सातारा

'कोरोनाचा गळा आवळून त्याला एकदाचं मारून टाकावं'; शिक्षिकेने सांगितली थरारक कहाणी

संदीप गाडवे

केळघर (सातारा) : 21 एप्रिलच्या 'त्या' रात्री अचानक माझी पुतणी प्रतीक्षाला अंगात थकवा जाणवू लागला. तिच्या अंगात ताप भरला होता. मैत्रिणीच्या घरून आल्यापासून ती झोपूनच होती. 22 एप्रिलला मम्मी-पप्पांचा लग्नाचा 25 वा वाढदिवस (Birthday) असल्यामुळे त्यांना सरप्राईज् करण्यासाठी तिने आधीच भला मोठा केक घरात आणून ठेवला होता. घरात नेहमीसारखंच आनंदी वातावरण होतं. आदल्या दिवशीच मी आमच्या गावचे लसीकरण असल्यामुळे लोकांच्या मदतीसाठी लसीकरण केंद्रावर (Vaccination Center) दिवस भर थांबून उशिरा घरी आले. मात्र, काही केलंतरी प्रतीक्षा उठत नव्हती, त्यामुळे आमचे फॅमिली डॉक्टर (Family Doctor) पवार यांच्याकडे भाऊजी प्रतीक्षाला घेऊन गेले. डॉक्टर पवार यांनी तिला तपासल्यावर तिच्या लक्षणांवरून चाचणी करावयास सांगितली आणि विलगीकरणात ठेवायला सांगितले. घरात भीतीचे वातावरण पसरल्याचे अंजली गोडसे (Anjali Godse) यांनी सांगितले. (The Godse Family From Mardhe Village Defeated Coronavirus Satara Marathi News)

कोरोना भारतात आल्यापासून आमच्या परिवारानं, त्यापासून वाचण्यासाठी विशेष काळजी घेतली होती. आम्ही दोघेही शिक्षक असल्यामुळे जगाचे प्रबोधन करताना घरी निष्काळजी वागू शकत नव्हतो.

त्या पुढे सांगू लागल्या.. कोरोना (Coronavirus) भारतात आल्यापासून आमच्या परिवाराने त्यापासून वाचण्यासाठी विशेष काळजी घेतली होती. आम्ही दोघेही शिक्षक असल्यामुळे जगाचे प्रबोधन करताना घरी निष्काळजी वागू शकत नव्हतो. त्यात घरांमध्ये सासू-सासरे दोघेही वयस्कर होते. सासऱ्यांना शुगरचा त्रास, तर सासुबाईंची नुकतीच ओपन हार्ट सर्जरी झाली होती. त्यामुळे आम्ही सर्वजण आमच्यासाठी कमी, पण त्यांच्यासाठी जास्त काळजी घेत होतो. प्रतीक्षाची कोरोना चाचणी करण्यात आली. चाचणी पॉझिटिव्ह आली. घरात पुन्हा चिंतेचे वातावरण! पवार डॉक्टरांनी घरातील सर्वांनाच कोरोनाची टेस्ट करून घ्यायला सांगितली. सर्वजण लिंब phc मध्ये टेस्ट करून घ्यायला गेले. मी एकटीच मुलांसोबत घरात होते. पुन्हा यामध्ये सासरे आणि आमचे पतीही पॉझिटिव्ह आले. 3 पॉझिटिव्ह आणि 6 निगेटिव्ह असे आम्ही राहिलो. भाऊजी आणि ताईच्या लग्नाचा वाढदिवस आम्ही मात्र साजरा केला. म्हटलं तुमच्या लग्नाचा 25 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी कोरोना पाहुणा आलाय 14 दिवस पाहुणचार करू आणि त्याला हद्दपार करु, असं सर्वांच्या मनाने ठरवलं. पवार डॉक्टरांच्या योग्य सल्ल्याने या तिघांचे औषधोपचार सुरू झाले. ऑक्सिमीटर आणि थर्मल गन यांची वर्णी लागली. कारण, ते गरजेचं होतं; पण हे ऑक्सिमीटरपण फसवे निघाले. प्रत्येक मशीनमध्ये ऑक्सिजन लेवल वेगवेगळी दाखवतात आणि आपल्याला चकवा देतात.

असो, 23 एप्रिलचा दिवस उजाडला. घरातील सर्व कामे उरकून माझी दोन मुलं, मी आमचे येथे राहणारे गुरव फॅमिली आणि त्यांची दोन मुलं घेऊन मी आमची मोठी गाडी घेऊन लिंबला गेलो. तिथे पोहोचलो तर लसीकरण करून घेण्यासाठी आबालवृद्धांची तोबा गर्दी उन्हा-तान्हाची पर्वा न करता या कोरोनापासून वाचण्यासाठी लस टोचून घेण्यासाठी उपाशी-तापाशी बसलेली होती. या वेळेस कोरोनामुळे किती भयावह स्थिती निर्माण झाली याची प्रचिती आली. थोड्याच वेळात आमचे मित्र सुधीर त्याठिकाणी आले, त्यांनी चौकशी केली. पण, टेस्ट करणाऱ्या मॅडमच त्याठिकाणी नसल्यामुळे आमच्या टेस्ट काही झाल्या नाहीत. मग मी सर्वांना घेऊन त्या ठिकाणाहून सायगाव PHC ला मर्ढे साळवणमार्गे निघून गेले. त्या ठिकाणी फोन करून ठेवला होता. सुधीरच्या ओळखीचे कोणतरी होतं. सायगावला पोहोचलो, तर येथेही लसीकरणाला तोबा गर्दी. या ठिकाणी आमच्या सहा जणांच्या एंटीजन टेस्ट करण्यात आल्या. टेस्ट करताना माझा छोटा मुलगा अंशने भरपूर गोंधळ घातला. शेवटी त्याला दोघा-तिघांनी धरलं आणि त्याच्या नाकातून स्वॅब घेण्यात आला. त्यावेळेस त्या कोरोनाचा गळा आवळून त्याला एकदाच मारून टाकावे, असा विचार माझ्या मनात आला. थोड्याच वेळात आम्हाला रिपोर्ट सांगण्यात आले. मला थोडी सर्दी आणि घसा खवखवत असल्यामुळे माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह येणार याची मला मनोमन खात्री वाटत होती आणि ते खरंच झालं. माझ्या एकटीचाच रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि मला बाजूला करून डॉक्टरांना दाखवण्यात आलं. मला त्याठिकाणी औषधे देण्यात आली. तोपर्यंत मला बाजूला केल्यामुळे अंश मात्र हमसून हमसून रडायला लागला होता. त्याच्या डोळ्यातील पाणी थांबायचं नाव घेईना. मी आपलं काळजावर दगड ठेवून त्याकडे दुर्लक्ष केलं आणि रागावून सर्वांनी शांत बसा असं बोलले. त्यांना शांत बसा असं सांगितलं खरं, पण माझं मन अशांत झालं होतं.

मनात वादळ उठून त्या सागराच्या लाटा पापण्यांना येऊन धडकत होत्या, पण मी माझा संयम राखला आणि मुलांच्यासमोर आपलाच गोंधळ नको म्हणून शांत राहिले. तिथून घरी साताऱ्याला यायचं होतं. अंशला कसतरी सुरेखाने शांत केले. घरी फोनवर बातमी दिली की, विलगीकरणमध्ये माझीही वर्णी लागली. मी एकटीच ड्रायव्हिंग सीटवर बसले आणि सर्वांना मागच्या सीटवर बसवण्यात आलं. सगळ्या गाडीत सॅनिटायझर मारलं आणि आमची गाडी निघाली सातार्‍याच्या दिशेने. आता घरात चार पॉझिटिव्ह आणि पाच निगेटिव्ह. तराजू अजून थोडा खाली वर होत होता. सासुबाईची तब्येत आणि त्या हार्ट पेशंट असल्यामुळे त्यांना गावाला पाठवायचं सर्वानुमते ठरवण्यात आलं आणि 24 एप्रिलला भाऊजींनी घरी नेऊन सोडलं आणि आम्ही सर्वांनी सुटकेचा श्वास टाकला. पण, हाच श्वास पुढे फास बनेल हे आम्हाला त्यावेळेस कळल नाही. अचानक मला आता आलेला ताप नि सासर्‍यांचा खोकला यामुळे आमच्या डॉक्टरांनी एचआरसिटी स्कोर आणि रक्ताच्या टेस्ट ज्याला कोविड प्रोफाइल म्हणतात ती करावयास सांगितले. आम्हाला सर मोठ्या गाडीत घेऊन रूबी हॉल क्लिनिक आणि व्हिजन लॅबला घेऊन गेले. बाहेर पडले असले तरी मनात भयंकर भीतीचे सावट होते. आमचे मिस्टर सासऱ्यांना घेऊन लॅबमध्ये रक्त द्यायला घेऊन गेले आणि मी रुबी हॉलमध्ये स्कॅन करण्यासाठी नंबरला उभी राहिले. उन्हात जास्त वेळ थांबाव लागू नये म्हणून रक्त देऊन आमचे हे नंबरला थांबले आणि मी गाडी घेऊन पुन्हा लॅबमध्ये रक्त देण्यासाठी गेले तिथेही नंबर होते. खबरदारी म्हणून मी सर्वांपासून लांब होते, पण मला काय माहिती माझ्या पुढच्या लाईनमध्ये असलेली ही पॉझिटिव्ह होते. उभे राहुन चक्कर यायला लागली होती, तेवढ्यात ते माझ्या जवळ आले आणि म्हणाले रुबी हॉलमध्ये ऑनलाईन पेमेंट होत नाही त्यांना रोख कॅश पैसे हवे आहेत. जवळच ATM असलेने पैसे काढण्याची सोय झाली. हे सगळे आपल्याला माहित आहे, म्हणून ठीक.. पण ज्यांना काहीच माहित नाही त्या गरीब बिचाऱ्यांनी काय करायचं.

माझ्याबरोबर कोणी नव्हतं ते ब्लड काढताना कसलीही मनात भीती वाटली नाही. कोरोनाचा राग मनात धगधगत होता. तिथून मी रुबीला आले पैसे दिले नाहीत म्हणून त्यांनी आमचा नंबर मागे लावला. बघा ना पैसा बोले आणि कागद हाले! स्कॅन करायचे मशीनच नेमकी बंद पडली. जवळ जवळ एक ते दीड तास वेळ गेला तोपर्यंत मी गाडी सावलीला लावून थांबले. तर खूप भूक लागली होती. समोरच्या गाडी वाल्याकडून संत्री, केळी आणि मारी बिस्किटे विकत घेतली. दहा रुपयाचा पुडा बारा रुपयांना दिला का तर माल मिळत नाही म्हणून असं म्हटलं. वेळेला केळ! गाडीत बसून आम्ही संत्री खाल्ली, टेस्ट झाली आणि आम्ही सर्वजण घरी पोहोचलो. पुन्हा गाडी सॅनिटायझर केली. दुसऱ्या दिवशी रिपोर्ट आल्यानंतर आमच्या पवार डॉक्टरांनी सासऱ्यांना डॉक्टर जरग यांच्याकडे नेण्याचा सल्ला दिला. योग्य निदान योग्य उपचार योग्य सल्ला हीच त्रिसूत्री पवार डॉक्टरांची आम्हाला या संकटातून बाहेर घेऊन आली. विशेष म्हणजे रात्री साडेबारा वाजता जरग हॉस्पिटलमध्ये नंबर आला आणि ते रात्री दीड वाजता घरी आली. आणखी एक दिवस गेला की भाऊजी जाऊबाई, गौरव सगळ्यांनाच अंगदुखी सर्दीचा त्रास व्हायला सुरुवात झाली. पुन्हा ते सर्व पवार डॉक्टरांना जाऊन भेटले आणि त्या सर्वांची rt-pcr टेस्ट करावयास सांगितले. पुन्हा घरावर चिंतेची टांगती तलवार आम्ही चौघ एका बाजूला हे तिघे टेस्ट करायला गेली आणि पहिल्यांदाच घरात अंश एकटा बसला होता. आम्ही सोबत होतो, पण आम्हाला घरात जायची कोरोनाने परवानगी दिली नव्हती. पोटात नुसता गोळा उठत होता आणि अंश इकडून तिकडून यायचा आणि हाका मारायचा. लेकराच्या आवाजानं काळीज पिळवटायचं पण करता काय! जाऊबाईंना जास्त त्रास नको म्हणून आम्ही वेगळा संसार थाटला होता. सिलेंडर डबल होता, पण शेगडी मित्रवर्य संदीप रोकडे यांनी दिली. आमचं निम्म काम आम्हीच करू लागलो. पण नियतिला हेही मान्य नव्हतं. भाऊजी अचानक आमच्या खोलीत आले. त्यांना मी विचारले कशाला आलात तर त्यांचे उत्तर आता काय राहिले आहे? मी म्हटलं काय झालं ते म्हणाले आमचे पण रिपोर्ट पॉजिटिव्ह आलेत. झालं पुन्हा वेगळा मांडलेला आमचा संसार एक झाला. कोरोनाला पण वाटल असेल तुम्ही वेगळे नाही राहिलं पाहिजे. आता घरात एकूण सात पॉझिटिव्ह झाले. राहिला फक्त छोटा अंश आणि गावाला आत्याबाई पवार डॉक्टर म्हणाले त्याला काहीही होणार नाही. तुमच्याकडेच राहू द्या. त्याला कोठेही पाठवू नका, नाहीतर त्याच्यामुळे कोरोना फैलावेल.

अंशला आम्ही आमच्यातच गृहीत धरलं. आमच्या सर्वांप्रमाणे अंश सर्व काळजी घेत होता. एवढ्याशा या लेकराला किती समज. पवार डॉक्टरांनी त्याला ही थोडी औषधे दिली. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आमच्या तब्येतीत सुधारणा होत गेली. एक दिवस वाफारा घेताना अंशच्या गळ्याला चटका बसला, पण तरीही त्याने वाफारा बंद नाही केला. जाऊबाईंना थोडा त्रास झाला, पण त्याही त्यातून सावरल्या. पवार डॉक्टर वरचेवर फोन करून आढावा घेत होतेच. आत्यांचे फोन येतच होते. त्यांनाही तिथे थोडा ताप येऊन गेला, पण त्या बऱ्या झाल्या त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्यामुळे आम्ही जास्त विचार केला नाही. पण, त्यांना जेवण काही जात नव्हते म्हणून एक दिवस डॉक्टरांना घेऊन हे आईचे चेकअपसाठी घरी गेले. डॉक्टरांनी तपासणी केल्यावर आईचा hrct आणि कोविड प्रोफाइल या सर्व टेस्ट करावयास सांगितल्या. अँटीजन आधी आणि Rtpcr टेस्ट करावयास सांगितले. त्यांना साताऱ्याला आणण्यात आलं आणि वेगळ्या रूम मध्ये ठेवण्यात आलं. दुसऱ्या दिवशी टेस्ट केल्या. अँटिजन टेस्ट निगेटिव्हच आली नंतर Rtpcr करण्यात आली, पण त्याचा रिपोर्ट दुसर्‍या दिवशी मिळणार. एचआरसिटी आणि कोविड प्रोफाइल केलं, त्याचे रिपोर्ट उशिरा मिळाले. त्यात त्यांचा स्कोर दहा आला आणि रक्तामध्ये इन्फेक्शनपण आढळून आले. पण कोरोनाचा रिपोर्ट यायचा होता तरीही आमच्या पवार डॉक्टरांनी जरग डॉक्टरांकडे नेण्याचा सल्ला दिला. त्यांना भेटल्यानंतर त्यांची ऑक्सिजन लेव्हल कमी झाली आणि ऍडमिट करण्याचा सल्ला देण्यात आला. आत्या ह्रदयरोगी असल्यामुळे डॉक्टरपण, तसेच हवेत म्हणून बरीच शोधाशोध केली. पण, बेड काही उपलब्ध झाला नाही शेवटी डॉक्टर भालेघरे यांच्या आशीर्वाद हॉस्पिटलला बेड मिळाला.

पूर्वीचे ऋणानुबंध असल्यामुळे आत्यांनी सांगितले, मला याच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करा. सर्वांच्या सल्ल्याने ॲडमिशन झाले आणि ट्रीटमेंटला सुरुवात झाली. ऑक्सिजन लावण्यात आले व त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि सगळं घर पॉझिटिव्ह झालं. तिथल्या सर्व डॉक्टरांनी आता त्यांची खूप काळजी घेतली. त्यांच्या तब्येतीमध्ये हळूहळू सुधारणा होत गेली. आमच्या फॅमिली डॉक्टरांच्या सल्ल्याने आम्ही घरी औषधोपचार घेऊ लागलो. आम्हाला आधार देणारे सर्व आमचे मित्र परिवार, रोकडे साहेब, संपत दाजी, नरळे साहेब, सुधीर जाधव, आबा, सर्व नातेवाईक यांची खूप मदत झाली. सर्वांचे आभार मानून त्यांच्या ऋणातून मी आणि माझं कुटुंब कधीच मुक्त होणार नाही. आत्या बऱ्या झाल्या, पण बिल विचारू नका बरे किती झाले ते. पवार डॉक्टरांचा दवाखाना तामजाईनगर सातारा आणि केळघर तालुका जावळी या ठिकाणी चालतो. खरोखरंच यांच्या रुपाने साक्षात देवच आमच्या कुटुंबाला वाचवायला धावून आला. काय असेल ते असो माझ्या जन्मापासून ते आत्तापर्यंत चंद्रबळ माझ्या पाठीशी आहे. आईचे नाव चंद्रभागा, पतीचे नाव शशी म्हणजे चंद्र, सासुचे नाव चंद्रकला आणि आमच्या डॉक्टरांचे म्हणजे देव माणसाचे नावही चंद्रहार अजब योगायोग! तेव्हा कोरोनाला घाबरू नका. आत्मविश्‍वास आणि संयमाने त्याच्याविरुद्ध लढा द्या. डॉक्टरांचा सल्ला वेळेवर आवश्यक घ्या आणि घरच्या घरी आजार अंगावर अजिबात काढू नका, हेच माझं सांगणं, असे मर्ढेतील अंजली शशिकांत गोडसे यांनी हा मोलाचा सल्ला दिला आहे.

The Godse Family From Mardhe Village Defeated Coronavirus Satara Marathi News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT