या ऐतिहासिक मोहिमेच्या यशासाठी इस्रोचं जगभरातून कौतुक होत आहे. या दरम्यान इस्रोने एक्स पोस्ट करत, या मोहिमेत मोलाचं योगदान देणाऱ्या सर्वांचं आभार मानलं आहे.
'चांद्रयान-3'च्या यशाचं संपूर्ण देशभरात सेलिब्रेशन सुरू आहे. मध्य प्रदेशात काही नागरिकांनी एकत्र येऊन, फटाके वाजवत जल्लोष केला.
युरोपीय स्पेस एजन्सीने देखील इस्रोचं अभिनंदन केलं आहे. 'चांद्रयान-3'च्या ट्रॅकिंगसाठी नासासोबतच युरोपच्या अंतराळ संस्थेनेही आपली मदत केली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनीदेखील 'चांद्रयान-3'च्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला. त्यांनी या मोहिमेतील सर्व शास्त्रज्ञांचं अभिनंदन आणि कौतुक केलं.
अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासानेही इस्रोचं अभिनंदन केलं आहे. नासाचे अॅडमिनिस्ट्रेटर बिल नेल्सन यांनी एक्स पोस्ट केली आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करणारा चौथा देश झाल्याबद्दल त्यांनी भारताचं अभिनंदन केलं आहे. या मोहिमेत तुमची साथ देण्याची संधी मिळाल्याबद्दल आम्ही आनंदी असल्याचं ते म्हणाले.
जम्मू-काश्मीरमध्ये असणाऱ्या सीआरपीएफ जवानांनी देखील चांद्रयानाचं यश साजरं केलं आहे. "भारत माता की जय", अशा घोषणा देत त्यांनी इस्रोला शुभेच्छा दिल्या आहेत.
"या क्षणाची आम्ही गेल्या कित्येक वर्षांपासून प्रतीक्षा करत होतो. आता ही मोहीम यशस्वी झाल्यामुळे आम्ही अगदी उत्साही आहोत. मी खूप खुश आहे." अशी प्रतिक्रिया इस्रोचे माजी प्रमुख के. सिवान यांनी दिली आहे.
चांद्रयानाच्या यशानंतर देशभरात आनंद साजरा केला जातो आहे. दिल्लीमधील काँग्रेस भवनाबाहेर देखील फटाके वाजवून जल्लोष करण्यात आला.
केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी इस्रोचं या यशासाठी कौतुक केलं आहे. "अगदी कमी खर्चात मोठ्या मोहीमा पार पाडण्याची क्षमता आपल्याकडे आहे", असं जितेंद्र सिंग यावेळी म्हणाले. त्यांनी दिल्लीमधील CSIR केंद्रावरुन या लँडिंगचे थेट प्रक्षेपण पाहिले.
इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी या मोहिमेला यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल संपूर्ण टीमचं कौतुक केलं. सोबतच त्यांनी सर्व शास्त्रज्ञांचे, देशवासियांचे आणि या मोहिमेच्या यशासाठी प्रार्थना करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे आभार मानले.
चांद्रयानाने यशस्वीपणे चंद्रावर लँडिंग केल्यानंतर देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील जल्लोष केला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष हेदेखील यावेळी त्यांच्यासोबत उपस्थित होते.
चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केल्यानंतर चांद्रयान-3 ने एक संदेश पाठवला आहे. "मी यशस्वीपणे चंद्रावर पोहोचलो आहे, आणि माझ्यासोबत संपूर्ण भारत याठिकाणी पोहोचला आहे"; असा आशयाचा संदेश चांद्रयानाने पाठवला आहे. इस्रोने एक्स पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे.
चांद्रयानाच्या यशानंतर संपूर्ण देशभरात आनंदाचं वातावरण आहे. गुजरातमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांनी एकत्र येत हा ऐतिहासिक क्षण साजरा केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दक्षिण आफ्रिकेतून 'चांद्रयान-3'च्या लँडिंगचं थेट प्रक्षेपण पाहिलं. ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर त्यांनी इस्रो, टीम चांंद्रयान आणि देशातील सर्व नागरिकांना मनापासून शुभेच्छा दिल्या. या क्षणासाठी कित्येक वर्षे, कित्येक लोकांना अविरत मेहनत केली आहे. या सर्वांना मी शुभेच्छा देतो; असं पंतप्रधान म्हणाले.
चांद्रयान-3 मधील लँडर मॉड्यूल हे यशस्वीपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं आहे. यानंतर चंद्रावर लँड होणारा भारत चौथा देश ठरला आहे. तर, चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ लँड होणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे.
फाईन ब्रेकिंग फेजही अगदी आरामात पार पडली आहे. आता केवळ व्हर्टिकल डिसेंट फेज बाकी आहे.
रफ ब्रेकिंग फेजनंतर, 10 सेकंदांची अल्टिट्यूड होल्डिंग फेजही यशस्वी झाली आहे. यानंतर फाईन ब्रेकिंग फेजला सुरुवात झाली आहे.
लँडर मॉड्यूलची रफ ब्रेकिंग फेज यशस्वीपणे पूर्ण झाली आहे. यानंतर अल्टिट्यूड होल्डिंग फेज सुरू करण्यात आली आहे. यामध्ये विक्रम लँडर हे चंद्रापासून 7.4 किलोमीटर उंचीवरून आणखी खाली नेऊन 6.8 किमी उंचीवर नेण्यात येईल. हा टप्पा केवळ 10 सेकंदांचा असणार आहे.
लँडिंग प्रक्रियेतील पहिला टप्पा हा रफ ब्रेकिंग फेज असणार आहे. यामध्ये विक्रम लँडरचा वेग हा 1.68 किमी प्रति सेकंद यावरुन कमी करून 358 मीटर प्रति सेकंद एवढा करण्यात येईल. लँडरचा वेग कमी करण्यासाठी 400 न्यूटन क्षमतेचे चार इंजिन फायर करण्यात येतील. हा टप्पा 690 सेकंदात पार पडेल. यानंतर विक्रम लँडर हे चंद्रापासून अवघ्या 7.4 किलोमीटर उंचीवर असणार आहे. या फेजला सुरुवात झाली आहे.
इस्रोच्या मिशन कंट्रोलने लँडर मॉड्यूलला पॉवर डिसेंटची कमांड दिली आहे. यानंतर लँडर मॉड्यूलने चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. चार टप्प्यांमध्ये ही प्रक्रिया पार पडेल. यातील पहिला टप्पा हा रफ ब्रेकिंग फेज असणार आहे.
लँडर मॉड्यूलच्या सर्व चाचण्या यशस्वीपणे पार पडल्या आहेत. त्यामुळे ही मोहीम देखील यशस्वीपणे पार पडणार असल्याचा विश्वास इस्रोने व्यक्त केल आहे. या मोहिमेच्या माध्यमातून संपूर्ण जगाला चंद्राबाबत मोलाची माहिती मिळणार आहे.
चांद्रयान-3 मोहीम आता अंतिम टप्प्यात आली आहे. अवघ्या काही मिनिटांमध्ये विक्रम लँडरला पॉवर डिसेंटची कमांड देण्यात येईल. यानंतर विक्रम लँडर स्वतःच पुढील सर्व प्रक्रिया पार पाडेल. सायंकाळी 6.04 वाजता चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्याचं इस्रोचं लक्ष्य आहे.
चांद्रयानच्या निर्मितीत बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव एमआयडीसीतील विकमशी फॅब्रिक्सचेही महत्वपूर्ण योगदान राहिले आहे. बुलडाणा जिल्हयातील खामगाव एमआयडीसीतील विकमशी फॅब्रिक्स प्रा. लि. मध्ये निर्माण झालेल्या थर्मल शिल्डचा वापर 'चांद्रयान-3'मध्ये करण्यात आला आहे.
अवघ्या 18 मिनिटांमध्ये विक्रम लँडरच्या पॉवर डिसेंटची सुरुवात होणार आहे. इस्रोने थेट प्रक्षेपणात याबाबत माहिती दिली आहे.
चांद्रयान-3 आता काही मिनिटांमध्ये चंद्रावर उतरणार आहे. यासाठीच्या प्रक्रिया सुरू करण्यात आल्या आहेत. इस्रोने देखील मिशन कंट्रोल सेंटरमधून थेट प्रक्षेपण सुरू केलं आहे. इस्रोच्या यूट्यूब, फेसबुक किंवा एक्स अकाउंटवरून तुम्ही हे थेट प्रक्षेपण पाहू शकता. सोबतच, डीडी नॅशनलवर देखील तुम्ही हे लाईव्ह पाहू शकतात.
चांद्रयान-3 हे आता लँडिंगसाठी सज्ज झालं आहे. अवघ्या 20 मिनिटांमध्ये, म्हणजेच 5:20 मिनिटांनी इस्रोमधून थेट प्रक्षेपण सुरू करण्यात येईल.
सध्या दक्षिण आफ्रिकेत ब्रिक्स देशांची परिषद सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेसाठी आफ्रिकेमध्ये आहेत. 'चांद्रयान-3' लँडिंगच्या पार्श्वभूमीवर, समिटचं आयोजन करणारे दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी भारताला शुभेच्छा दिल्या आहेत.
चांद्रयान-3 मोहिमेचा केवळ भारतालाच नाही, तर जगाला फायदा होणार आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ ज्या भागात विक्रम लँड करणार आहे, त्या भागात आतापर्यंत कोणताही देश पोहोचला नाही. त्यामुळे 'चांद्रयान-3'ने गोळा केलेला डेटा हा इतर देशांच्या आगामी चांद्रमोहिमांसाठी मोलाचा ठरणार आहे.
भारताच्या 'चांद्रयान-3'ला मोहिमेत यश मिळावं यासाठी जगभरातून शुभेच्छा मिळत आहेत. विशेष म्हणजे, देशाच्या या तिसऱ्या चांद्रमोहिमेचं बजेट हे कित्येक हॉलिवूड चित्रपटांपेक्षाही कमी आहे. हे ऐकून इलॉन मस्कही चकित झाला आहे. भारतासाठी ही खरंच चांगली बाब असल्याचं त्याने ट्विट करत म्हटलं आहे.
आपण आपल्या चुकांमधूनच शिकत असतो. त्यामुळेच, इस्रोने चांद्रयान-3 च्या सॉफ्ट लँडिंगसाठी विशेष खबरदारी घेतली आहे; अशी माहिती CSIR वैज्ञानिक सत्यनारायण यांनी दिली.
विक्रम लँडर चंद्रावर उतरल्यानंतर प्रज्ञान रोव्हर हे बाहेर पडेल. रोव्हरच्या सहा चाकांपैकी मागच्या दोन चाकांवर अशोकचक्र आणि इस्रोचा लोगो आहे. जेव्हा हे रोव्हर चंद्रावर फिरेल, तेव्हा या दोन्ही गोष्टींची छाप चंद्राच्या जमीनीवर उमटणार आहे. चंद्रावर हवा नसल्यामुळे, ही चिन्हं तिथे कायम राहणार आहेत.
चांद्रयान-3 च्या लँडिंगची प्रक्रिया ही सायंकाळी 5:44 वाजता सुरू होईल. यामध्ये रफ ब्रेकिंग फेज, अल्टिट्यूड होल्ड फेज, फाईन ब्रेकिंग फेज आणि टर्मिनल डिसेंट फेज असे चार टप्पे असतील. सुमारे 18 मिनिटांमध्ये हे चारही टप्पे पूर्ण केले जातील; आणि सायंकाळी 6:04 वाजता विक्रम लँडर चंद्रावर लँड होईल.
इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी 5 वाजून 20 मिनिटांनी मिशन कंट्रोलमधून थेट प्रक्षेपण सुरू करण्यात येईल. सायंकाळी 5:44 वाजेच्या सुमारास लँडिंग सिक्वेन्स सुरू होईल. सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडल्यास, सायंकाळी 6:04 वाजता विक्रम लँडर चंद्रावर लँड झालेलं असेल.
ऑटोमॅटिक लँडिंक सिक्वेन्सची कमांड मिळाल्यानंतर लँडर मॉड्यूलमधील इंजिन सुरू होतील, आणि ते खाली उतरण्यास सुरुवात करेल. यावेळी मिशन ऑपरेशन्स टीम या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेऊन असेल, अशी माहिती इस्रोने दिली.
चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्यासाठी ऑटोमॅटिक लँडिंग सिक्वेन्स सुरू करण्यासाठी इस्रोमधील वैज्ञानिक सज्ज झाले आहेत. आता केवळ लँडर मॉड्यूल हे अपेक्षित ठिकाणी पोहोचण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.