Drug Trafficking : टेलिग्राम आणि अशाच इतर मेसेजिंग अॅप्सचा वापर हा अमली पदार्थांच्या तस्करीसाठी होत असल्याचं एका रिपोर्टमध्ये समोर आलं आहे. या कामासाठी डार्क वेबचा वापरही होत असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. इंडिया फ्युचर फाऊंडेशनने हा रिपोर्ट पब्लिश केला आहे.
अमली पदार्थांची तस्करी ही एक बिलियन-डॉलर इंडस्ट्री आहे. या व्यवसायातील बडे मासे हे अमली पदार्थांचं व्यसन लागलेल्या किंवा पैशांची गरज असणाऱ्या व्यक्तींना या जाळ्यात ओढतात. अशाच प्रकारे लोकांची मोठी साखळी तयार होऊन, ड्रग्सची हातोहात तस्करी केली जाते.
इंटरनेटचा एक मोठा भाग हा सामान्यांपासून नेहमीच लपून राहतो. याला 'डार्क वेब' म्हणतात. टॉर आणि तशाच अन्य काही ब्राऊजर्सच्या मदतीने याठिकाणी सर्फिंग करता येतं. सामान्य ब्राउजर आणि सर्व्हरवरुन, विशेषतः गुगलवरुन डार्क वेब अॅक्सेस करता येत नाही; त्यामुळेच अवैध गोष्टींची खरेदी-विक्री करण्यासाठी याचा वापर केला जातो.
हेरॉईन, एलएसडी अशा अमली पदार्थांच्या तस्करीसाठी डार्क वेबचा वापर हे आपल्यासमोरील मोठं आव्हान असल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. दि डार्क मार्केट, दि पीपल्स ड्रग स्टोअर, ब्लॅक मार्केट आणि सिल्क रोड अशा वेब मार्केट्सचा यात उल्लेख आहे. अमली पदार्थांच्या जवळपास प्रत्येक प्रकारासाठी याठिकाणी विशिष्ट मार्केट उपलब्ध असल्याचं यात म्हटलं आहे.
दरम्यान, डार्क वेब वगळता टेलिग्रामसारख्या मेसेजिंग अॅप्सचा वापरही ड्रग तस्करीसाठी होत असल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. एंड-टू-एंड इन्क्रिप्शन सुविधा असल्यामुळे अशा अॅप्सचा वापर करण्यात येतो. ज्यामुळे दोन व्यक्तींमधील चॅट हे गोपनीय राहतं.
टेलिग्रामवर ड्रग्स खरेदी-विक्रीसाठी कित्येक ग्रुप्स उपलब्ध असल्याचं समोर आलं आहे. हे ग्रुप जॉईन करण्यासाठी युनिक इन्व्हिटेशन लिंक्स गरजेच्या असतात, त्यामुळे सामान्य यूजर्स सर्च करून या ग्रुप्समध्ये सहभागी होऊ शकत नाहीत.
डार्क वेब आणि टेलिग्रामवरून ड्रग्स खरेदी-विक्रीसाठी क्रिप्टोकरन्सीचा वापर केला जातो. क्रिप्टो व्यवहार ट्रॅक करता येत नसल्यामुळे हा पर्याय वापरण्यात येतो. यासाठी मुख्यत्वे बिटकॉईनचा वापर होत असल्याचंही या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
गुन्हेगारांच्या हाती नवनवीन टेक आल्यामुळे, त्यांना पकडणं आणखी अवघड होत जाणार आहे. यामुळेच सरकारी यंत्रणा, टेक कंपन्या आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स यांनी संयुक्तपणे काम करणं गरजेचं आहे. यासाठी अधिक कडक नियम, मॉनिटरिंग आणि ऑनलाईन सेफ्टीसाठी जागरुकता करणं आवश्यक असल्याचं या अहवालात म्हटलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.