New Cyber Scam : दिल्लीमध्ये सायबर फसवणुकीचा एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. 113 रुपयांचा रिफंड मिळवण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या एका डॉक्टरला तब्बल 5 लाख रुपये गमवावे लागले आहेत. नेमकी कशा प्रकारे ही फसवणूक झाली? जाणून घेऊयात.
प्रदीप चौधरी नावाच्या डॉक्टरसोबत हा प्रकार झाला आहे. चौधरी यांनी दिल्लीतून गुरूग्रामला जाण्यासाठी ऑनलाईन कॅब बुक केली होती. बुकिंग करताना कॅबचे चार्जेस 205 रुपये दाखवत होतं. मात्र, पोहोचल्यानंतर हे चार्जेस 318 रुपये झाले. ड्रायव्हरला याबाबत विचारणा केली असता, त्याने थेट कंपनीला कॉल करून रिफंड घेण्याचा सल्ला दिला.
यानंतर चौधरी यांनी गुगलवर या कंपनीचं नाव टाकून, कस्टमर केअर नंबर शोधला. यानंतर समोर आलेल्या एका नंबरवर त्यांनी कॉल केला. तर एका व्यक्तीने आपण त्या कंपनीचे कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह असल्याचं सांगितलं.
यानंतर डॉक्टरांनी त्याला आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला, आणि रिफंडची मागणी केली. यानंतर डॉक्टरांचा फोन दुसऱ्या नंबरवर ट्रान्सफर करण्यात आला. या दुसऱ्या व्यक्तीने आपलं नाव राकेश मिश्रा असल्याचं सांगितलं.
या व्यक्तीने डॉक्टरांना आपल्या फोनमध्ये एक अॅप इन्स्टॉल करण्यास सांगितलं. त्यासोबतच, आपलं मोबाईल वॉलेट देखील उघडण्यास सांगितलं, जेणेकरून रिफंड जमा केला जाऊ शकेल. यानंतर व्हेरिफिकशन म्हणून आपल्या फोनचे पहिले 6 अंक टाईप करण्यास सांगितले.
यानंतर स्कॅमर्सनी काही प्रोसेस करुन डॉक्टरांना ओटीपी विचारला. यानंतर डॉक्टरांच्या अकाउंटमधून चार ट्रान्झॅक्शन झाले. या माध्यमातून त्यांच्या अकाउंटमधून 4.9 लाख रुपये डेबिट झाले. यानंतर आपली फसवणूक झाल्याचं डॉक्टरांना समजलं, आणि त्यांनी पोलिसांत धाव घेतली. (Cyber Scam)
वारंवार विविध जाहिरातींच्या माध्यमातून, तसंच बातम्यांमधून सांगूनही कित्येक लोक फोनवर आपल्याला आलेला ओटीपी शेअर करतात. कृपया असं करणं टाळा. पैसे घेताना तुम्हाला ओटीपी सांगण्याची किंवा क्यूआर कोड स्कॅन करण्याची गरज भासत नाही, हे लक्षात घ्या. यासोबतच एखाद्या कंपनीचा कस्टमर केअर नंबर हा केवळ त्या कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरुनच घ्यावा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.