घरात जागोजागी रक्ताचे डाग दिसल्यामुळे लोकांना संशय आला.
आटपाडी : विवाहबाह्य संबंधात अडसर ठरत असल्याने पत्नीनेच पतीचा खून करून, आत्महत्या भासविल्याचा प्रकार खरसुंडीत उघडकीस आला. सतीश उत्तम धुमाळ (वय ३१, रा. खरसुंडी) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी पत्नी, मेहुणा, साडू आणि मेहुणीसह चौघांना पोलिसांनी (Atpadi Police) ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सतीश उत्तम धुमाळ (Satish Dhumal) याचे मूळगाव म्हसवड (ता. माण) आहे. तिथे त्याच्या पत्नीचे विवाहबाह्य अनैतिक संबंध होते. त्या त्रासाला कंटाळून पत्नीसह तो तिला घेऊन सासरवाडी खरसुंडीत राहायला आला. त्याचा मेव्हणा, साडू आणि मेहुणी हे सारे एकत्रच खरसुंडीत मध्यभागी मुख्य पेठेत वास्तव्य करत होते. आज सकाळी शेजारील लोकांना सतीशचा मृतदेह साडीने गळफास घेतलेल्या अवस्थेत घराच्या पोर्चमध्येच आढळून आला. प्रथमदर्शी सतीशने आत्महत्या केल्याचे लोकांना वाटले. या घटनेमुळे लोकांनी गर्दी केली. त्यावेळी लोकांना घराच्या बाहेरील पायरीवर काही रक्ताचे डाग आढळून आले. घरात भिंतीवर आणि फरशीवर रक्ताचे डाग दिसले. घरात जागोजागी रक्ताचे डाग दिसल्यामुळे लोकांना संशय आला. पत्नी आणि त्याच्या कुटुंबातील लोकांनी सतीशचा मृतदेह गळफास सोडवून खाली घेतल्यावर त्याच्या डाव्या कानावर कशाने तरी वर्मी घाव घातल्याने रक्तबंबाळ झाल्याचे दिसून आले. त्यामुळे ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय वाढला. ही बातमी गावातील आउट पोस्टमधील पोलिसांपर्यंत पोचली.
घटनास्थळी तत्काळ पोलिस दाखल झाले. त्यांनी अंगण, पोर्च आणि घरात पाहणी केली. त्यानंतर आटपाडी पोलिस ठाण्याचे (Atpadi Police Station) उपनिरीक्षक भानुदास निंबोरे तसेच पोलिस उपअधीक्षकांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर सतीशची हत्या झाल्याचे उघड झाले. पोलिसांनी तत्काळ सतीशची पत्नी चंदा सतीश धुमाळ, मेव्हणा चेतन बलभीम वाडेकर, साडू अतुल पवार आणि मेहुणी सोनिका अतुल पवार (सर्व रा. खरसुंडी) यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. खरसुंडीतून त्यांना आटपाडीला आणले. त्यानंतर दुपारी मृत सतीशचा भाचा अनुराज पवार (वय २१, रा. म्हसवड) याने आटपाडी पोलिस ठाण्यात चौघांविरोधात खुनाची तक्रार दाखल केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी चौघांनाही अटक केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.