मोरगिरी (जि. सातारा) : पाटण तालुक्यात जुन्या ग्रॅव्हिटी नळ पाणीपुरवठा योजना नादुरुस्त आहेत. अतिवृष्टीमध्ये त्या मोडकळीस आल्या आहेत. त्याची दुरुस्ती काही ग्रामपंचायतींनी निधीच्या माध्यमातून करण्यास सुरवात केली आहे. तर काही गावांनी नदीवरून स्वतंत्र योजना करून राष्ट्रीय पेयजल योजनेच्या माध्यमातून गावाला पाणीपुरवठा केला आहे. तरीसुद्धा विजेची थकबाकी आणि दुरुस्तीच्या नावाखाली पाणीपुरवठा वारंवार बंद पडत आहे. परिसरातील ग्रामपंचायत दुरस्तीच्या नावाखाली दरवर्षी खर्चात फरक करत असूनसुध्दा ठोस उपाययोजनांचा अभाव असल्याने पाणी मुबलक असूनही लोकांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या कायम आहे.
ग्रॅव्हिटी नळ पाणीपुरवठामधून डोंगरावर पाण्याचे स्त्रोत शोधून तेथून सायफन पद्धतीने गावातील लोकांना पाणीपुरवठा केला जातो. उतारावरून गावात पाणी येत असल्याने यासाठी विजेच्या बिलाचा कोणताच प्रश्न ग्रामस्थांना भेडसावत नाही. त्यामुळे या माध्यमातून गावाला पाणीपुरवठा होणाऱ्या गावांची संख्या जास्त आहे. सध्या या योजना मोडकळीस आल्या असून त्यांची दुरुस्ती करण्याचे काम शासनामार्फत सुरू आहे. काही ठिकाणी ग्रामपंचायत निधीतून त्यांची किरकोळ दुरुस्ती करण्यात येत आहे. राष्ट्रीय पेयजल योजनेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या नळ पाणीपुरवठा योजना वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा आणि नादुरुस्त पंपामुळे बंद पडत आहेत.
जुनी जलवाहिनी जागोजागी फुटून गळती होण्याच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे लोकांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. दरवेळी उन्हाळ्यात पाणीटंचाई निवारण कृती आराखडा तयार केला जातो. यामध्ये एक तर काही गावे वाढवली तरी जातात किंवा कमी तरी केली जातात, या व्यतिरिक्त फार काही साध्य होताना दिसत नाही. नद्यांना मुबलक प्रमाणात पाणी असले तरी शुद्ध पाणीपुरवठा किती गावांना होतो, हा प्रश्न आजही अनुत्तरित असाच आहे.
संपादन : बाळकृष्ण मधाळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.