satara  sakal
सातारा

Satara : जलप्रदूषण रोखण्यात उंडाळेचे एक पाऊल पुढे

नदीत रक्षा विसर्जित न करता वृक्षारोपणासाठी वापरून प्रियजनांची जपली जातेय स्मृती

हेमंत पवार

कऱ्हाड : मानवी स्वभावाला असंख्य कंगोरे असतात. घरातील प्रिय व्यक्ती, आप्तेष्ट अथवा जीवलगाच्या मृत्यूने मनाला चटका लागतो. त्यांच्या मृत्यूने मानवी भावनांचा कल्लोळ उठतो. त्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारानंतर शरीराची राख नदीपात्रात विसर्जित करण्याची पूर्वीपासून प्रथा आहे. मात्र, त्याला बगल देत रक्षेचा वापर करून शेतात त्यांची स्मृती झाडाच्या रूपाने जिवंत राहावी, यासाठी आख्ख्या गावातील लोकांची रक्षा वृक्षारोपणासाठी वापरली जाते. त्यातून आतापर्यंत ४०० हून अधिक फळझाडांचे रोपण करून जलप्रदूषण कमी करून पर्यावरणपूरक इको फ्रेंडली रक्षा विसर्जन करण्यात यश आले आहे.

निसर्गाच्या संवर्धनासाठीही योगदान देऊन पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी हातभार लावणारे, स्वातंत्र्यसैनिकांची भूमी म्हणून ओळख असणाऱ्या या गावाचे नाव आहे उंडाळे. रक्षेतून फळझाडांचे रोपण करण्यात आले असून, ही झाडे आयुष्यभर आपल्या प्रियजनांना मधूर फळे व त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देतील, असा संदेश त्यातून देण्यात आला आहे. नदीपात्रात गावोगावचे मिसळणारे सांडपाणी, काही उद्योगांचे सांडपाणी, नदीत टाकण्यात येणारी घाण यासह अन्य वेगवेगळ्या कारणांनी जलप्रदूषण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.

त्यातच जलप्रदूषणामुळे नदीतील जलचरांचेही अस्तित्व धोक्यात आले आहे. असे असतानाच अंत्यसंस्कारानंतर अस्थी व रक्षा नदी अथवा ओढ्याच्या प्रवाही पात्रात विसर्जित करण्याची हिंदू धर्मियांत परंपरा आहे. आता मात्र, नदीपात्राचे होणारे प्रदूषण, त्याचा मानवी जीवन, तसेच जलचरांवर होणारा परिणाम याबाबत जागरूकता निर्माण होत आहे. त्यातून सजगता आल्याने, ही धर्म व भावनांशी निगडित प्रक्रिया टाळली जात आहे.

नेमका तोच पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्याचा निर्धार कऱ्हाड तालुक्यातील उंडाळे गावातील नवयुवक गणेश मंडळाचे अध्यक्ष अजित पाटील, उपाध्यक्ष दाजी पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते प्रा. ए. बी. पाटील, मार्गदर्शक उदय पाटील, धनाजी पाटील, रणजित पाटील, प्रवीण डांगे, सचिन पाटील, दीपक पाटील, संदीप पाटील, अशोक डांगे, सदा पाटील, राजेंद्र पाटील, भीमराव पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी केला. त्यानुसार आख्ख्या उंडाळे गावातील कोणाचेही निधन झाल्यावर त्यांच्या रक्षा विसर्जनाचा विधिवत कार्यक्रम झाल्यानंतर रक्षा ही नदीतील पाण्यात विसर्जित केली जात नाही, तर त्याचा वापर करून शेतात संबंधित आप्तेष्टाची स्मृती झाडाच्या रूपाने जिवंत राहावी, यासाठी केला जातो. याची सुरुवात २०१४ मध्ये मंडळाकडून करण्यात आली. पहिल्या टप्प्यात या नवीन पद्धतीला विरोध होईल, अशी शक्यता होती.

मात्र, लोकांनी झाडे लावावी आणि जलप्रदूषण कमी व्हावे, या इराद्याने तरुणांनी हा उपक्रम तडीस नेण्याचा निर्धार पक्का केली. ज्यांची घरी कोणाचे निधन झाले त्यांच्या रक्षाविसर्जनादिवशी त्यांच्यामार्फत संबंधितांना चिक्कू, नारळ, पेरू, आंबा यासह अन्य फळझाडांची दर्जेदार रोपे देऊन त्याचे रोपण करण्यात येऊ लागले. पहिल्या टप्प्यात स्मशानभूमीच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर मृत्यू झालेल्या संबंधितांच्या शेतात वृक्षारोपण करण्यात येऊ लागले आहे. मात्र, ज्यांच्याकडे स्वतःची जमीन नाही त्यांच्या अंगणात झाड लावण्याचीही प्रथा उंडाळेत रूढ करण्यात आली आहे. त्यातून गेल्या आठ वर्षांत आतापर्यंत ४०० हून अधिक झाडांचे रोपण करून जलप्रदूषण कमी करण्यात मोठा हातभार लागला आहे. त्याचबरोबर मृत व्यक्तीच्या स्मृतिप्रीत्यर्थ फळझाडांचे रोपण करण्यात आले आहे.

नदी प्रदूषणाची बिकट समस्या

आपल्या देशातील नद्या जीवनरेखा म्हणून ओळखल्या जातात. त्याचबरोबर देशाची संस्कृती, सभ्यतेचा दर्पण म्हणूनही नद्यांकडे पाहिले जाते. भारतीय संस्कृती, समाज, राज्यकर्ते आणि संतांनी नद्यांना आईची उपमा दिली आहे; परंतु वाढते औद्योगिकीकरण, शहरीकरण, लोकसंख्या, शहरासह ग्रामीण भागातील गटाराचे पाणी थेट नद्यांना मिसळत मोठ्या नद्यांमध्ये प्रदूषण वाढले आहे. त्या जैविकदृष्ट्या कोरड्या पडल्या असून, त्याचा परिणाम पर्यावरणासह नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. देशातील सर्वाधिक ५६ प्रदूषित नदी-पट्टे महाराष्ट्रात आहेत. २०१७ मध्ये हा आकडा ४७, तर २०१० मध्ये २८ होता. याच नदीतील पाणी पिण्यामुळे विविध रोग होत आहेत. एकीकडे पाणी नाही आणि आहे तेही प्रदूषित आहे. जनजागृती आणि कडक कायदे करूनच पावसाचे पाणी आणि साठवलेल्या पाण्याचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे.

मरावे परी वृक्षरूपी उरावे...

‘मरावे परी कीर्तिरूपे उरावे’ या उक्तीतून समर्थ रामदासस्वामींनी माणसाच्या कर्तृत्वाचा सार सांगितला आहे. प्रत्येक माणूस, प्रत्येक प्राणी कधी ना कधी मरण पावतोच. कोणीही अमर नाही. आतापर्यंत कोट्यवधी माणसे या पृथ्वीवर जन्मली आणि मरणही पावली. त्यातल्या कोणाचे साधे नावही आठवत नाही. मात्र, संत ज्ञानेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी अशा फार थोड्यांचीच आपल्याला आठवण येते. त्यांचा देह आता पृथ्वीवर नाही; पण त्यांचे कार्य मात्र टिकून आहे. आपल्या कार्याने ही थोर माणसे अमर झाली आहेत. आपला देह नष्ट झाला, तरी आपले अस्तित्व झाडांच्या रूपाने टिकून राहून आपली चिरंतन आठवण राहावी, यासाठी हा उपक्रम उंडाळे गावात राबवण्यात येतो.

ही झाडे पुढील आयुष्यभर आपल्या प्रियजनांना मधूर फळे त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देतील. आपणही असा उपक्रम राबवल्यास पर्यावरणाला हातभार लागून जलप्रदूषण कमी होण्यास मदत होईल. सध्या पितृपंधरवढ्याच्या निमित्ताने आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ एक झाड लावण्याची संधी सर्वांना उपलब्ध झाली आहे. जिल्ह्यामध्ये वृक्षसंवर्धनाची एक चळवळ उभी करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. आपल्या अशा उपक्रमाची माहिती आम्हाला ९८८१७१८८२ या व्हॉटस्‌अॅप क्रमांकावर पाठवावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT