सातारा : 'मैत्री' हा शब्द जितका छोटा, तितकाच त्यात मोठा अर्थ सामावलेला आहे. 'निसर्ग' हा 'मित्र' म्हणून आपल्याला सर्वात जवळचा वाटतो. त्याच्याबरोबर केलेल्या मैत्रीला कधीच धक्का लागणार नाही, हे आपल्याला ठाऊक असतं! निसर्ग आपल्याला झाडे, फुले, फुलपाखरे, पक्षी, डोंगर, पर्वत, नद्या, चंद्र, चांदण्या व सूर्य यांची अनेक रूपे दाखवतो. त्यातूनच आपल्याला निखळ आनंद मिळतो. निसर्गाने आपल्यावर रंग, सुगंध व हिरवा ताजेपणा याची बरसातच केली आहे. निसर्गाची ही श्रीमंती पाहून थक्क व्हायला होते. आज रविवार दि. 2 ऑगस्ट जागतिक मैत्री दिवस. भारतामध्ये ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी मैत्री दिवस किंवा मैत्री दिन साजरा केला जातो.
१९५८ पासून पेरुग्वेमध्ये सुरू झालेला हा जागतिक मैत्री दिन उपक्रम दक्षिण अमेरिकेतील बहुतांशी देशात आवर्जून साजरा केला जातो. या दिवशी मित्र-मैत्रिणी परस्परांना मैत्री दिवसाच्या शुभेच्छा देतात, रंगीत धागे बांधतात, फुले, पुष्पगुच्छ, भेटवस्तू देतात आणि आपली मैत्री चिरंतन राहो, अशा सदिच्छा व्यक्त करतात. मैत्री हे एक नाते आहे, देव आपल्याला भाऊ/बहीण देतो... ते कसेही असोत; आपल्याला ते नाते मान्य करावे लागते; पण मैत्री हे असे नाते आहे जे आपण स्वतः ठरवून रक्ताच्या नात्यापेक्षाही अधिक घट्ट नाते बनवू शकतो. रक्ताच्या नात्याइतकेच मैत्रीचे नातेदेखील घट्ट असते.
आपलं जगणं हे झाडांच्या ऑक्सिजनमुळे आहे. म्हणून या झाडांना जपलं, तर आपण जगू. 'एक आपलं झाड, त्याची आपणच करायची वाढ' ही संकल्पना घेऊन लाखो झाडे लावणारे आणि झाडांसोबत निखळ मैत्री जपणारे अभिनेते आणि सह्याद्री देवराईचे प्रणेते सयाजी शिंदे! सयाजी शिंदे हे मराठी चित्रपट, नाटके, तसेच कन्नड, तमिळ, मल्याळम, तेलुगू आणि हिंदी भाषांतील चित्रपटांमध्येही त्यांनी अभिनय साकारला आहे. कॉलीवुड-टॉलीवुड चित्रपटसृष्टींत त्यांचे चित्रपट अतिशय लोकप्रिय ठरले आहेत.
शिंदे हे मूळचे सातारा जिल्ह्यातील असून मुंबईत मराठी चित्रपट-नाटके व हिंदी चित्रपटांतून अभिनय केल्यानंतर त्यांनी कॉलीवुड व टॉलीवुडाची वाट धरली. त्यांनी आतापर्यंत सुमारे ३० तेलुगू, १२ तमिळ, ४० हिंदी, 8 मराठी तसेच २ इंग्लिश, १ कन्नड व १ मल्याळम चित्रपटांमधून कामे केली आहेत. अभिनयासोबतच त्यांनी चित्रपटनिर्मितीही केली आहे.
आज झाडाला किंमत नाही, पैशांना किंमत दिली जाते. आपण बँकेत पैसे ठेवतो. परंतु त्या पैशांपेक्षा अधिक फायदा वृक्ष आपल्याला देतात. झाड आपल्याला जगवतात, त्याच्याशी आपण मैत्री केली पाहिजे, झाडांशी आपण सुसंवाद साधला पाहिजे. आई हे सर्वात मोठे विद्यापीठ आहे. मी राजा असलो, तरी तिला मरणापासून वाचवू शकत नाही. आई आपल्याला जन्म देते आणि वाढवते; पण आईनंतर आपल्याला झाडच जगवते, त्यामुळे आपण झाडांना जगवलं पाहिजे. झाडं लावली पाहिजेत.
मी माझ्या आईच्या वाढदिवसाला बियांची तुला केली. तिच्या वजनाएवढ्या बिया रूजविण्याचा संकल्प केला आणि आईला सांगितले की, तू आता या झाडांच्या रूपात आयुष्यभर सोबत असशील. झाडांच्या पानांमधील आवाजातून, पक्ष्यांच्या किलबिलाटातून, फुलांच्या सुगंधातून, फळांतून तू मला भेटत राहशील. या निसर्गाच्या फुलण्यातून तुझं हसणं मला दिसेल. जिथे बी रूजेल तिथे तुझं रूप मला दिसेल. म्हणून प्रत्येकाने वाढदिवसी झाडं लावून या धरणीमातेला हिरवाईने नटवायला हवे, असं अभिनेता सयाजी शिंदे सांगत आहेत.
हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांचे वृक्षप्रेम जगजाहीर आहे. या प्रेमापोटी त्यांनी आता विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शाळा-शाळांतून छोटेखानी नर्सरी (रोपवाटिका) करण्याचे ठरवले आहे. शाळेत तयार केलेल्या रोपांचे संबंधित मुलांकडूनच रोपण करवून घेऊन व त्याचे संगोपन करण्याचेही काम त्यांना देऊन त्यांच्यात वृक्षप्रेम रुजवण्याचे, वृक्षाशी मैत्री करण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. मराठी नाटके व चित्रपट, तसेच हिंदी, कन्नड, तमिळ, मल्याळम, तेलगू चित्रपटांतून बहुतांश खलनायकी ढंगाच्या व काही विनोदीही भूमिका केल्याने चित्रपट रसिकांमध्ये प्रसिद्ध असलेल्या सयाजी शिंदे यांनी मागील चार-पाच वर्षांपासून वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे काम हाती घेतले आहे.
आज राज्यात तब्बल 20-22 ठिकाणी त्यांनी सुमारे साडेचार लाखांवर झाडे लावून ती स्थानिकांच्या मदतीने जगवण्याचे काम केले आहे. सयाजी पार्क उपक्रमांतून देशी झाडांच्या देवराया त्यांनी उभ्या केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नव्याने ही चळवळ वाढवण्यासाठी त्यांनी 'ट्री स्टोरी' फाउंडेशन स्थापन केले असून, त्या माध्यमातून वृक्षप्रेमींना संघटित करून त्यांच्याद्वारे वृक्षारोपण व वृक्षसंगोपनाचे काम हाती घेतले आहे.
शालेय विद्यार्थ्यांनी आंबे, जांभूळ, चिंच व अन्य देशी व उपयुक्त झाडांच्या बिया संकलित करून शाळेत त्याची छोटेखानी रोपवाटिका तयार करायची व नंतर या बियांतून उगवलेली रोपे घराजवळ वा परिसरात रोपण करण्याची आणि नंतर पुरेशी वाढ होईपर्यंत त्यांचे संवर्धन व संरक्षण करण्याची ही मोहीम आहे. त्या झाडाला त्या संबंधित मुलाचेच नाव देण्यात येणार असल्याने आपल्या नावाचे झाड लहानाचे मोठे करण्यात मुले नक्कीच पुढाकार घेतील, असा विश्वास शिंदे व्यक्त करताहेत.
शाळांतून शिकणाऱ्या प्रत्येक मुलाने एक झाड लावून त्याचे संगोपन केले, तर पर्यावरण संतुलन राखण्यात मोठे योगदान ठरेल, असा विश्वासही ते व्यक्त करताहेत. सध्या आमचा नारा हा 'येऊन येऊन येणार कोण, झाडाशिवाय दुसरं कोण, आमचा एकच पक्ष, तो म्हणजे वृक्ष अशा घोषणा विद्यार्थ्यांच्या तोंडी आल्या की, जनजागृती व्हायला वेळ लागणार नाही.
आज जागतिक मैत्री दिनी सर्वांनी संकल्प करूयात की, झाडांशी मैत्री करुया, झाडांचे संगोपन करूया आणि झाडे जगू या.. मैत्री केवळ नात्यांशी जोडली जाते, असे नाही; ती झाडांशी जोडता येते. आज अभिनेते सयाजी शिंदे यांच्यासारखे कार्य सर्वांनी हाती घेतले, तर पर्यावरण सुधारायला वेळ लागणार नाही. पर्यावरणाची कधीच हानी होणार नाही. झाडे लावल्याने पर्यावरणाचा होणारा ऱ्हास आपल्याला वाचता येईल, तेव्हा प्रत्येकाने या फ्रेंडशिप दिनी झाडांशी 'मैत्री' केली पाहिजे, तेव्हाच या मैत्री दिवसाला खऱ्या अर्थाने महत्त्व प्राप्त होईल!
संपादन - सुस्मिता वडतिले
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.