सातारा - सातारा तालुक्यातील जकातवाडी ग्रामपंचायतीने सन २०१८ मध्ये विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने विधवा पुनर्विवाह करणाऱ्या जोडप्यास प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. या उपक्रमाचा एक भाग म्हणून राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधत आज (दि. २६) जकातवाडी येथे विधवा पुनर्विवाह संपन्न झाला. या विवाहामुळे विधवा महिलेला समाजात सन्मान मिळाल्याचे दिसून आले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने वधू-वरांना आहेर म्हणून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे तिमिरातून तेजाकडे हे पुस्तक भेट देऊन सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.
विधवा पुनर्विवाहाचा ग्रामसभेमध्ये निर्णय घेणारी जकातवाडी ही देशातील पहिली स्थानिक स्वराज्य संस्था आहे. या निर्णयाचे राज्यभरात स्वागत केल्यानंतर विधवा पुनर्विवाहाबाबत जनमत तयार होण्यास व विधवा प्रथाबंदी होण्यास मदत झाली आहे. विधवा पुनर्विवाहाचा क्रांतिकारी निर्णय घेणाऱ्या जकातवाडीमध्ये संबंधित जोडप्यांना विधवा पुनर्विवाह करण्याची इच्छा होती. त्यास अनुसरून जकातवाडी ग्रामपंचायतीने या निर्णयाचे स्वागत करून विवाह गावामध्ये करण्यास संमती दिली. त्यानुसार आज जकातवाडी येथील लक्ष्मी मंदिरात विधवा असलेल्या शैला मोरे यांनी रमेश शिंदे यांच्या गळ्यात वरमाला घालून विवाहबद्द झाल्या.
‘‘समाजात विधवा महिलांना सन्मान मिळण्याची गरज आहे. जकातवाडी या ठिकाणी झालेला कार्यक्रम राज्यभरात आदर्शवत आहे. तसेच जकातवाडी पॅटर्न हा राज्यभर राबविण्यासाठी व विधवा विवाहास शासनाने अनुदान देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते राजेश भोसले यांनी केली.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण अधिकारी रोहिणी ढवळे, समाजकल्याण अधिकारी डॉ. सपना घोळवे, गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सुकुमार मंडपे, प्रमोदिनी मंडपे, प्रशांत पोतदार, उदय चव्हाण, यशवंतराव चव्हाण समाजकार्य महाविद्यालयाचे कार्याध्यक्ष भाई माने, प्रा. जीवन बोराटे, सामाजिक कार्यकर्ते राजेश भोसले, प्रा. समता माने, नीलिमा कदम, किरण कदम, किशोर काळोखे, जकातवाडीचे सरपंच उत्तम सणस, उपसरपंच हनुमंत भोसले, माजी सरपंच चंद्रकांत सणस, दीपक देशमुख, जनार्दन भोसले आदी उपस्थित होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.