Pune AI Talent Growth : अलीकडच्या काळात जनरेटिव्ह एआय, चॅट जीपीटीसारख्या नव्या तंत्रज्ञानाने संपूर्ण जगाला आकर्षित केले आहे. व्यावसायिक कौशल्यांचा ते आवश्यक घटक बनत आहे. शिक्षण, उत्पादन आणि आयटी हब म्हणून ओळखले जाणारे पुणे या नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आघाडीवर असून, एका वर्षात पुण्यातील एआय टॅलेंटमध्ये (कृत्रिम बुद्धिमत्ता प्रतिभा) ११० टक्के वाढ झाली आहे.
राज्यात पुणे सर्वांत आघाडीवर आहे, मुंबईच्या तुलनेत पुण्यात एआय व्यावसायिकांची संख्या साधारण समान आहे. नागपूरच्या तुलनेत अंदाजे १८ पट अधिक एआय व्यावसायिक आहेत, तर नाशिकपेक्षा २४.५ पट अधिक आहेत, अशी माहिती लिंक्डइनच्या टॅलेंट अँड लर्निंग सोल्युशन्सच्या वरिष्ठ संचालक रुची आनंद यांनी ‘सकाळ’ला दिली.
ही तुलनात्मक आकडेवारी नोव्हेंबर २०२२ ते नोव्हेंबर २०२३ या एका वर्षाच्या कालावधीतील आहे. या काळात मुंबईत एआय टॅलेंटमध्ये ९५ टक्के वाढ झाली आहे. त्या तुलनेत पुण्यात अत्यंत वेगवान वाढ झाली आहे. या क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या देशातील पहिल्या पाच शहरांमध्येही पुण्याचा समावेश होतो. हैदराबाद, बंगळूर, पुणे, मुंबई आणि चेन्नई ही सर्वाधिक वेगवान वाढ नोंदविणारी शहरे आहेत, असेही लिंक्डइनच्या अभ्यासात आढळून आले आहे.
लिंक्डइनवर एआय, चॅट जीपीटी अशा प्रकारच्या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या नोकऱ्यांची मागणीसुद्धा २.५ पटीने वाढली असून, देशभरात या नोकऱ्यांसाठीच्या अर्जांमध्ये २.१ पटीने वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे हे आघाडीचे एआय टॅलेंट हब म्हणून उदयास येत आहे. येथील सुमारे ६३ टक्के व्यावसायिकांनी एआय कौशल्ये आत्मसात केली असल्याचे आढळले आहे, असेही रुची आनंद यांनी सांगितले.
सर्वच क्षेत्रात ‘एआय’ची मागणी वाढत असून, लोक ‘जनरेटिव्ह एआय’ शिकण्यासाठी अधिक वेळ देत आहेत, २०२१ च्या तुलनेत याचे प्रमाण सुमारे पाचपट अधिक आहे. केवळ तंत्रज्ञान किंवा संशोधन व्यावसायिकांसाठीच नव्हे, तर तंत्रज्ञानाची पार्श्वभूमी नसलेल्या इतर व्यवसाय क्षेत्रातील लोकांनादेखील ही कौशल्ये शिकण्यात रस आहे.लिंक्डइन प्लॅटफॉर्मवर तंत्रज्ञानाबरोबरच इतर क्षेत्रांमधील व्यावसायिक व कंपन्यादेखील कौशल्य शिकण्यास उत्सुक आहेत. सुमारे ३७ टक्के लोक आयटी क्षेत्राव्यतिरिक्तच्या क्षेत्रातील आहेत. सॉफ्ट स्किल्सची मागणीही मोठ्या प्रमाणात होत आहे, असे त्यांनी सांगितले.
लिंक्डइनवरील आकडेवारीनुसार, पुण्यामध्ये आयटी आणि आयटी सर्व्हिसेस व्यतिरिक्त, वाहन, उत्पादन आणि बँकिंग क्षेत्रातही मोठी वाढ झालेली दिसून येते. महाराष्ट्रात नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर येथील अनेक लोक संधीच्या शोधात पुण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. उद्योगाची गरज आणि कौशल्ये यात असलेली दरी भरून काढणारे व्यासपीठ म्हणून लिंक्डइन महत्त्वाची भूमिका बजावते. कंपन्या ब्रँड निर्माण करण्यास याचा वापर करत आहेत.
‘लिंक्डइन’च्या आकडेवारीनुसार, नोकऱ्यांसाठी आवश्यक कौशल्ये २०३० पर्यंत ६५ टक्क्यांनी बदलतील. पुण्यामध्ये नवी कौशल्ये शिकण्याचा कल वाढत असून, १० पैकी ६ व्यावसायिक नवी कौशल्ये शिकण्यासाठी उत्सुक आहेत. येथील ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे, जिथे नेतृत्व, व्यवस्थापन, तंत्रज्ञान या विषयावर तब्बल २०,००० अभ्यासक्रम आहेत आणि लोक त्यांचा वापर नवी कौशल्ये विकसित करण्यासाठी करतात.
कंपन्यासुद्धा या प्लॅटफॉर्मचा वापर त्यांच्या कर्मचाऱ्यांना नवी कौशल्ये शिकवण्यासाठी करतात. नोकरीतील फायद्यांव्यतिरिक्त आता लोक त्यांच्या नोकरीमध्ये प्रगती करण्याच्या, नवी कौशल्ये शिकण्याच्या संधींकडे जास्त लक्ष देत आहेत. कंपन्या यासाठी त्यांना प्रोत्साहन आणि संधी देतात की नाही, याचादेखील लोक विचार करीत आहेत.
गेल्या सात वर्षांत भारतात कृत्रिम बुद्धिमत्ता कौशल्य असलेल्या व्यावसायिकांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली असून, जगातील पहिल्या पाच देशांमध्ये भारताने स्थान मिळविले आहे. लिंक्डइनच्या अहवालानुसार, देशात गेल्या सात वर्षांत कृत्रिम बुद्धिमत्ता कौशल्य असलेल्या व्यावसायिकांची संख्या १४ पट वाढली आहे. भारतासह सिंगापूर, फिनलंड, आयर्लंड, कॅनडा हे देश वेगाने कृत्रिम बुद्धिमत्ता कौशल्य आत्मसात करत आहेत. देशातील ९१ टक्के तज्ज्ञ व्यावसायिक कृत्रिम बुद्धिमत्ता कौशल्य आत्मसात करण्यावर भर देत आहेत. जागतिक स्तरावर हा दर ७२ टक्के आहे.
- प्राची गावस्कर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.