सातारा : सातारा शहर पोलिस ठाणे कार्यरत असणारी इमारत उपलब्ध मनुष्यबळाच्या तुलनेत कमी पडू लागल्याने त्या ठिकाणच्या काही शाखा तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार शहर पोलिस ठाण्याचा कारभार मुख्य इमारतीसह त्याच परिसरातील पब्लिक स्कूलच्या इमारतीतून लवकरच सुरू होणार आहे.
सातारा शहर पोलिस ठाण्याचा कारभार जिल्हा मध्यवर्ती कारागृहासमोरील असणाऱ्या ब्रिटिशकालीन इमारतीतून सुरू आहे. पोलिस निरीक्षक कक्ष, ठाणे अंमलदार, सीसीटीएनएस कक्ष, आवक- जावक बारनिशी विभाग, दप्तरी कक्ष, क्राईम आणि गोपनीय, गुन्हे प्रकटीकरण शाखा, वायरलेस, तसेच मुद्देमाल कक्ष आदी विभाग चार खोल्यांतच एकत्र आहेत. शहराचा विस्तार लक्षात घेता मध्यंतरीच्या काळात सातारा शहर पोलिस ठाण्याचे विभाजन करत शाहूपुरी पोलिस ठाणे कार्यान्वित करण्यात आले. विभाजनानंतर सद्यःस्थितीत सातारा शहर पोलिस ठाण्यामध्ये दोन पोलिस निरीक्षक, ९ सहायक व उपनिरीक्षक आणि १७० कर्मचारी कार्यरत आहेत.
अपुरी जागा आणि दिवसभर कर्मचारी, नागरिकांच्या वर्दळीमुळे येथील पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर मर्यादा पडत होत्या. त्यामुळे पोलिस ठाण्यातील काही शाखा स्थलांतरित करण्याचा विचार काही अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना बोलून दाखवला. स्थलांतर करायचे झाल्यास मुख्य पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर नवीन जागा असावी, असा हेतू नजरेसमोर ठेवत जागेचा शोध सुरू करण्यात आला.
मध्यंतरीच्या काळात सातारा पोलिस दलाने पुढाकार घेत पोलिस कर्मचारी, तसेच नागरिकांच्या पाल्यांसाठी पब्लिक स्कूल सुरू केले होते. हे पब्लिक स्कूल कोरोनाच्या लाटेनंतर दुसरीकडे स्थलांतरित झाल्याने सुस्थितीत असणारी ही इमारत वापराविना पडूनच होती. त्यामुळे ती जागा सातारा शहर पोलिस ठाण्यातील शाखा तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करण्यासाठी निवडण्यात आली. त्यानुसार शासकीय प्रक्रिया पार पाडत सध्या शहर पोलिस ठाण्यात असणाऱ्या
कारकून विभाग, अर्ज शाखा, हजेरी विभाग, प्रतिबंधक विभाग, माहिती अधिकार शाखेसह इतर काही शाखा स्थलांतरित करण्यात येणार आहेत. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा उभारण्याचे काम सध्या त्याठिकाणी सुरू आहे.
"अपुऱ्या जागेमुळे पोलिस कर्मचाऱ्यांच्या कामावर मर्यादा पडत होत्या. संवेदनशील गुन्ह्यांचा तपास व इतर कामे खोळंबत होती. पोलिस कर्मचाऱ्यांची अडचण लक्षात घेत शहर पोलिस ठाण्याच्या मुख्य इमारतीतील काही शाखा नवीन जागेत स्थलांतरित करण्यात येत आहेत."
- भगवान निंबाळकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सातारा शहर
नवीन इमारतीचे हवेत इमले...
सातारा शहर पोलिस ठाण्यासाठी सुसज्ज इमारत उभारण्यात येणार असल्याच्या, त्यासाठी जागा निवडण्यात आल्याच्या घोषणा यापूर्वी अनेक वेळा झाल्या होत्या. वरिष्ठ पोलिस अधिकारी, त्या खात्याशी निगडित सचिव आल्यानंतर पोलिस मुख्यालयासह शहर पोलिस ठाण्याच्या नवीन इमारतीचा प्रश्न चर्चेत येत असे. या चर्चेनंतर लवकरच काम सुरू होईल, असे ते अधिकारी, सचिव सांगत. गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ सुरू असलेल्या नुसत्याच चर्चांमुळे पोलिस दलाच्या नव्या इमारतींचे इमले सध्या तरी हवेतच तरंगत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.