आंधळी धरणात आलेले जिहे- कठापूर योजनेचे पाणी ७१० अश्वशक्तीच्या दोन पंपांद्वारे उचलून माणच्या उत्तर भागातील ३२ गावांना देण्यात येणार आहे.
बिजवडी : माण तालुक्याच्या (Man Taluka) उत्तर भागातील ३२ आणि प्रस्तावित १६ गावांना पाणी देण्यासाठीच्या आंधळी उपसा सिंचन योजनेची (Aandhali Irrigation Scheme) कामे प्रगतिपथावर आहेत. पंपगृहाचे ५० टक्के, ३३ किलोमीटर लांबीच्या पाइपलाइनचे काम ८० टक्के, तर ५२ किलोमीटर लांबीच्या पाइपलाइनचे काम ३० टक्के झाले आहे. त्यामुळे लवकरात लवकर या योजनेची उर्वरित कामे मार्गी लावून जनतेला दिलेला शब्द पूर्ण करणार असल्याची ग्वाही आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी दिली.
माण तालुक्याच्या उत्तर भागातील ३२ गावांना जिहे- कठापूर योजनेचे (Jihe-Kathapur Scheme) पाणी देण्यासाठी मंजूर असलेल्या आंधळी उपसा सिंचन योजनेच्या सुरू असलेल्या कामांच्या पाहणीदरम्यान ते बोलत होते. या वेळी कृष्णा सिंचन विभागाचे अधिकारी डॉ. संदीप पोळ, हरिभाऊ जगदाळे, विलासराव देशमुख, लुनेश वीरकर आणि भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
माण तालुक्याच्या उत्तर भागातील अनेक गावे कोणत्याच पाणी योजनेच्या लाभक्षेत्रात येत नव्हती. त्यामुळे आमदार जयकुमार गोरे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे आंधळी धरणात येणारे जिहे- कठापूर उपसा सिंचन योजनेचे पाणी उचलून माणच्या उत्तर भागाला देण्यासाठीची वाढीव योजना प्रस्तावित केली होती. त्यावर तत्काळ सर्वेक्षण होऊन या योजनेला मान्यता देण्यात आली होती.
या योजनेसाठी ३७० कोटींचा निधीही मंजूर करण्यात आला होता. राज्यात सत्तांतर झाल्यावर ही योजना श्रेयवादात अडकली होती. या योजनेच्या कामांची निविदा प्रक्रिया रखडली होती; परंतु भाजप महायुतीचे सरकार पुन्हा येताच या योजनेच्या कामांना सुधारित प्रशासकीय मान्यता आणि वाढीव निधी देऊन गती देण्यात आली. गेल्या जूनमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या योजनेच्या कामांचा प्रारंभ झाला होता.
आंधळी धरणात आलेले जिहे- कठापूर योजनेचे पाणी ७१० अश्वशक्तीच्या दोन पंपांद्वारे उचलून माणच्या उत्तर भागातील ३२ गावांना देण्यात येणार आहे. त्यासाठीच्या पंपगृहाचे काम ५० टक्के झाले आहे. ३३ किलोमीटर लांबीच्या पाइपलाइनचे ८० टक्के, तर ५२ किलोमीटर लांबीच्या पाइपलाइनचे काम ३० टक्के झाले आहे. आंधळी उपसा सिंचन योजनेद्वारे ११०५५ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.
आमदार गोरे यांनी या योजनेच्या सुरू असलेल्या कामांची पाहणी करून कृष्णा सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. याविषयी आमदार गोरे म्हणाले, ‘‘माणच्या उत्तर भागातील लाभक्षेत्रापासून वंचित गावांना जिहे- कठापूर योजनेचे पाणी देण्याचा मी शब्द दिला होता. त्या दिलेल्या शब्दाप्रमाणे जिहे- कठापूरचे पाणी आंधळी धरणात आणले आहे. आता हे पाणी उत्तर भागातील ३२ गावांना देऊन वचनपूर्ती करणार आहे. आणखी प्रस्तावित १६ गावांचे सर्वेक्षण सुरू आहे. त्यासाठी पाणीही आरक्षित झाले आहे. लवकरच या गावांनाही मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.’’
माणच्या उत्तर भागातील गावांचा कोणत्याच पाणी योजनेच्या लाभक्षेत्रात समावेश होणार नाही, असे अनेक नेते म्हणायचे, मात्र आमदार गोरे यांनी चिकाटीने जिहे- कठापूरचे पाणी या भागाला देण्याची योजना मार्गी लावली आहे. त्यासाठी वाढीव पाण्याची तरतूदही त्यांनी करून घेतली आहे. त्यामुळेच आंधळी उपसा सिंचन योजनेच्या सध्या सुरू असलेल्या कामांची कुतूहलाने पाहणी करायला रोज गर्दी होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.