यांनी एका पत्राव्दारे व्यक्त केली आहे.
https://www.facebook.com/komal.pawar.144181/posts/1628875850619914
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.