डॉ. प्रज्ञावंत देवळेकर
त्याचा जन्म निकोलस आणि क्रिस्टियाना या दाम्पत्याच्या पोटी स्वीडनच्या (Sweden) स्मालॅंड इथल्या निसर्गरम्य प्रांतातल्या ‘राशल्ट’ या छोट्याशा झाला..पाच भावंडात तो सगळ्यात थोरला..
त्याचा बाबा ‘निकोलस’ हा पेशानं त्या धर्मोपदेशक असला तरी पेशीनं हौशी वनस्पतीतज्ज्ञ (Botanist) होता त्यामुळंच यालाही आपसुकच पानाफुलांचं वेड लागलं.. ‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’ असं म्हणतात.. या पठ्ठ्याला पानं-फुलं-वनस्पती यांच्याबद्दल इतका जिव्हाळा आणि प्रेम होतं की तो तासनतास पानं-फुलांचं निरिक्षण करत बसे यामुळं आजुबाजूच्या वडिलधाऱ्या मंडळींनी त्याचं नामकरण ‘बाल वनस्पतिशास्त्रज्ञ’ असं करून टाकलं होतं.
त्याचं प्राथमिक शिक्षण स्थानिक व्याकरण शाळेत पार पडलं..इथं ’योहान रॉथमान’ नामक एक शिक्षक भौतिकशास्त्र शिकवायचे.. रॉथमान फक्त शिक्षक नव्हते तर एक प्रयोगशील व्यक्ती होते,त्यांनी आपल्या या विद्यार्थ्यातली चुणूक हेरली आणि हा विषय आपला आणि महत्वाचा नसतांनाही त्याला या पानफुलांच्या निरिक्षणास गांभीर्यानं घ्यायचं सुचवलं.. रॉथमान फक्त सुचवून थांबले नाही त्यांनी सक्रिय मदतही केली आणि त्याच्या पालकांना भेटत उद्या या लेकराला रोजीरोटीसाठी धार्मिक शिक्षण देण्याचं तुमच्या डोक्यात असेल तर ते काढून टाका ‘विज्ञान’ हाच त्याचा प्रांत आहे आणि राहिल.. शालेय शिक्षण संपल्यानंतर तो विद्यापीठात दाखल झाला आणि इथं त्याला भेटले प्रा.किलिअन स्टोबियस. यांनीही त्याला जीव तर लावलाच पण प्रोत्साहितही केलं. वर्षभर इथं राहून तो १७२८ साली अप्साला इथल्या विशाल आणि प्राचिन विद्यापीठात दाखल झाला.. इथं त्याला निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले दोन दिग्गज गुरू भेटले ॲलाॅफ रुडबॅक आणि लार्स राॅबर्ग.. इथं मात्र तो तब्बल सात वर्षे रमला आणि मेडिसिनची पदवीही मिळवली..इथं त्याची भेट तत्कालिन प्रसिद्ध वनस्पतिशास्त्रज्ञ वूलाफ सेल्सिअस यांच्याशी झाली आणि या भेटीचा त्याच्या जीवनावर बराच प्रभाव पडला.
१७३० साली तो वनस्पतिशास्त्राचा शिक्षक झाला आणि याच दरम्यान त्यानं लॅपलॅंड आणि डालानी इथं दोन अभ्यास दौरेही केले.. १७३५साली तो हार्लेम या डच शहराजवळची जॉर्ज क्लिफर्ड यांची बाग बघायला गेला.. तिथं त्यानं असंख्य कॅक्ट्स-ऑर्किड-पॅशन फ्लॉवर-केळी आणि इतरही अनेक झाडं फुललेली बघितली.. यातली अनेक झाडं त्यानं आयुष्यात पहिल्यांदाच पाहिली असली तरी त्यानं त्यांचं शास्रोक्त वर्गीकरण सुचवलं आणि हे बघून क्लिफर्डनं त्याला ‘इथंच रहावं’ म्हणून सुचवलं.. १७३८च्या उन्हाळ्यापर्यंत तो ही तिथं मनसोक्त रमला-राहिला आणि या त्या कालावधीत त्यानं बागेतल्या सर्व झाडांचं वर्गीकरण केलं.. सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात डाॅक्टरेट करणाऱ्यांना आपला शोधनिबंध तत्कालिन हाॅलंडमध्ये जाऊन लिहावा लागत असे त्यामुळं पुढची तीन वर्षे त्यानं तिथं म्हणजे आताच्या नेदरलॅंडमध्ये काढली. या दरम्यान त्याच्या अभ्यास दौऱ्यातील संशोधनाचा तपशील ‘सिस्टिमा नेच्युरा’ आणि ‘जिनेरा प्लॅंटारम’ या मानाच्या ग्रंथात प्रकाशित झाला आणि इथंच त्याच्याभोवती एक वलय तयार झालं.
या ग्रंथात त्यानं वनस्पतींच्या फुलांतील प्रजोत्पादक अवयव अर्थात केसरदलं अन् किंजदलं यांना केंद्रस्थानी ठेवून वनस्पती वर्गीकरणाची ‘लैंगिक पद्धत’ मांडली होती. ही पद्धती नवखी होती आणि गरजेच्या दृष्टीनं अत्यंत सोयीची असली तरी प्रचडं वादग्रस्त ठरली.. नैतिकतेच्या मुद्द्यावरून त्याच्या या कामाला समकालीन अभ्यासकांनी प्रचंड विरोध दाखवला. त्यानं या ग्रंथात जी भाषा वापरली होती त्याबद्दल धार्मिक मंडळींचा बराच आक्षेप होता. फुलाच्या अंतर्भागाचं वर्णन त्यानं ‘रतिशय्या’ असं केलं होतं. वनस्पतीतही ‘सुहागरात’ साजरी होते असं म्हटल्यानं गहजब झाला होता. फुलांमध्ये जी मीलन क्रिया होते त्याचं साग्रसंगीत वर्णन केलं होतं. अफूच्या फुलाविषयी लिहितांना आणि झेंडूच्या फुलाची गुंतागुंतीची रचना विषद करतांना ते सोपं करून सांगावं म्हणून त्यानं वापरलेली भाषा धर्ममार्तंड मंडळींना शृंगारिक वाटली. भाषा शृंगारिक वाटली म्हणजे ती होतीच आणि ती का नसावी? श्रृंगार हा पुनरुत्पादनाचा निसर्गनियम आहे पण "अश्लिल हैं ये लौंडा" म्हणत तथाकथित संस्कृतीरक्षक भयंकर कावले पण त्याची भाषा आणि त्यानं केलेलं वर्णन हे अत्यंत तर्कशुद्ध होतं.
१७३८ साली मायदेशी परतून त्यानं वैद्यक व्यवसाय सुरू केला आणि १७३९ साली ‘सारा मोरीया’ सोबत विवाहबद्ध झाला.. कौटुंबिक जबाबदारी वाढल्यानं १७४१ साली तो जिथं शिकला त्याच अप्साला विद्यापीठात वैद्यकशास्राचा प्राध्यापक आणि १७४२ साली वनस्पतिविज्ञानाचा प्राध्यापक म्हणून रुजू झाला. १७४५-५३ या काळात त्यानं अध्यापनासोबतच वनस्पती आणि प्राणी या संबंधी संशोधन केलंआणि ते सात ग्रंथात प्रसिद्धही केलं. यात त्यानं वनस्पतींच्या प्रजातींची आणि जातींची नावं ग्रंथित केली जी आजही जगभरात प्रमाणभूत मानली जातात. १७६१ साली त्याला सरदारकी बहाल झाली पण तो संशोधन आणि अभ्यास यापासून यत्किश्चिंतही विचलित झाला नाही. प्राणी आणि वनस्पती या सजीवांची जातीनिहाय वर्गीकरणाची पद्धत त्यानं शोधून काढली आणि या सगळ्या अभ्यासाला नेटकं स्वरूप देण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले..फक्त इतकंच नाही तर त्यानं खनिजांचंही वर्गिकरण केलं आणि रोगांच्या प्रकारांवर विपुल असं लेखन केलं. १७७८ साली अप्साला इथंच पक्षाघाताच्या आजारानं त्याचं देहावसान झालं. त्याच्या सगळ्या निरिक्षण-संशोधनाचं बाड आर.पल्टनेरी यांनी प्रकाशित केलं. पुढं हा संपूर्ण ग्रंथसंग्रह आणि वनस्पतिसंग्रह सर जे.ई. स्मिथ यांनी विकत घेतला.
हा सगळा ज्ञानसंग्रह म्हणजे “जनरल व्ह्यू ऑफ दि राइटिंग्ज ऑफ लिनियस”’आणि हा लिनियस म्हणजे स्वीडनमध्ये ‘महनीय नागरिक’ असा दर्जा मिळालेला-जगभरातील विद्वानांनी गौरवलेला ‘स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सेसचा’ सहसंस्थापक अध्यक्ष “द कार्ल लिनिअस” निसर्ग किती अफाट आणि अचाट आहे बघा..लिनिअसच्या अंदाजे जगभरात सहा हजार वनस्पती आणि चार हजार चारशे प्राणी होते पण त्याचा हा अंदाजही नगण्य ठरला कारण त्याच्या पावलावर पाऊल टाकून शास्त्रज्ञांनी केलेला सजीव सृष्टीचा अंदाज १.३ ते तीन कोटींच्या दरम्यान आहे आणि या पैकी सुमारे वीस लाख प्रजातींचं नामकरण लिनिअसच्याच ‘द्विनाम’ पद्धतीनं झालंय यातंच त्याचं कार्यकर्तृत्व आलं..
आज कार्ल लिनियस यांचा स्मृतीदिन..विनम्र अभिवादन!!!
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.