नीरा उजवा कालवा हा ब्रिटिशकालीन आहे. या कालव्याच्या भरावातील दगडांची माती झाल्याने भराव ठिकठिकाणी कमकुवत झाले आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी नेहमी गळती होण्याचे प्रकार घडत आहेत.
फलटण शहर : नीरा उजवा कालव्याचे (Nira Canal) आवर्तन सुरू असताना फलटण शहरानजीक कोळकी (Kolki Village) येथे कालव्याला मोठे भगदाड पडल्याने कालवा बंद करून दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. तीव्र उन्हाळा असताना आणि अद्याप भिजवण बाकी असताना अचानक कालवा बंद झाल्याने शेतकरी वर्गात तीव्र नाराजी पसरली आहे.
या पार्श्वभूमीवर नीरा उजवा कालवा कार्यकारी अभियंता शिवाजी जाधव यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे. नीरा उजवा कालव्याला किलोमीटर क्रमांक ४९/९०० मध्ये सेवा रस्त्याच्या बाजूस फलटण शहरानजीक, इरिगेशन बंगल्याजवळ ता. पाच मे रोजी सकाळी आठ ते नऊ वाजण्याच्या दरम्यान मोठा घळ पडून मातीमिश्रित पाणी वाहू लागले. त्यानंतर या ठिकाणी एक मीटर व्यासाचा व ज्याची खोली मोजता आली नाही, असा मोठा खड्डा पडून पाइपिंग सुरू झाल्याचे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
कालव्याचा विसर्ग कमी करून घळ काढण्याचा प्रयत्न करण्यात आला; परंतु गळती पूर्णतः बंद झाली नाही. कालव्याचा विसर्ग पूर्ववत केल्यास गळती वाढण्याची शक्यता लक्षात घेता व त्याखाली असलेली दोन हजार लोकवस्ती बाधित होऊन मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होऊ शकते, यास्तव कालवा विसर्ग बंद करून गळती पूर्णतः रोखण्याची कार्यवाही नीरा उजवा कालवा विभाग, फलटणमार्फत करण्यात येत असल्याचे या पत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, कालवा दुरुस्तीचे काम सुरू असून, ते ता. २२ ते २३ मेपर्यंत पूर्ण होईल, अशी अपेक्षा कार्यकारी अभियंता शिवाजी जाधव यांनी व्यक्त केली आहे.
नीरा उजवा कालवा हा ब्रिटिशकालीन आहे. या कालव्याच्या भरावातील दगडांची माती झाल्याने भराव ठिकठिकाणी कमकुवत झाले आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी नेहमी गळती होण्याचे प्रकार घडत आहेत. गत महिन्यात १९ एप्रिलला पहाटे कोळकी हद्दीत नेवसे वस्ती येथे या कालव्याला गळती लागली होती; परंतु तेथील नागरिकांचे प्रसंगावधान व पाटबंधारे विभागाची कार्यतत्परता यामुळे मोठा अनर्थ टळला होता. या गळतीमुळे पुन्हा एकदा कालव्याच्या भरावांच्या मजबुतीकरणाचा प्रश्न, शेती व नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.