-टेक्नोहंट
आगामी दिवाळीनिमित्त सर्वत्र खरेदीचा उत्साह आहे. त्यानिमित्त मॉल, सुपरमार्केट, दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दीही वाढली आहे. रांगेत काही वेळ काढल्यानंतर खरेदीचं बिल समोर आल्यानंतर आपल्यापैकी अनेकजण रोखीने, डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा यूपीआय पद्धतीने पेमेंट करतात. पण समजा तुमच्याकडे रोख रक्कम, डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा सोबत मोबाईलही नसेल, तर तुम्ही काय करणार? अशा अडचणीच्या वेळी तुमचा चेहराच तुमच्या मदतीला धावून येणार आहे! त्याबाबत थोडक्यात.
करोनामुळे संपर्कविरहित व्यवहार करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातूनच रोख व्यवहार करण्याच्या तुलनेत यूपीआय व्यवहार करण्याकडे अनेकांचा कल असतो. तंत्रज्ञानाच्या मदतीने आता डिजिटल व्यवहार अधिक सोयीचे आणि सुलभ करण्यावरही भर दिला जात आहे. त्यापाठोपाठ आता ‘फेशिअल रेकग्निशन’ तंत्रज्ञानाच्या साह्याने आर्थिक व्यवहार करता येणार आहेत. नेदरलँड येथील व्हीजन लॅब या तंत्रविषयक कंपनीने एक नवतंत्रज्ञान विकसित केले आहे. त्याअंतर्गत फेस-बायोमेट्रिक पेमेंट सिस्टिम व्हिजनलॅब लुना पीओएस टर्मिनल (VisionLab LUNA POS Terminal) लवकरच लॉन्च करणार असल्याची घोषणा कंपनीने केली.
व्हीजन लॅबच्या या पेमेंट पद्धतीमध्ये फेशिअल रेकग्निशनसोबतच पारंपरिक पद्धतीनेही पेमेंट करण्याची सुविधा उपलब्ध आहे, तसेच फेशिअल रेकग्निशन पद्धतीने म्हणजे कॉन्टॅक्टलेस पेमेंट प्रणालीसाठी व्हिजनलॅबने खास कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अल्गोरिदम विकसित केले आहे. फेशिअल रेकग्निशनने स्मार्टफोन अनलॉक केला जातो, अगदी त्याच प्रकारे व्हिजनलॅबचं पेमेंट टर्मिनल अल्गोरिदमच्या मदतीने ग्राहकाचा चेहरा स्कॅन केल्या जाईल. चेहरा स्कॅन केल्यावर ती माहिती बँकेकडे पाठवली जाईल. संबंधित ग्राहकाची चेहरेपट्टी आणि बँक खात्यातील माहिती जुळताच अवघ्या काही सेकंदात आर्थिक व्यवहार पार पडेल.
भारतातही प्रणाली शक्य...
खरंतर ही प्रणाली भारतात सुरू करण्यास फार काही कष्ट घ्यावे लागणार नाहीत. आपल्या देशात आधार प्रणालीच्या माध्यमातून बँकेकडे प्रत्येक ग्राहकाची बायोमेट्रिक तसेच आय-रेटिनाबाबतची माहिती उपलब्ध आहे. व्हिजन लॅबच्या माध्यमातून ग्राहकांचा स्कॅन केलेली चेहरेपट्टी आणि आधार प्रणालीतील बायोमेट्रिक माहिती जुळताच व्यवहार करणे शक्य होईल; मात्र आपला चेहरा स्कॅन करून आपल्या खात्यातून कुणीही पैसे काढून घेतील, या भीतीने भारतातील ग्राहक या प्रणालीवर कितपत विश्वास ठेवतील, याबाबत शंका आहे.
धोका काय?
फेशिअल रेकग्निशनद्वारे केल्या जाणाऱ्या पेमेंट प्रणालीमध्ये टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजेच चेहरा स्कॅन केल्यानंतर ग्राहकाकडून आणखी एखादी परवानगी किंवा पासवर्डच्या सुविधेचा अभाव आहे. तसेच, ग्राहकांच्या परवानगीविना किंवा खासगीरीत्या चेहरा स्कॅन करून गैरप्रकार करण्याचा धोकाही आहे. त्यामुळे फेशिअल रेकग्निशनसोबतच आणखी एखादी सुरक्षा पायरी या प्रणालीत असावी, असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, या तंत्रज्ञानात सुरक्षेबाबत विशेष काळजी घेतली असल्याने गैरप्रकार होणार नाही, असा दावा, व्हिजनलॅबच्या वतीने करण्यात आला.
फेशिअल रेकग्निशनने व्यवहार कसा होणार?
पेमेंट टर्मिनल सर्वप्रथम फेशिअल रेकग्निशन पद्धतीने पेमेंट करण्यासाठी ग्राहकाची परवानगी घेईल.
ग्राहकांना होकार दिल्यास टर्मिनलद्वारे ग्राहकाचा चेहरा स्कॅन केला जाईल.
तत्पूर्वी बँकांकडे संबंधित ग्राहकाची चेहरेपट्टीची माहिती असणे गरजेचे आहे.
ग्राहकाचा चेहरा स्कॅन झाल्यानंतर ती चेहरेपट्टी बँकेकडे पाठवली जाईल.
बँकेत सदर व्यक्तीची ओळख पटताच अवघ्या काही सेकंदातच व्यवहार पार पडेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.