Microplastic in Water Bottle eSakal
विज्ञान-तंत्र

Microplastic in Water Bottle : प्लास्टिकच्या बाटलीत खरंच दडलेत 2.5 लाख राक्षस? सनसनाटी संशोधनामागचं शास्त्रीय तथ्य

काही दिवसांपूर्वी एक सनसनाटी बातमी वाचनात आली. बाटलीबंद एक लिटर पाण्यात अडीच लाख मायक्रोप्लास्टिक्सचे कण सापडले. या बातमीचं मूळ व त्यातील शास्त्रीय तथ्याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला.

डॉ. जयंत गाडगीळ

माध्यमक्रांतीमुळे आजकाल एखादे संशोधन बातमी आणि पोस्ट स्वरूपात दुसऱ्याच दिवशी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचते. मात्र विज्ञानाच्या निकषांमधून ते तावून सुलाखून निघालेले नसते. ती केवळ माहिती किंवा माहितीचा तुकडा असते. त्याचे ज्ञानात रूपांतर झालेले नसते. त्यासाठी अनेक प्रयोग, निरीक्षणे आणि घडणाऱ्या घटितांचा कार्यकारण संबंध लावणे, त्याची कारणमीमांसा होणे आणि संशोधकांमध्येही त्यावर एकमत होणे अजून बाकी आहे.

काही दिवसांपूर्वी एक सनसनाटी बातमी वाचनात आली. अनेक माध्यमांमध्येही त्यावर चर्चा झाली. बाटलीबंद पाण्याचे तीन नमुने तपासले असता एक लिटर पाण्यात अडीच लाख मायक्रोप्लास्टिक्सचे आणि नॅनोप्लास्टिक्सचे कण सापडले. या बातमीने खळबळ उडाल्यामुळे मूळ बातमी व त्यातील शास्त्रीय तथ्याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला.

नॅशनल अकादमी ऑफ सायन्सच्या ९ जानेवारी २०२४ च्या प्रोसिडिंगमध्ये वेई मीन आणि सहकाऱ्यांनी सादर केलेला हा शोधनिबंध आहे. हा मूळ निबंध वाचायला मिळाला नाही. पण त्यावरील अनेक बातम्यांचा वेध घेतला, तेव्हा थोडी जास्त माहिती लक्षात आली. स्टिम्युलेटेड रामन स्कॅटरींग (एस.आर.एस.) नावाचे एक तंत्र १९६० नंतर उदयाला आले. ते वापरण्याबद्दल आणि ते वापरून मिळालेल्या ज्ञानावर गेल्या साठ वर्षात शेकडो शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत.

या तंत्राबद्दलच हा शोधनिबंधवजा निरीक्षण आहे. हे प्रतिमा मिळवण्याचे तंत्र आहे. या तंत्रामुळे प्रतिमेचे पृथःकरण करून अनेक प्रकारची माहिती मूळ नमुन्याचा नाश न करता, कमी वेळात मिळवता येते. माहिती मिळवण्याचे विविध अल्गोरिदम तयार करून ही माहिती, जास्तीत जास्त अचूक मिळवण्याचे अनेक प्रयत्न संशोधक करीत आहेत.

गेल्या चार पाच वर्षात प्लॅस्टिकचे तुकडे अर्थात मायक्रोप्लास्टिक्स, नॅनोप्लास्टिक्सवर संशोधन व त्याबद्दल समाजात जाणिवा निर्माण होऊ लागल्या आहेत. त्यामुळे कोलंबिया विद्यापीठातील काही संशोधकांनी (यांचे मूळ संशोधन हे एसआरएस तंत्रात प्रगती करण्याचे असून गेली पंधरा वर्षे ते त्यात काम करीत आहेत.) त्या तंत्राच्या वापरामध्ये द्रवात तरंगणाऱ्या कणांच्या प्रतिमांवरून त्या कणांचे स्वरूप (ते कोणत्या रसायनांचे कण आहेत) व त्यांची संख्या किंवा प्रमाण (एकूण पाण्यात किती प्रमाणात आहेत, याची अचूकता आणि सातत्य (अक्युरसी आणि कन्सिस्टंन्सी) शोधणे अशी अनेक कामे बाकी आहेत. एखाद्या द्रवात माहिती असलेल्या तरंगत्या कणांचे प्रमाण वेगवेगळे ठेवून ते मोजले, व नवीन तंत्रानेसुद्धा ते प्रमाण तेवढेच असेल, तर नवीन तंत्र जुन्या तंत्राइतकेच उपयोगी आहे, हे समजून येईल.

सनसनाटी आहे ती प्लास्टिकच्या प्रमाणाबद्दल. पाणी विविध तंत्रे वापरून गाळतात आणि ते बाटलीबंद करतात. तीन विविध कंपन्यांच्या नमुन्यांमध्ये सात प्रकाराचे पॉलिमर सापडले. सगळ्यात जास्त प्रमाण पॉलिएथिलिन टरफ्थॅलेटचे, त्या खालोखाल नायलॉन ६६, पॉलिप्रॉपिलिन, पॉलिएथिलिन, पॉलिस्टायरिन, पॉलिव्हिनाइल क्लोराइड, व पॉलिमेथिल मेथाक्रिलेट असे सात प्रकारचे पॉलिमर सापडले. हे सुमारे १० टक्के पदार्थ मायक्रोप्लास्टिक्स आहेत.

हे तर पाणी गाळण्यासाठी वापरलेल्या गाळण्याचे पदार्थ आहेत. (म्हणजे बाटलीत किंवा पिशवीत पाणी ठेवले की त्यात आपोआप कण येतातच असे हे निरीक्षण सांगत नाही.) उरलेले ९० टक्के तरंगणारे कण-पदार्थ काय आहेत, हे अजून समजलेले नाही. २०१७ वर्षातील एका शोधनिबंधात असे सुमारे ३५० कण असतात, असे आढळून आले होते.

त्या मानाने नवीन संशोधनात त्याच्या सुमारे हजारपट जास्त कण आढळून आले. या तंत्राचा वापर करून अन्य प्रयोगशाळांमध्ये आढळणारे मायक्रो आणि नॅनोप्लास्टिकचे प्रमाण तेवढेच आहे का, हे पडताळून सिद्ध व्हायला पाहिजे. तसेच गाळण्यांमधून हजारो बाटल्यांमध्ये पाणी भरले असेल, विविध स्रोतांमधून पाणी भरले, तर सर्व बाटल्यांमध्ये तेवढेच कण आढळतात का?

पाण्यात वेगळे कोणतेही पदार्थ आढळणे ही घटना लक्षणीयच आहे. धोक्याचीसुद्धा असेल. (रक्तात प्रमाणाबाहेर मीठासारखा नेहमीचा पदार्थ आढळला, तरी ते धोकादायक असतेच की) पण बरेचदा आपल्याला निवड करावी लागते, ती जास्त वाईट पर्याय आणि कमी वाईट पर्याय यातून. तेव्हा कोणता पर्याय कमी वाईट आहे, याचे मीमांसेसह ज्ञान मिळणे गरजेचे असते. त्यामुळे जास्तीत जास्त माहिती मिळवून त्यातून योग्य निष्कर्ष काढेपर्यंत थांबावे लागेल. म्हणजे हे बहुधा पाठीवर पडलेले पान असेल. याचा अर्थ झाडच पडत आहे, किंवा आभाळच पाठीवर पडत आहे, असा लावून सनसनाटी निर्माण करणेही इष्ट नाही. आणि त्या रेट्याखाली सारासार विवेक बाजूला ठेवणेही इष्ट नाही. वाचकांनी सजगही राहिले पाहिजे, आणि मिळणाऱ्या माहितीबद्दल विवेकही जागा ठेवला पाहिजे.

शोधनिबंध अनेकदा शोध नसतो!

संख्याशास्त्र व संभाव्यतेनुसार एक हजार बाटल्या पाणी भरल्यावर किती बाटल्यांमध्ये हे कण किती प्रमाणात आढळतात याचेही आकडे मिळायला हवेत. अगदी खाण्यास योग्य असे मेदाम्लयुक्त पदार्थसुद्धा विशिष्ट प्रमाणाबाहेर खाल्ले गेल्यास त्यांचे थर रक्तवाहिन्यांमध्ये साचून आरोग्याला धोका होऊ शकतो, तर जीवशास्त्रीयदृष्ट्या अलिप्त किंवा खाद्य दर्जाच्या प्लास्टिकचे परिणाम काय असतील याचाही अभ्यास होणे बाकी आहे.

उरलेले नव्वद टक्के कण कशाचे, किती व कोणत्या प्रमाणात आहेत याबद्दल अजून अनभिज्ञच आहोत. खरे तर अशा शोधनिबंधांमधून याच निष्कर्षांना पुष्टी मिळाली तर हे निरीक्षण योग्य आहे, असे म्हणता येईल. आता माध्यमांच्या प्रगतीमुळे एखाद्या कॉन्फरन्समधला शोधनिबंध हे अनेकदा निरीक्षण असते, शोध नसतो.

- डॉ. जयंत गाडगीळ (लेखक विज्ञानाचे अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT