कोरेगाव (जि. सातारा) : दररोज अवघे 33 रुपये एवढ्या अत्यल्प मानधनावर, कोणत्याही सुविधांशिवाय कोरोनाच्या महामारीत कार्यरत असलेल्या आशा स्वयंसेविकांची अक्षरशः होरपळ सुरू आहे. शासनाने पुरेसे मानधन आणि संरक्षण द्यावे, अशी त्यांना "आशा' आहे. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना साकडे घातले आहे.
सध्या कोरोनाची स्थिती गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर स्वतःचा जीव धोक्यात घालत घरोघरी जाऊन आरोग्य जागृती करणाऱ्या आशा स्वयंसेविकांना अत्यल्प मानधनावर काम करावे लागत आहे. सध्या मिळणाऱ्या मानधनाचा हिशेब केल्यास ते दररोज अवघे 33 रुपये एवढे अल्प असल्याची माहिती कोरेगाव येथील आशा स्वयंसेविका पुष्पा मसणे यांनी दिली. गेल्या मार्चपासून निर्माण झालेल्या कोविडच्या संक्रमणात आशा स्वयंसेविकांचे घरोघरी जाऊन सर्वेक्षणाचे काम अविरतपणे सुरू आहे. गेले पाच महिने त्या स्वत:चा जीव धोक्यात घालून कोरोना रुग्णांपर्यंत पोचत आहेत आणि प्रशासनाला आवश्यक माहिती पुरवण्याचे काम करत आहेत.
सामान्य जनता व शासन यांच्यातील दुवा म्हणून काम करताना आशा स्वयंसेविकांना अनेकदा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असून, अनेक ठिकाणी त्यांच्यावर हल्लेही झाले आहेत. अत्यल्प मानधनावर महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडणाऱ्या या खऱ्या खुऱ्या कोविड योद्ध्यांच्या पाठीशी मात्र कोणीही उभे राहिले नाही. कोणत्याही सुविधा नाहीत. स्वत:च्या आरोग्याचे संरक्षण नाही. परिपूर्ण आरोग्य किट देखील नाही, अशा परिस्थितीतही त्यांचे काम अविरतपणे सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर शासनाने आम्हाला पुरेसे मानधन आणि संरक्षण द्यावे, अशी आमची मागणी आहे. तसे निवेदन आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे, अशी माहिती मसणे यांनी दिली. यासंदर्भात प्रांताधिकारी व तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. त्याचबरोबर विधिमंडळाच्या अधिवेशनात आमचे प्रश्न मांडून ते सोडवण्याची मागणी आमदार शशिकांत शिंदे व आमदार महेश शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्याचेही मसणे यांनी सांगितले.
संपादन : बाळकृष्ण मधाळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.