सातारा : जगभरात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता विविध रुग्णालयांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवू लागल्याचे स्पष्ट दिसत आहे. मात्र, सध्याच्या लोकसंख्येच्या २ टक्के प्रमाणात जरी इच्छेने रक्तदान केले, तर रक्तपेढीत कधीच रक्ताचा तुटवडा जाणवणार नाही किंवा रक्ताच्या एका थेंबावाचून कुणाचे प्राण जाणार नाहीत. मानवाने आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कितीही प्रगती केली तरी कृत्रिमपणे रक्त तयार करता येत नाही. मानवाला फक्त मानवाचेच रक्त चालते, म्हणून रक्तदान ही अमूल्य सेवा आहे.
मानवी शरीरात ५ लिटर रक्त असते. रक्तदानातून फक्त २५० मि.ली. रक्तदान केले जाते की, जे काही तासातच शरीर भरुन काढते. त्यामुळे रक्तदान केल्याने कसलाही अशक्तपणा येत नाही. उलट जुने रक्ताची जागा नवीन शुद्ध रक्ताने भरली जाते. रक्तदानापूर्वी रक्तदात्याची संपूर्ण शारीरिक तपासणी केली जाते. रक्तदात्याचे वजन, हिमोग्लोबीनचे प्रमाण, रक्तगट तपासणी, रक्तदाब आदी तपासण्यानंतरच रक्तदात्याचे रक्तदान करुन घेतले जाते. रुग्णाला रक्त संक्रमण देण्यापूर्वी त्या रक्त युनीटवर मलेरिया, गुप्तरोग, काविळ आणि एचआयव्हीबाबतच्या तपासण्या केल्या जातात. त्यामुळे खरे तर रक्तदानामुळे रक्तदात्याची सखोल शारीरिक तपासणीच होवून जाते. रक्तदानाचा हा एक मोठा फायदा आहे.
बहुतेक रक्तदाते (स्वयंसेवक) स्वखुशीने अणि विनामोबदला रक्तदान करतात. काही देशांमध्ये रक्ताचा पुरवठा मर्यादित आहे, कारण देणगीदार फक्त नातेवाईकांसाठी किंवा मित्रांसाठीच रक्तदान करतात. अनेक रक्तदाते रक्तदान एक देणगी म्हणून करतात. परंतु ज्या देशांमध्ये रक्त विकण्याची परवानगी आहे तिथे रक्तदात्यांना पैसे मिळतात. रक्तदानासाठी काही ठिकाणी कामकाजावरून मोकळा वेळ दिला जातो. आज सातारा जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा प्रसार होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र, जिल्ह्यात अनेक सामाजिक संस्थांमुळे रक्ताची कोणतीही समस्या जाणवत नसल्याचे स्पष्ट होत आहे, त्यामुळे रक्ताचा फार तुटवडा नाही.
सध्या सिव्हिलमध्ये २० ते ३०० रक्ताच्या बाॅटलची पुर्तता होत आहे. विविध शिबिराव्दारे महिन्याला २५० ते ३०० इतक्या रक्ताच्या बाॅटल्स मिळत असल्याने रक्ताचा पुरवठा जाणवत नाही. मागणी तसा पुरवठा या अनुषंगाने रुग्णांना रक्ताचा पुरवठा केला जात आहे. सध्या शाळा, महाविद्यालये बंद असल्याने रक्तदान शिबिरं घेण्यास अडथळा येत असला तरी, विविध रक्त बॅंकांव्दारे रक्ताचा नियमित प्रमाणात पुरवठा केला जात आहे. सध्या गर्भवती महिलांना मोठ्या प्रमाणात रुग्णालयात रक्त पुरवठा केला जात असून मुबलक प्रमाणात रक्तसाठाही शिल्लक असल्याचे येथील डाॅक्टर सांगत आहे. साधारण रक्ताचा कालाधी हा ३५ दिवसांचा असतो. ३६ व्या दिवशी हे रक्त खराब होत असल्याचेही डाॅ. पद्माकर कदम यांनी सांगितले.
देशात १२५ कोटी लोकसंख्या असूनही केवळ १ कोटी २० लाख लिटर रक्त पुरवठा केला जात आहे. गेल्या वर्षी ७४ लाख युनिट रक्त उपलब्ध झाले होते. आवश्यकतेनुसार ४० टक्के रक्ताची कमी होती. रक्त न मिळाल्यामुळे मृत्यूचे प्रमाण देशभरात १५ ते २० टक्के आहे. भारतात केवळ ०.६ टक्के लोक रक्तदान करतात. खाजगी रुग्णालयांमध्ये रक्ताची आवश्यकता असताना त्यांच्याकडे तेवढा साठा उपलब्ध नसल्याचे एका सर्वेक्षणानुसार लक्षात आले आहे. काही खाजगी रक्तपेढींमध्ये जास्तीचे पैसे घेऊन रक्त दिले जात असल्याच्या तक्रारी असल्या तरी त्याबाबत फारशी माहिती नाही.
आज आपण कितीही विकसित झालो असलो तरी कोणीही रक्ताच्या कारखान्याची निर्मिती करू शकले नाही. शासकीय पातळीवर रक्तदान संदर्भात जागृती केली जात असली तरी त्या प्रमाणात रक्तदाते मात्र समोर येत नाही. एका व्यक्तीने एकदा रक्त दिल्यानंतर साधारणत तीन महिन्यांनी रक्त देणे आवश्यक आहे. मधुमेह असलेले रुग्ण जर इन्शुलिन घेत असतील तर त्यांना रक्तदान करता येत नाही. रक्तदान करताना शरिरात हिमोग्लोबीनचे प्रमाण १२.५ ग्रॅमपेक्षा अधिक असणे गरजेचे आहे. रक्तदानानंतर शरिरात रक्ताची पूर्ती २४ तासात होते. रक्तदाताच्या शरीरातून ३५० किंवा ४५० मि.लि. पर्यंत रक्त घेऊ शकतात. जे नेहमीच रक्तदान करतात त्यांना मधुमेह, हृदयरोग, कॅन्सर आणि रक्तचापसारखे आजार होत नाही, असेही डाॅ. कदम म्हणाले.
रक्त पेढीव्दारे सिव्हिल रुग्णलयाला रक्त पुरवठा होत असतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा रक्त तुटवडा जाणवत नाही. साधारण महिन्याला २५० ते ३०० बाॅटल लागत होत्या. मात्र, कोरोनामुळे याचं प्रमाण आता निम्यावर आलं आहे. रक्त पेढीच्या माध्यमातून महिन्याला पाच ते सहा शिबिर होत असतात. सध्या रुग्णालयात ६० ते ७० इतक्या रक्ताच्या बाॅटल्स आहेत, त्यामुळे रक्ताचा पुरवठा सुरळीत सुरु आहे. मागणी तसा पुरवठा या अनुषंगाने २० ते ३०० रक्ताच्या बाॅटल्स मिळत असतात. रक्ताचा कालावधी हा ३५ दिवसांचा असतो. ३६ व्या दिवशी हे रक्त खराब होत. सध्या गर्भवती महिलांना मोठ्या प्रमाणात रुग्णालयात रक्त पुरवठा केला जात असून मुबलक प्रमाणात रक्तसाठाही शिल्लक आहे.
-डाॅ. पद्माकर कदम, सिव्हिल हाॅस्पिटल, सातारा
सध्या कोरोना महामारीमुळे रक्तदाते जमविताना खूप अडचण येत आहेत. कोरोनामुळे लोक घराबाहेर पडत नाहीत, त्यामुळे रक्ताचा साठा थोडा कमी आहे. त्यातच शाळा, महाविद्यालये देखील बंद असल्यामुळे रक्तदान शिबिरेही होत नाहीत. प्रत्येकाला स्वत:ची काळजी असल्यामुळे कोणीही रक्तदान करण्यास बाहेर पडत नाही. आम्ही वर्षभरात संस्थेच्या माध्यमातून ८ ते १० शिबिर घेत असतो, तसेच वर्षभरात २०० ते २५० जणांना आम्ही रक्त पुरवठा करत असतो.
-विक्रांत देशमुख, युवा मोरया सामाजिक संस्था, सातारा
रक्तदानाचे फायदे
रक्ताची तपासणी होते (एच.आय.व्ही., गुप्त रोग, कावीळ-ब, क प्रकारची, मलेरिया) वजन, तापमान, रक्तदाब व नाडी परीक्षण होते.
रक्तगट व हिमोग्लोबिनच्या प्रमाणाबाबत माहिती मिळते.
बोन मॅरोमध्ये नवीन रक्त तयार करण्याची कार्यक्षमता वाढते.
नवीन तयार झालेल्या रक्तपेशी व रक्तरस यामुळे रोग प्रतिकार शक्ती वाढून शरीरात चैतन्य निर्माण होते.
नियमित रक्तदान केल्याने शरीरातील लोहाचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा जास्त वाढत नाही. त्यामुळे हृदय-यकृतासारखे अवयव निरोगी राहतात.
रक्तदान कोण करू शकत नाहीत
रक्तदात्याने आधीच्या ३ दिवसांत कोणतेही प्रतिजैविक औषध घेतले असल्यास
रक्तदात्याला मागील ३ महिन्यात मलेरिया झाला असल्यास
रक्तदात्याला मागील १ वर्षात विषमज्वर, कावीळ किंवा श्वानदंश होऊन त्याने रेबीजची लस घेतली असल्यास
६ महिन्यापूर्वी त्याची मोठी शस्त्रकिया झाली असल्यास
गर्भवती महिला, महिलेला १ वर्षाखालील मूल असल्यास किंवा तिचा ६ महिन्यात गर्भपात झाला असल्यास
ब्लड प्रेशर लो किवा हाय असणाऱ्यांनी रक्तदान करताना रक्तदाबाची चाचणी करून पहावी.
उपाशीपोटी किंवा खाऊन झाल्यावर अर्धा-तासापर्यंत रक्तदान करू नये.
इतरही आजारांची चाचणी करून घ्यावी.
रक्तदान कोणी, केव्हा व कुठे करावे
वयाच्या १८ वर्षानंतर (६५ वर्षापर्यंत)
वजन ४५ कि.ग्रॅ. च्या वर असल्यास
रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमीत कमी १२.५ ग्रॅम असल्यास
रक्तदाता पूर्णपणे निरोगी असल्यास
दर ३ महिन्यांनी आपण रक्तदान करता येते.
जवळच्या रक्तपेढीत किंवा कोठेही आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात रक्तदान करता येते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.